Headlines

मतदार यादी पुनरिक्षणात 78.85 टक्के प्रपत्रे जमा


सावंतवाडी प्रतिनिधी : महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाच्या प्रक्रियेत घरोघरी जाऊन गणना प्रपत्र भरून घेण्याची मोहीम पूर्ण झाली आहे. 30 जून ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत राज्यातील एकूण 9.78 कोटी मतदारांपैकी 7.71 कोटी म्हणजेच 78.85 टक्के मतदारांनी गणना प्रपत्र भरून स्वाक्षरीसह सादर केले.

उर्वरित 2.07 कोटी (21.15 टक्के) मतदारांची नावे ‘Uncollectable EF’(गणना प्रपत्र संकलित करता आले नाही) गटात समाविष्ट करण्यात आली आहेत. नियमानुसार किंवा प्रत्यक्ष वस्तुस्थितीनुसार या मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यास पात्र नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

‘Uncollectable EF’ गटातील मतदारांमध्ये 75.52 लाख मतदार आढळून न आलेले अथवा गैरहजर आहेत. 76.80 लाख मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित झाले आहेत. तर 34.81 लाख मतदार मृत असल्याची नोंद आहे. याशिवाय 17.63 लाख मतदार अन्यत्र नोंदणी झालेले अथवा दुबार आहेत. 2.23 लाख मतदार इतर या वर्गवारीत आहेत.

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असून ती मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना सॉफ्ट तसेच हार्ड कॉपीच्या स्वरूपात उपलब्ध करून दिली जाणार आहे. ‘Uncollected EF’ गटातील ज्या मतदारांची नावे प्रारूप यादीत समाविष्ट करता आली नाहीत, त्यांच्या याद्याही संबंधित शासकीय कार्यालयांच्या सूचना फलकावर तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर एक महिन्याच्या कालावधीत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. प्रारूप यादीत नाव नसलेले मतदार तसेच 1 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकापूर्वी 18 वर्षे पूर्ण करणारे नवमतदार या कालावधीत मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना 6, घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करू शकतील. तसेच मतदार यादीतील नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी नमुना 8, तर एखाद्या व्यक्तीचे नाव मतदार यादीतून वगळण्यासाठी संबंधित मतदारसंघातील कोणताही मतदार नमुना 7 भरून हरकत घेऊ शकणार आहे. मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून प्राप्त अर्जांची पडताळणी करण्यात येईल. त्यानंतर पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट केली जातील.

मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नोंद दुरुस्त करणे किंवा नाव वगळण्यासाठी अर्ज करताना खोटी घोषणा अथवा चुकीचे विधान केल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 च्या कलम 31 नुसार संबंधित व्यक्तीला एक वर्षापर्यंतची शिक्षा, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत