Headlines

इंग्लंडसमोर पाकचा 171 धावांत खुर्दा


रॉबिन्सन, टंग यांचे प्रत्येकी 5 बळी, अब्दुल्ला शफीकचे अर्धशतक, इंग्लंड प. डाव 2 बाद 119

वृत्तसंस्था, लीड्स (ब्रिटन)

आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत येथे सुरू झालेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळाच्या पहिल्याच दिवशी ओली रॉबिन्सन आणि जोश टंग यांच्या भेदक माऱ्यासमोर पाकचा पहिला डाव केवळ 171 डावांत आटोपला. त्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात शेवटची बातमी हाती आली त्यावेळी दोन बाद 119 धावा जमविल्या होत्या. इंग्लंडचा संघ आता 52 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 8 गडी खेळावयाचे आहेत.

या पहिल्या कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून पाकला प्रथम फलंदाजी दिली. वेगवान गोलंदाजीस अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर इंग्लंडच्या रॉबिन्सन आणि टंग यांनी धुमाकूळ घालत प्रत्येकी 5 गडी बाद केल्याने पाकचा पहिला डाव 48.1 षटकांत 171 धावांत आटोपला. खेळाच्या शेवटच्या सत्रामध्ये इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात 2 बाद 112 धावांपर्यंत मजल मारली होती

या कसोटीतील पाकच्या डावातील पहिल्याच चेंडूवर रॉबिन्सनने सलामीच्या अझान अवैसला खाते उघडण्यापूर्वीच पायचीत केले. त्यानंतर रॉबिन्सनने पाकला आणखी एक धक्का देताना शान मसूदला 5 धावांवर पायचीत करून त्याला तंबूचा रस्ता दाखविला. पाकची स्थिती यावेळी 2 बाद 6 अशी केविलवाणी होती. इमामुल हक आणि अब्दुल्ला शफीक या जोडीने पाकचा डाव सावरताना तिसऱ्या गड्यासाठी 91 धावांची भागिदारी केली. खेळाच्या पहिल्या दिवशी उपाहाराच्या पहिल्या सत्रात केवळ 9.4 षटकांचा खेळ झाला आणि पाकने 2 बाद 23 धावांपर्यंत मजल मारली. पावसामुळे पंचांनी खेळ उपाहारावेळी थांबविण्याचा निर्णय घेतला होता.

खेळाच्या दुसऱ्या सत्राला प्रारंभ झाल्यानंतर शफीकने 82 चेंडूत 7 चौकारांसह 50 धावा जमविल्या. त्याला इमामुल हककडून चांगली साथ लाभली. मात्र चहापानापूर्वी इंग्लंडच्या टंगने इमामुल हकला ब्रुककरवी झेलबाद केले. त्याने 74 चेंडूत 6 चौकारांसह 42 धावा जमविल्या. चहापानावेळी पाकची स्थिती 7 बाद 150 अशी केविलवाणी होती. तत्पूर्वी पाकने 3 बाद 117 धावांपर्यंत मजल मारली होती. पण त्यानंतर इंग्लंडच्या भेदक माऱ्यासमोर त्यांचे शेवटचे 7 गडी 54 धावांत तंबूत परतले.

रॉबिन्सनने खेळाच्या दुसऱ्या सत्रात सौद शकीलला 5 धावांवर पायचीत केले. त्यानंतर अब्दुल्ला शफीक रॉबिन्सनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने 104 चेंडूत 8 चौकारांसह 61 धावा झळकविल्या. टंगने कर्णधार सलमान आगाचा त्रिफळा उडविला. त्याने 29 चेंडूत 4 चौकारांसह 21 धावा जमविल्या. टंगने पाकला आणखी एक धक्का देताना अली उस्मानला खाते उघडण्यापूर्वी पायचीत केले. चहापानावेळी मोहम्मद रिझवान 11 धावांवर खेळत होता तर अली उस्मान चहापानापूर्वीच्या शेवटच्या चेंडूवर बाद झाला.

खेळाच्या शेवटच्या सत्राला प्रारंभ झाला आणि टंगने रिझवानला पायचीत केले. त्याने 1 चौकारांसह 12 धावा केल्या. रॉबिन्सनने खुर्रम शेहजादला अॅटकिन्सनकरवी झेलबाद केले. त्याने 12 चेंडूत 3 चौकारांसह 14 धावा जमविल्या. टंगने मोहम्मद अब्बासचा दोन धावांवर त्रिफळा उडवून पाकला पहिल्या डावात 171 धावांवर रोखले. इंग्लंडतर्फे रॉबिन्सनने 51 धावांत 5 तर टंगने 46 धावांत 5 गडी बाद केले.

इंग्लंडच्या डावाला डकेट आणि गे यांनी सावध सुरुवात करून देताना 8.5 षटकांत 36 धावांची भागिदारी केली. पाकच्या मोहम्मद अब्बासने डकेटला पायचीत केले. त्याने 15 धावा जमविल्या. त्यानंतर मोहम्मद अलीने गे ला आगाकरवी झेलबाद केले. त्याने 31 चेंडूत 7 चौकारांसह 33 धावा जमविल्या. कॉक्स आणि रूट या जोडीने दिवसअखेर संघाची अधिक पडझड होऊ दिली नाही. खेळाच्या पहिल्या दिवसाअखेर इंग्लंडने पहिल्या डावात 25 षटकांत 2 बाद 112 धावा जमविल्या होत्या. कॉक्स 23 तर रुट 37 धावांवर खेळत होते. पाकतर्फे मोहम्मद अब्बास आणि मोहम्मद अली यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

गुरुवारी या कसोटीतील खेळाच्या दुसऱ्या दिवसाला प्रारंभ झाला पण केवळ 3.2 षटकांचा खेळ झाला असताना पावसामुळे खेळ थांबवावा लागला. इंग्लंडने 28.2 षटकांत 2 बाद 119 धावा जमविल्या. कॉक्स 4 चौकारांसह 24 तर कर्णधार रूट 7 चौकारांसह 42 धावांवर खेळत असून या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी अभेद्य 71 धावांची भागिदारी केली. खेळाच्या दुसऱ्या दिवशी उपाहारापर्यंतच्या सत्रात पावसामुळे दोन तास वाया गेले.

पाकिस्तान संघाने अलिकडच्या कालावधीत 7 पैकी केवळ 2 कसोटी सामने जिंकले आहेत. इंग्लंडविरुद्धच्या या पहिल्या कसोटीत बोटाला झालेल्या दुखापतीमुळे बाबर आझमला खेळता न आल्याने पाकचे नेतृत्व सलमान आगाकडे सोपविण्यात आले आहे. या सामन्यात इंग्लंडचा अनुभवी फलंदाज आणि कर्णधार जो रूट चिवट फलंदाजी करत आपल्यासंघाला मोठा विजय मिळवून देण्यासाठी वाटचाल करीत आहे. रूट आता 42 वे कसोटी शतक नोंदविण्यासाठी प्रयत्न करेल. 1996 पासून पाकला इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकता आलेली नाही.

रॉबिनसनचा पराक्रम

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंडमध्ये वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनने नवा पराक्रम केला. त्याने या मालिकेतील पहिल्या कसोटीत पहिल्याच चेंडूवर बळी मिळविताना पाकच्या अवैसला खाते उघडण्यापूर्वी पायचीत केले. 1980 पासून इंग्लंडमध्ये आतापर्यंत खेळविण्यात आलेल्या कसोटी सामन्यातील हा नवा विक्रम म्हणावा लागेल. कसोटी क्रेकेटच्या इतिहासामध्ये यापूर्वी असा प्रराक्रम 11 वेळा झाला आहे. 2019-20 च्या क्रिकेट हंगामात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळविण्यात आलेल्या कसोटी मालिकेतील सामन्यांत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज अँडरसनने द. आफ्रिकेच्या डीन एल्गारला पहिल्याच चेंडूवर बाद केले होते.

चेंडूचे दोन भाग

कसोटी सामन्यात सर्वाधिक गडी बाद केल्यानंतर तो गोलंदाज आठवण म्हणून चेडू स्वत:कडे ठेवतो. पण या सामन्यात रॉबिन्सन आणि टंग यांनी प्रत्येकी 5 गडी बाद केल्याने त्यांना ही कोंडी फोडण्यासाठी चेंडूचा अर्धा भाग देण्यात आला. 2006 नंतर एकाच डावात प्रत्येकी 5 बळी घेणारे रॉबिन्सन आणि टंग हे इंग्लंडचे पहिले गोलंदाज ठरले आहेत. लीड्स कसोटीच्या पहिल्याच दिवशी गोलंदाजांनी दिवस गाजविताना एकूण 12 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक : पाक प. डाव 48.1 षटकांत सर्वबाद 171 (अब्दुल्ला शफीक 61, इमामुल हक 42, सलमान आगा 21, रिझवान 12, शेहजाद 14, अवांतर 9, रॉबिनसन 5-51, टंग 5-46), इंग्लंड प. डाव 28.2 षटकांत 2 बाद 119 (रुट खेळत आहे 42, कॉक्स खेळत आहे 24, डकेट 15, गे 33, मोहम्मद अब्बास व मोहम्मद अली प्रत्येकी 1 बळी).



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत