- Marathi News
- National
- Drug Use Increased By 34% In 10 Years; New Smuggling Route Through Andaman In India, New Challenges Revealed By NCB UN Report
नवी दिल्ली16 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

जगभरात ड्रग्जचे सेवन करणाऱ्यांची संख्या गेल्या दहा वर्षांत ३४ टक्क्यांनी वाढून २०२४ मध्ये ३३.१ कोटींवर पोहोचली आहे. २०२३ मध्ये ड्रग्जच्या सेवनामुळे सुमारे पाच लाख जणांचा मृत्यू झाला. हा आकडा दशकभरापूर्वीच्या तुलनेत २९ टक्क्यांनी अधिक आहे. आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेट्सनी सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी भारतात अमली पदार्थांच्या तस्करीसाठी नवा मार्ग वापरण्यास सुरूवात केली.
संयुक्त राष्ट्रांच्या मादक पदार्थ व गुन्हे कार्यालयाच्या (यूएनओडीसी) ‘वर्ल्ड ड्रग रिपोर्ट’ व भारताच्या एनसीबीच्या ताज्या अहवालांच्या विश्लेषणातून हा धक्कादायक खुलासा झाला आहे. म्यानमारमधील सुरू असलेल्या अंतर्गत लष्करी संघर्षामुळे ड्रग माफियांनी पारंपरिक तस्करीचे मार्ग बदलले आहेत. त्यांनी हिंदी महासागरातील अंडमान सागरी मार्गाचा नव्या पश्चिमेकडील कॉरिडॉर म्हणून विकास केला आहे.या नव्या मार्गानुसार प्रतिबंधित ड्रग्जची खेप थेट भारतात आणण्याऐवजी प्रथम समुद्रमार्गे श्रीलंका आणि मालदीवमध्ये पोहोचवली जाते.
ड्रग्ज पुरवठ्यात १०० पट वाढ
एनसीबीच्या अहवालानुसार भारत-पाकिस्तान सीमेवर ड्रोनद्वारे होणारी तस्करी मोठी डोकेदुखी ठरली आहे. २०२१ मध्ये अशा केवळ ३ घटना समोर आल्या होत्या, तर २०२५ मध्ये त्यांची संख्या १०० पट वाढून ३०५ वर पोहोचली. या मार्गाने हेरॉईन,मेथॅम्फेटामाइन यांसारखे धोकादायक ड्रग्ज भारतात पाठवले जात आहेत. याचा सर्वाधिक फटका पंजाब सीमेला बसला.
संपूर्ण आशिया खंडात गांजा/भांगाची सर्वात मोठी बाजारपेठ भारतात आहे. या बाजाराला ड्रग्जचा पुरवठा कोणत्याही बाहेरील देशातून होत नसून, भारतातीलच बेकायदी लागवडीतून केला जात आहे.
- पश्चिम – मध्य युरोपमधील बेकायदा बाजारपेठांत पोहोचणाऱ्या ‘केटामाइन’ या ड्रग्जचा स्रोत भारत असल्याचे आढळले. हे वैध वैद्यकीय पुरवठा साखळीतून पुरवतात.
लँड कॉरिडॉर : एनएच-१०२ मार्गे मणिपूरचा वापर
म्यानमार (गोल्डन ट्रँगल) येथून येणाऱ्या ड्रग्जसाठी ईशान्य भारतातील भू-सीमा हे प्रमुख प्रवेशद्वार बनले आहेत. एनएच-१०२ वरील ‘मणिपूर कॉरिडॉर’, मिझोराम मार्गाचा वापर केला जातो. तपास यंत्रणांनी भारत-नेपाळ, भारत-बांगलादेश सीमांना तस्करीचा नवा मार्ग म्हणून ओळखले.
लक्ष्य : दिल्ली-एनसीआर, मुंबई, बेंगळुरूसारखी शहरे
गेल्या वर्षी जप्त केलेल्या एकूण २२६ किलो कोकेनपैकी १०८.०६ किलो महाराष्ट्रातून जप्त केले.नंतर दिल्लीत ५५.४९ किलो, तामिळनाडूत १५.६० किलो, कर्नाटकात १४.५२ किलो कोकेन जप्त केले. दिल्ली-एनसीआर, मुंबई व बेंगळुरूसारख्या महागड्या बाजारपेठांवर तस्करांची नजर आहे.
धोका : अफू लागवड दुपटीवर
अफगाणिस्तानमध्ये बंदी लागू झाल्यानंतर भारतीय उपखंडात अफूची बेकायदा लागवड करण्याचे प्रयत्न वेगाने वाढले.भारत,पाकिस्तानमध्ये सुरक्षा यंत्रणांनी नष्ट केलेल्या अफूच्या शेतीचे क्षेत्र २०२२ मध्ये ५,८६८ हेक्टर होते, ते २०२३ मध्ये दुपटीहून अधिक वाढून १३,२०० हेक्टरपर्यंत पोहोचले.
