Headlines

गोव्यात पावसाची प्रतीक्षा कायम; यंदा पर्जन्यमानात 30 टक्के तूट


पणजी, ता. 23 : यंदाच्या मान्सून हंगामात गोव्यात पावसाची तूट कायम असून, 1 जून ते 23 ऑगस्ट या कालावधीत गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 28.43 इंच कमी पाऊस पडला आहे. राज्यातील सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत यंदा अजूनही 30 टक्के तूट असल्याचे हवामान विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

यंदा मान्सूनने गोव्यात वेळेत हजेरी लावली होती. सुरुवातीच्या काळात जोरदार पाऊस झाल्याने चांगल्या पर्जन्यमानाची अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर पावसाने वारंवार दडी मारल्याने राज्यातील एकूण पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी राहिले.

गतवर्षी 1 जून ते 23 ऑगस्टदरम्यान 98.48 इंच पाऊस झाला होता. यंदा मात्र या कालावधीत त्यापेक्षा तब्बल 28.43 इंच कमी पाऊस नोंदवण्यात आला आहे.

राज्यात सर्वाधिक पाऊस वाळपई परिसरात झाला आहे. वाळपईत आतापर्यंत 99.20 इंच पावसाची नोंद झाली होती. रविवारीही परिसरात पावसाच्या सरी बरसल्याने पर्जन्यमानाने 100 इंचांचा टप्पा ओलांडला आहे.

दरम्यान, पणजीमध्ये राज्यातील सर्वांत कमी पावसाची नोंद झाली आहे. पणजीत आतापर्यंत केवळ 44.15 इंच पाऊस झाला आहे. दाबोळी आणि मुरगाव या केंद्रांवरही पावसाचे प्रमाण 50 इंचांपेक्षा कमी आहे.

29 ऑगस्टपर्यंत मोठ्या पावसाची शक्यता नाही

हवामान विभागाच्या अंदाजानुसार 29 ऑगस्टपर्यंत राज्यात मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे. तरीही काही भागांमध्ये अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत.

रविवारी रात्री पणजी आणि आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे काही काळ वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी राज्यातील पावसाची तूट भरून निघण्यासाठी आणखी चांगल्या पावसाची गरज आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत