Headlines

Clash between congress and abvp workers in pune case filed against 60 workers; पुण्यातील राहुल गांधींच्या कार्यक्रमाआधीच तुफान राडा; काँग्रेसच्या ५० ते ६० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल


​पुणे: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या ‘छात्रों की गूंज’ या विद्यार्थी मेळाव्याच्या पूर्वसंध्येला पुण्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले. COEP कॉलेजच्या हॉस्टेल परिसरात शुक्रवारी मध्यरात्री काँग्रेसची विद्यार्थी आघाडी NSUI आणि भाजप प्रणित ABVP यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. वाद विकोपाला गेल्यानंतर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी सौम्य लाठीमार सुद्धा केला. पुण्यात आयोजित विद्यार्थी संवाद सभेसाठी NSUI चे पदाधिकारी महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संपर्क साधत होते. या मोहिमेदरम्यान COEP वसतिगृहाजवळ दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला.

राहुल गांधी यांच्या कार्यक्रमास पाठिंबा देणाऱ्या दोन विद्यार्थिनींना ABVP च्या कार्यकर्त्यांनी खोलीत डांबून दमदाटी केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. या विद्यार्थिनींच्या मदतीसाठी गेलेल्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप त्यांनी केला. तर दुसरीकडे वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींवर राहुल गांधी यांच्या सभेसाठी नोंदणी करण्यासाठी आणि उपस्थित राहण्यासाठी काँग्रेस व एनएसयूआयचे कार्यकर्ते बळजबरीने दबाव टाकत असल्याचा पलटवार ABVP ने केला आहे.

या राड्याची माहिती मिळताच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार, विश्वजीत कदम, प्रशांत जगताप यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मध्यरात्रीच महाविद्यालय परिसरात धाव घेतली. पोलिसांच्या लाठीमाराचा निषेध करत कार्यकर्त्यांनी कॅम्पसमध्ये ठिय्या आंदोलन सुरू केले.

अभाविप कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एनएसयूआय व युवक काँग्रेसच्या ५० ते ६० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पुष्कर आबनावे, भूषण रानभरे, अक्षय जैन, सौरव आमराळे, सागर धाडवे, प्रथमेश आबनावे यांच्यासह ५० ते ६० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. शिवाजीनगर पोलिसांनी संबंधित काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), १८९ (१), १८९ (२), १९१ (२), ३५१ (१), ३५२ तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ३७ (३) आणि १३५ अंतर्गत गुन्हा दाखल केला.

दरम्यान, पुढे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीओईपी कॅम्पस व वसतिगृह परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.