Viral Accident Video: बेंगळुरूमधील खराब रस्ते आणि खड्ड्यांमुळे झालेल्या धक्कादायक अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. खड्डे चुकवताना पाण्याच्या टँकरने एका बाईकला चिरडलं, मात्र चालकानं वेळीच उडी घेतल्याने त्याचा जीव वाचला.

कसा झाला अपघात?
हा व्हिडीओ @BefittingFacts या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बेंगळुरूमध्ये घडली आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, अत्यंत खराब रस्त्यावरून वाहनं धावत आहेत. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून त्यामध्ये पाणी साचलं आहे. दरम्यान, एक पाण्याचा टँकर खड्डे चुकवत पुढे जात होता. पण या नादात चालकानं शेजारी चालत असलेल्या बाईकचा चुराडा केला. हा टँकर थेट बाईकवरून गेला. सुदैवानं बाईक चालवणाऱ्या तरुणानं लगेच उडी घेतली, म्हणून त्याचा जीव वाचला. अन्यथा टँकरचं चाक त्याच्याही अंगावरून गेलं असतं.
हा व्हिडीओ होतोय व्हायरल
हा धडकी भरवणारा व्हिडीओ आतापर्यंत २ लाख ६५ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसंच, ३०० हून अधिक नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत खराब रस्त्यांप्रकरणी संताप व्यक्त केलाय. असो, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातही शाळेतल्या मुलांनी रस्त्यांवरील खड्ड्यांप्रकरणी व्हिडीओ तयार केले होते. त्यानंतर आता ठिकठिकाणी रस्ते दुरुस्त करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. या अपघाताप्रकरणी तुमचं काय मत आहे? तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया द्या.
(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

