Dhananjaya de Silva on India vs Sri Lanka Test : भारताविरुद्धच्या पराभवानंतर धनंजय डी सिल्वा भावूक झाला. गॉलची खेळपट्टी, नाणेफेक आणि भारतीय फलंदाजांनी सामना कसा फिरवला, याबाबत श्रीलंकेच्या कर्णधाराने स्पष्ट सांगितले.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : गॉल कसोटीत शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने यजमान श्रीलंकेचा १६५ धावांनी धुव्वा उडवत ऐतिहासिक विजय नोंदवला. या दारुण पराभवानंतर श्रीलंकेचा कर्णधार धनंजय डी सिल्वा चांगलाच भावूक झालेला पाहायला मिळाला. चौथ्या डावात फलंदाजी करणे अत्यंत कठीण असल्याचे त्याने सामन्यानंतर मान्य केले. पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये बोलताना डी सिल्वाने गॉलची खेळपट्टी, नाणेफेक आणि भारतीय फलंदाजांचे वर्चस्व यावर मोकळेपणाने भाष्य केले आहे.
काय म्हणाला धनंजय डी सिल्वा?
सामन्यानंतर बोलताना धनंजय डी सिल्वा म्हणाला की, “मला वाटले होते की दुसऱ्या दिवसापासून आम्ही सामन्यात चांगले पुनरागमन केले आहे. आमच्या खेळाडूंनी चौथ्या डावातही चांगला लढा दिला. हे अजिबात सोपे नव्हते, पण होय, मला वाटते की हा एक अतिशय चांगला कसोटी सामना होता.”
गॉलच्या खेळपट्टीबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना तो म्हणाला, “सुरुवातीचे ३ दिवस ही खेळपट्टी फलंदाजीसाठी खूप चांगली होती. गॉलमध्ये चौथ्या दिवशी फलंदाजी करणे कधीच सोपे नसते, हे सर्वांनाच माहीत होते. मात्र, राहुल आणि पडिक्कल यांनी जी भक्कम सुरुवात करून दिली, त्यामुळे ते अधिक मजबूत स्थितीत पोहोचले आणि तिथूनच त्यांनी आमच्यावर दबाव टाकण्यास सुरुवात केली.”
नाणेफेकीचाच फटका बसला का?
नाणेफेकीने सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावली का? या प्रश्नावर श्रीलंकेच्या कर्णधाराने स्पष्टपणे होकार दिला. तो म्हणाला, “कदाचित होय, टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत धावफलकावर मोठी धावसंख्या उभारली. जेव्हा आम्ही फलंदाजी करत होतो, तेव्हा आम्ही सुरुवातीलाच झटपट विकेट्स गमावल्या आणि तिथूनच आम्ही सामन्यात पिछाडीवर पडलो.”
या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद ४६२ धावांचा डोंगर उभा केला होता. यात युवा फलंदाज देवदत्त पडिक्कलने १६७ धावांची ऐतिहासिक खेळी साकारली. याला उत्तर देताना श्रीलंकेचा पहिला डाव २८४ धावांवर आटोपला आणि भारताला १७८ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली. त्यानंतर दुसऱ्या डावात भारताने १९३ धावा करत श्रीलंकेसमोर विजयासाठी ३७२ धावांचे भक्कम लक्ष्य ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना यजमान श्रीलंकेचा संघ २०६ धावांवर सर्वबाद झाला आणि भारताने १६५ धावांनी दिमाखदार विजय मिळवला.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा