या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही फक्त 250 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता आणि व्याजदर देखील इतर योजनांपेक्षा चांगला आहे. पण दरमहिन्याला तुम्ही केवळ 1200 रुपये गुंतवले, तर सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत हळूहळू मोठा निधी जमा होऊ शकतो. अशाप्रकारे तुमची वार्षिक गुंतवणूक 14,400 रुपये होईल आणि 15 वर्षे सातत्याने गुंतवणूक करत राहिल्यास खात्यात एकूण 2,16,000 जमा होतील. त्यानंतर तुमची मुलगी 21 वर्षांची झाल्यावर तुम्हाला कोणतीही नवीन रक्कम जमा करण्याची आवश्यकता भासणार नाही, पण खात्यात व्याज जमा होत राहील.
छोट्या गुंतवणुकीतून मिळवा लाखोंचा निधी
अशाप्रकारे, छोटी-छोटी गुंतवणूक करून तुमच्या लेकीच्या भविष्यासाठी दीर्घकाळात मोठा निधी उभा करू शकाल. सुकन्या समृद्धी योजनेत सध्या 8.2% वार्षिक व्याज दिला जात आहे, जो स्थिर राहिल्यास दरमहा तुमची 1200 रुपयांमधून अंदाजे 6.90 लाखांचा निधी जमा होऊ शकतो. यापैकी अंदाजे 4.74 लाख रुपये व्याजातून मिळतील. तसेच लक्षात घ्या की सरकार वेळोवेळी SSY व्याजदर सुधारित करते, त्यामुळे प्रत्यक्ष रक्कम कमी-जास्त असू शकते.
दरमहिन्याला 1,200 रुपयांचा पूर्ण हिशोब
वर नमूद केल्याप्रमाणे तुम्ही दरमहिन्याला 1200 रुपये सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवल्यास :
दरमहा गुंतवणूक: 1,200 रुपये
वार्षिक गुंतवणूक: 14,000 रुपये
15 वर्षांतील एकूण गुंतवणूक: 2,16,000 रुपये
अंदाजित व्याज: अंदाजे 4,74,000 रुपये
21 वर्षांनंतर अंदाजित निधी: अंदाजे 6,90,000 रुपये
8व्या वेतन आयोगात बसणार मोठा धक्का, पगारात भरघोस वाढ; पण DA, HRA, CEA, LTC चे एरिअर्स विसरायचं, का?
फक्त 15 वर्षांसाठीच गुंतवणूक करायची
SSY या सरकारी योजनेत तुम्हाला 21 वर्षांसाठी मासिक ठेवी करण्याची गरज नाही. यामध्ये तुम्ही 15 वर्षांसाठी दरमहा 1200 रुपये जमा कराल आणि त्यानंतर, तुम्ही पुढील 6 वर्षांसाठी कोणतीही नवीन गुंतवणूक केली नाही तरीही तुम्हाला खात्यात व्याज जमा होत राहील. हा दीर्घकालीन फायदा आहे. सुरुवातीला रक्कम छोटी वाटू शकते पण, कालांतराने व्याजावर व्याज जमा होत गेल्याने निधी वाढत राहतो.
दर महिन्याला किती रक्कम जमा करून मॅच्युरिटीला किती रक्कम मिळू शकेल? खालीलप्रमाणे समजून घेऊ
| मासिक गुंतवणूक | 15 वर्षांतील एकूण ठेव रक्कम | 21 वर्षांनंतर अंदाजित मॅच्युरिटी रक्कम* |
|---|---|---|
| 1,000 रुपये | 1,80,000 रुपये | सुमारे 5.51 लाख रुपये |
| 2,000 रुपये | 3,60,000 रुपये | सुमारे 11.02 लाख रुपये |
| 5,000 रुपये | 9,00,000 रुपये | सुमारे 27.55 लाख रुपये |
| 10,000 रुपये | 18,00,000 रुपये | सुमारे 55.09 लाख रुपये |
SSY खाते कोण उघडू शकते?
10 वर्षांखालील मुलीच्या नावाने खाते उघडता येते.
एका मुलीच्या नावाने फक्त एकच खाते उघडता येते.
एका आर्थिक वर्षात किमान 250 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये ठेव जमा करू शकता.
याशिवाय SSY योजना ही EEE श्रेणीतील योजना आहे. म्हणजे, पात्र गुंतवणूकदार आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सूटचा दा करू शकतो, आणि मिळणारे व्याज करमुक्त असून विहित नियमांनुसार मुदतपूर्तीची रक्कम देखील करमुक्त आहे.
अशा परिस्थितीत, तुमची मुलगी अजून लहान असेल आणि तुम्हाला लेकीच्या उच्च शिक्षण किंवा लग्नासाठी दीर्घकालीन निधी उभारायचा असेल, तर सुकन्या समृद्धी योजना उत्तम पर्याय ठरू शकतो. नियमित गुंतवणूक आणि चक्रवाढ व्याजामुळे, अगदी लहान बचतसुद्धा कालांतराने एका मोठ्या निधीमध्ये वाढू शकते.
