Headlines

गोवा फॉरवर्डला बाजूलाच ठेवण्याच्या हालचाली


आजच्या बैठकीचे गोवा फॉरवर्डला निमंत्रण नाही : भाजपला उखडण्याचा निर्धार, पण एकीचे काय?

त. भा. विशेष प्रतिनिधी

पणजी : गोव्यात सलग पंधरा वर्षांची सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची राजवट उखडून काढण्यासाठी काँग्रेस पक्षाने जरी निर्धार केला असला तरी देखील त्यासाठी आवश्यक युती करताना मात्र गोवा फॉरवर्ड पक्षाला बाजूला ठेवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसने आम आदमी पार्टी (आप) आणि रिव्होल्यूशनरी गोवा पार्टी (आरजीपी) यांच्याबरोबर आज शुक्रवारी बोलणी करण्याचे ठरविले आहे.   प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी यासंदर्भात आप आणि आरजीपी यांना आगामी निवडणुकीत संयुक्त आघाडी करण्यासाठी चर्चेचे निमंत्रण दिले आहे. मात्र आजच्या बैठकीपासून गोवा फॉरवर्ड पक्षाला बाजूला ठेवले आहे. त्यांना चर्चेसाठी बोलविण्यात आलेले नाही.

गोवा फॉरवर्डकडून काँग्रेसवर बोचरी टीका

गोवा फॉरवर्ड पक्षाने याअगोदरच काँग्रेसवर जोरदार टीका केलेली आहे. एवढेच नव्हे तर, काँग्रेस पक्षातील आमदार पुन्हा फुटतील, अशी खरमरीत टीका विजय सरदेसाई यांनी अलीकडेच केली आहे. त्यानंतर गिरीश चोडणकर यांनी स्वत:ला तसेच स्वत:च्या पक्षाला गोवा फॉरवर्डपासून लांब ठेवले आहे.

आम्ही कोणावरही विसंबून नाही : सरदेसाई

विजय सरदेसाई यांनी सांगितले की, आमची या अगोदरच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी बोलणी झालेली होती. स्थानिक पातळीवर जर कोणी राजकारण करीत असेल तर अवश्य करू द्या. गोवा फॉरवर्ड हा जनतेच्या कल्याणासाठी विद्यमान सरकारच्या विरोधातच काम करीत राहणार आणि जनतेला न्याय मिळवून देणार आहे. निवडणुकीसाठी आम्ही कोणावरही विसंबून नाही.

गोवा फॉरवर्डची गरज नसल्याचा संदेश

आप आणि आरजीपी या दोन पक्षांच्या नेत्यांबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांची आज होणारी बैठक महत्त्वाची ठरणार आहे. बैठकीतून काँग्रेसने गोवा फॉरवर्डला तुमची फारशी गरज आहे असे नाही, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेस यांच्या दरम्यान युती होते की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

काँग्रेसला तापदायक बाबी सर्वेक्षणातून झाल्यात उघड

विजय सरदेसाई यांनी स्पष्ट केले आहे की गोव्यात आमचा स्वतंत्र पक्ष आहे. आपण त्याचा अध्यक्ष आहे. आम्हाला इतर राजकीय पक्षांची आवश्यकता आहे आणि आम्ही त्यांच्यावर विसंबून आहोत, असा गैरसमज कोणीही करून घेऊ नये. आम्ही केलेल्या सर्वेक्षणामध्ये काही धक्कादायक बाबी समोर आलेल्या असून त्या काँग्रेससाठी फार तापदायक आहेत. त्यामुळेच काँग्रेसने आगामी निवडणुका गांभीर्याने घेणे गरजेचे आहे, असेही सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसचे नेमके धोरण कोणते?

गिरीश चोडणकर आता गोवा फॉरवर्डबरोबर युती करण्याच्या संदर्भात कोणतेही भाष्य करण्यास तयार नाही. यातून गोवा फॉरवर्डची देखील फार मोठी अडचण झालेली आहे. त्यामुळे काँग्रेस नेमके कोणते धोरण स्वीकारते, याकडे गोवा फॉरवर्डचे लक्ष आहे. गोवा फॉरवर्डकडे सध्या एकमेव आमदार आहे. आपकडे दोन आमदार आहेत, आणि आरजीपीकडे एकमेव आमदार आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत