Headlines

Jammu and Kashmir is an integral part of India!


अमेरिकन राजदूत सर्जिओ गोर यांचे मोठे वक्तव्य : मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची घेतली भेट

वृत्तसंस्था/ श्रीनगर

अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी बुधवारी काश्मीरला भेट दिली. अमेरिकेच्या राजदूतांनी श्रीनगरमध्ये मुख्यमंत्री अब्दुल्ला यांची भेट घेतली. याप्रसंगी त्यांनी जम्मू काश्मीर हा भारताचाच एक महत्त्वाचा अविभाज्य भाग असल्याचे वक्तव्य केले. या दौऱ्यात गोर यांनी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची भेट घेत आर्थिक सहकार्य व विकासाच्या मुद्यांवर चर्चा केली. अनेक वर्षांनंतर अमेरिकेच्या राजदूतांचा काश्मीरला हा पहिलाच स्वतंत्र दौरा आहे.

जम्मू-काश्मीर भारताचा एक महत्त्वाचा भाग असल्याचे भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी बुधवारी सांगितल्यामुळे या भागावर दावा करणाऱ्या शत्रूराष्ट्र पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यादरम्यान गोर  यांनी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या भेटीनंतर एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मी या ठिकाणी पहिल्यांदाच भेट देत आहे. हे एक अविश्वसनीय सुंदर ठिकाण असल्याचे ते म्हणाले. तसेच अमेरिका जम्मू-काश्मीरबाबतच्या आपल्या प्रवासविषयक सल्ल्यावर पुनर्विचार करेल, असेही त्यांनी स्पष्ट पेले. अमेरिका वेळोवेळी प्रवासविषयक सूचना जारी करत त्यांचा आढावा घेते. मी आज येथे कोणतीही मोठी घोषणा करू शकत नाही, पण आम्ही त्यावर सकारात्मक विचार करू शकतो. अमेरिकन नागरिकांना येथील सौंदर्य आणि उपलब्ध संधी पाहण्यासाठी भेट द्यायला आवडेल, असे गोर यांनी नमूद केले.

‘ऑपरेशन सिंदूर’नंतरची पहिली भेट

गेल्यावर्षीच्या ऑपरेशन सिंदूर आणि मे 2020 मध्ये पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर अमेरिकेच्या एका वरिष्ठ राजदूताची काश्मीरला ही पहिलीच भेट आहे. गोर हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे दक्षिण आणि मध्य आशियासाठी विशेष दूत म्हणूनही काम पाहतात. या प्रदेशातील वाढत्या धोरणात्मक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, अलिकडच्या वर्षांत गोर यांच्या भेटीकडे अमेरिकेचा एक महत्त्वपूर्ण राजनैतिक प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे.

राज्यावर चर्चा करण्याची संधी : अब्दुल्ला

अमेरिकन राजदूर सर्जिओ गोर यांच्या भेटीत अमेरिका-भारत संबंधांवर, विशेषत: जम्मू-काश्मीरवर चर्चा करण्याची संधी मिळाली, असे ओमर अब्दुल्ला म्हणाले. आमची भेट खूप चांगली झाली. आम्हाला आपल्या दोन देशांमधील संबंधांवर चर्चा करण्याची संधी मिळाली, परंतु विशेषत: जम्मू आणि काश्मीरच्या बाबतीत अमेरिका काय करू शकते यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. अर्थातच, काही जुने प्रश्न आहेत जे आम्ही वेळोवेळी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. नजिकच्या काळात ही चर्चा पुढे नेण्यास आपण उत्सुक आहोत, असेही ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले.

पाकिस्तानचा तीळपापड

पाकिस्तानव्याप काश्मीर म्हणजेच ‘पीओके’मध्ये सुरू असलेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर, भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर काश्मीर दौऱ्यावर पोहोचले आहेत. या दौऱ्यात त्यांनी जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची भेट घेत येथील अमेरिकेचे योगदान वाढवण्यावर भर दिल्याने पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. गुरुवारी ते लडाखचाही दौरा करणार आहेत. जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन्ही भारताचे केंद्रशासित प्रदेश आहेत.

गेल्या सात वर्षात काश्मीरची मोठी प्रगती

2019 मध्ये केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा समाप्त केला आणि संविधानातील कलम 370 हटवले. त्यानंतर जम्मू-काश्मीरचे पुनर्गठन करून जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले.

कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये शासन-प्रशासन, पायाभूत सुविधा आणि विकासाच्या आघाडीवर मोठ्या प्रमाणात काम झाले असल्याचा केंद्र सरकारचा दावा आहे. दहशतवादावर नियंत्रण मिळवण्यातही लक्षणीय यश मिळाले. आज खोऱ्यात अनेक मोठ्या विकास प्रकल्पांवर काम सुरू असून पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळत आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांचा काश्मीर दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. कारण एका बाजूला भारताच्या जम्मू-काश्मीरमध्ये विकासकामे आणि पर्यटनाला चालना मिळत असल्याचे चित्र आहे. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानच्या नियंत्रणाखालील काश्मीरमध्ये आर्थिक आणि राजकीय असंतोष वाढत आहे.

तीन दशकांत अमेरिकेच्या काश्मीर धोरणात मोठा बदल

अमेरिकेचे राजदूत काश्मीरला भेट देण्याची ही पहिलीच वेळ नाही. सर्जियो गोर यांच्यापूर्वीही अनेक अमेरिकी राजदूतांनी काश्मीरचा दौरा केला आहे. 1990 च्या दशकात काश्मीरमध्ये दहशतवाद वाढत असताना या भागाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. त्या काळात काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थाची भूमिका बजावण्याचे अमेरिकेचे धोरण होते. मात्र भारताने कधीही या भूमिकेला मान्यता दिली नाही. आता अमेरिकन राजदूर सर्जिओ गोर काश्मीरच्या भूमीत पाय ठेवून मोठे वक्तव्य केल्याने या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत