सावंतवाडी (प्रतिनिधी ): सावंतवाडी येथील श्रीराम वाचनालयासमोर असलेल्या मोती तलावात दुपारी १ वाच्या सुमारास एका युवक आणि युवतीने उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत युवती ही करिवडे भागातील असल्याचे प्राथमिक अंदाजात समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी मोती तलावाच्या काठावर या युवक आणि युवतीमध्ये सुमारे अर्धा ते एक तास जोरदार बाचाबाची सुरू होती. त्यानंतर ‘मी सावंतवाडीकर’ या सेल्फी पॉइंटजवळ असलेल्या काठावरून युवतीने अचानक तलावात उडी मारली. तिला वाचवण्यासाठी किंवा त्यापाठोपाठ लगेचच युवकानेही तलावात उडी घेतली. या दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
घटना घडताच परिसरातील नागरिकांनी तलावाकाठी मोठी गर्दी केली होती. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृत युवक आणि युवतीमध्ये मैत्रीपूर्ण संबंध असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून, युवक हा युवतीचा नातलग असल्याचीही माहिती समोर येत आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. युवतीचा मृतदेह सापडला असून युवकाचा मृतदेह शोधण्याचे काम अद्याप सुरु आहे.
