Headlines

"आमदार कैलास पाटील हे 'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग":मंत्री प्रताप सरनाईकांचा मोठा दावा, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण




उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ठाकरे गटाला धक्के देण्याचे सत्र कायम ठेवले असून, नुकतेच सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घडामोडी ताज्या असतानाच, शिंदे गटाचे नेते आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी एक मोठे वक्तव्य करत राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग असल्याचा खळबळजनक दावा सरनाईक यांनी केल्यामुळे आता नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तुळजापूरमध्ये केंद्र सरकारची परवानगी नसलेल्या एका चिनी कंपनीचे सीसीटीव्ही कॅमेरे प्रताप सरनाईक यांच्याच आदेशाने बसवण्यात आले असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी नुकताच केला होता. या आरोपाला आता धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून, कैलास पाटील हे केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी असे आरोप करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना प्रताप सरनाईक यांनी एक मोठा दावा करत, आमदार कैलास पाटील हे ‘ऑपरेशन टायगर’चा दुसरा भाग असल्याचे म्हटले आहे. तसेच, ज्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरून पाटील आरोप करत आहेत, त्याच कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ते कधी आणि कुठे जातात, घरी कधी असतात, तुळजापूरला कधी जातात यावर आता आमची नजर असणार आहे आणि याच माहितीच्या आधारे आम्ही आमचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी करून दाखवू, असा मिश्किल टोलाही सरनाईक यांनी लगावला आहे. खड्ड्यांमुळे उद्योजक वैतागलेत; सरनाईकांचा शरद पवारांच्या दाव्याला दुजोरा राज्यातील औद्योगिक वसाहतींमधील खराब रस्ते आणि खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे अनेक उद्योजक वैतागले आहेत, ही वस्तुस्थिती असल्याची स्पष्ट कबुली परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. पिंपरी-चिंचवड येथील उद्योगांच्या समस्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच राज्य सरकारला एक पत्र लिहिले होते. या पत्रातील दाव्यांना दुजोरा देत सरनाईक यांनी ही महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. धाराशिव दौऱ्यावर असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. उद्योजकांच्या समस्यांवर रविवारी उद्योगमंत्र्यांची महत्त्वाची बैठक उद्योजकांच्या या वाढत्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर, उद्योगमंत्री उदय सामंत हे येत्या रविवारी स्वतः पिंपरी-चिंचवड येथे जाऊन उद्योजकांशी थेट संवाद साधणार असल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिली. या बैठकीत उद्योजकांच्या सर्व अडचणी आणि समस्या समजून घेतल्यानंतर, राज्य सरकारकडून नक्कीच योग्य तो दिलासादायक मार्ग काढला जाईल, असा विश्वासही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत