Headlines

Tukaram Mundhe Son Booked Restaurant on Birthday Owner scared seeing last name in reservation List; हे मुंढे कोण आहेत? रिझर्व्हेशन लिस्टमध्ये नाव पाहताच रेस्टॉरंट चालक चपापले, मित्राचा फोन, तुकाराम मुंढेंच्या मुलाचा भन्नाट किस्सा


मुंबई : आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात अन्न आणि औषध प्रशासन विभाग सध्या विविध कॅफे, रेस्टॉरंट, खानावणी यांच्यावर धाडी टाकून सदोष ठिकाणी कारवाई करताना दिसत आहे. रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवण करणे आपल्याला फारसे आवडत नसल्याचे तुकाराम मुंढे यांनी आधीही सांगितले होते. इतकंच काय, तर आता कुठलंही स्ट्रीट फूड आपल्याला आवडत नाही, असंही त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्पष्ट केले होते. तरीही अन्नसुरक्षेच्या दृष्टीने एफडीए विभागामार्फत करण्यात आलेल्या धडक कारवायांमुळे, केवळ त्यांच्या ‘मुंढे’ आडनावाचा उल्लेख झाला, तरी रेस्टॉरंट्समध्ये एक प्रकारची धावपळ निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मुंढे आडनावाचा दबदबा

‘एनडीटीव्ही प्रॉफिट’ला दिलेल्या मुलाखतीत, तुकाराम मुंढे यांनी एका अलिकडील घटनेबद्दल माहिती दिली. एका रेस्टॉरंटचे बुकिंग त्यांनी स्वतः केलेले नव्हते, तर त्यांच्या मुलाने केले होते. मात्र ‘मुंढे’ आडनावाचा दरारा किती आहे, याचा प्रत्यय त्यांना आला

“ही घटना अवघ्या दोन दिवसांपूर्वीची आहे. माझ्या मुलाचा वाढदिवस होता. त्याला त्याच्या मित्रांसोबत रेस्टॉरंटमध्ये जायचे होते आणि त्याने त्यासाठी ऑनलाइन बुकिंग केले होते,” असे तुकाराम मुंढे यांनी सांगितले. त्यामुळे रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांना प्रश्न पडला की खुद्द तुकाराम मुंढेच तिथे येत आहेत की काय.

Maharashtra TimesAditi Tatkare : ‘लेक लाडकी’ योजनेची अर्जप्रक्रिया सुलभ, 18 वर्षात 1 लाख 1 हजाराचा लाभ, ऑनलाईन फॉर्मबाबत आदिती तटकरेंची माहिती

तुकाराम मुंढेंच्या मुलाचं बूकिंग

मुंढेंनी सांगितले की, ही चर्चा माझ्या एका मित्रापर्यंत पोहोचली आणि त्या मित्राने मला फोन करुन विचारलं, की मी काही रेस्टॉरंटचं रिझर्व्हेशन केलं आहे का. “मी काही बुकिंग वगैरे केलेलं नाही” असं त्यांनी आपल्या मित्राला स्पष्ट केलं आणि लगेच ते आठवून म्हणाले, “मला वाटतं की माझा मुलगा असेल; त्याने कदाचित त्याच्या मित्रांना बर्थडे पार्टी देण्यासाठी हे बुकिंग केलं असावं”

‘मुंढे’ हे आडनाव पाहताच रेस्टॉरंटमध्ये ही प्रतिक्रिया उमटली. त्यामुळे सतर्कता नक्कीच दिसून येत आहे, असं एफडीए आयुक्तांनी अन्नसुरक्षा तपासण्यांवरुन रेस्टॉरंट्समध्ये असलेल्या दबदब्यावर भाष्य करताना सांगितलं. जरी ते सहसा जेवणासाठी बाहेर रेस्टॉरंटमध्ये जात नसले, तरी जेव्हा कधी जातात तेव्हा त्यांचे लक्ष अन्नसुरक्षेच्या निकषांकडे असते, असंही ते म्हणाले.

Maharashtra TimesMilind Narvekar : रश्मी शुक्लांना नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा, मिलिंद नार्वेकरांचं ट्वीट चर्चेत, ठाकरेंच्या विश्वासू नेत्याने पुन्हा बुचकळ्यात टाकलं

…तर मला सगळ्यात जास्त आनंद

आस्थापनांचे परवाने रद्द करण्यात मला कोणताही आनंद मिळत नाही; परंतु जेव्हा रेस्टॉरंट्स नियमांचे पालन करत नाहीत आणि तिथले अन्न सार्वजनिक आरोग्यास हानी पोहोचवू शकते, तेव्हा मला कारवाईचे पाऊल उचलावे लागते. जर सर्व अन्न-व्यवसायिकांनी अन्नसुरक्षेच्या कायद्यांचे पालन केले आणि एफडीएला छापे टाकण्याची गरजच पडली नाही, तर मला सर्वाधिक आनंद होईल, असं तुकाराम मुंढे म्हणाले.