![]()
नवी दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयात राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’चा अवमान झाल्याचा निषेध करत भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो), पुणे शहरच्या वतीने डेक्कन परिसरातील गुडलक चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडल्याचा आरोप भाजयुमोने केला आहे. या आंदोलनात भाजयुमोचे शेकडो पदाधिकारी, महाविद्यालयीन तरुण-तरुणी आणि राष्ट्रभक्त नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वाविरोधात तीव्र संताप व्यक्त करत मोठ्या घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना भारतीय जनता युवा मोर्चा, पुणे शहरचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांनी काँग्रेस पक्षावर आणि गांधी घराण्यावर टीका केली. मोहोळ म्हणाले, “काँग्रेस मुख्यालयात घडलेला प्रकार हा केवळ एका गीताचा अवमान नसून भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा, सार्वभौमत्वाचा आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या लाखो हुतात्म्यांचा थेट अपमान आहे.” ते पुढे म्हणाले की, “बंकिमचंद्र चटर्जी यांनी रचलेले ‘वंदे मातरम्’ हे केवळ राष्ट्रीय गीत नसून इंग्रजी हुकूमशाहीविरुद्ध लढणाऱ्या क्रांतीकारकांना फासावर जाताना ऊर्जा देणारा महामंत्र होता. ज्या पवित्र गीताने अखंड भारताला एकत्र आणले, त्याच गीताचा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहीर अनादर करून काँग्रेसची राष्ट्रविरोधी आणि तुष्टीकरणाची मानसिकता पुन्हा एकदा उघड केली आहे.” काँग्रेसच्या विचारसरणीवर टीका करताना मोहोळ यांनी ठाम भूमिका मांडली की, “या देशात राहायचे असेल तर प्रत्येकाला ‘वंदे मातरम्’ म्हणावेच लागेल आणि त्याचा आदर करावाच लागेल. देशभक्ती ही केवळ भाषणांमधून सिद्ध होत नाही, तर ती आचार, विचार आणि कृतीतून दिसावी लागते.” राहुल गांधी यांना थेट इशारा देताना दुष्यंत मोहोळ यांनी सांगितले की, “काँग्रेस मुख्यालयात राष्ट्रीय गीताचा अवमान करून देशातील १४० कोटी जनतेच्या भावना दुखावल्याबद्दल राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी देशाची जाहीर व बिनशर्त माफी मागितली पाहिजे.” जर राहुल गांधींनी या प्रकरणी जाहीर माफी मागितली नाही, तर आगामी २२ ऑगस्ट रोजी पुण्यात होणारा त्यांचा नियोजित दौरा भारतीय जनता युवा मोर्चा कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ देणार नाही. भाजयुमोचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून त्यांचा पुणे दौरा उधळून लावतील, असा इशारा त्यांनी दिला. गुडलक चौकात झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी हातात तिरंगा ध्वज, फलक घेऊन ‘वंदे मातरम् चा अपमान सहन करणार नाही’, ‘काँग्रेस पक्षाचा धिक्कार असो’, ‘राहुल गांधी माफी मागा’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणा दिल्या.
Source link
काँग्रेस मुख्यालयात 'वंदे मातरम्'चा अवमान:सोनिया, राहुल, खरगे यांच्याविरोधात भाजयुमोचे पुणे शहरात तीव्र आंदोलन; माफी न मागितल्यास दौरा उधळणार
