Air India Pilot Dope Test : सूत्रांच्या माहितीनुसार, फुकेत-दिल्ली एअर इंडिया विमानाच्या पायलटच्या चाचणीत गांजा (मारिजुआना) या सायकोॲक्टिव्ह अमली पदार्थाचा वापर झाल्याचे आढळले आहे

अमली पदार्थाची अधिकृत माहिती नाही
वस्तुस्थितीचा निष्पक्ष, वस्तुनिष्ठ आणि तांत्रिकदृष्ट्या अचूक निष्कर्ष काढण्यासाठी तपास प्रक्रियेची सचोटी आणि गोपनीयता राखणे, अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे विमान अपघात तपास ब्युरोतर्फे (एएआयबी) अपूर्ण, पडताळणी न केलेल्या किंवा निवडक स्वरूपात उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे कोणतेही निष्कर्ष न काढण्याचे, आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे अमली पदार्थ सेवनाबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मंगळवारी उपलब्ध झाली नसल्याचे समोर आले.
गांजाचा वापर झाल्याची सूत्रांची माहिती
सूत्रांच्या माहितीनुसार, वैमानिकाच्या चाचणीत गांजा (मारिजुआना) या सायकोॲक्टिव्ह अमली पदार्थाचा वापर झाल्याचे आढळले आहे. ४ ऑगस्ट रोजी फुकेत-दिल्ली मार्गावरील एआय २३७९ या एअरबस ए ३२० विमानाला हवेत अचानक जोरदार धक्के बसल्याने विमानाची उंची ३०० फूटांनी कमी झाली होती. या घटनेत किमान २० प्रवासी आणि चार कर्मचारी जखमी झाले होते.
या घटनेनंतर विमानातील दोन्ही वैमानिकांची नियमानुसार सायकोॲक्टिव्ह पदार्थ सेवनाची तपासणी करण्यात आली. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने ९ ऑगस्ट रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, ‘कॅप्टनच्या (पायलट-इन-कमांड) स्क्रीनिंग चाचणीचा निकाल पुष्टीकरण चाचणीची गरज दर्शवणारा होता. त्यामुळे नमुने पुष्टीकरणात्मक विश्लेषणासाठी नियुक्त प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, अंतिम अहवालाची प्रतीक्षा आहे.’
Baramati Crime : अथर्व गोळी देऊन माझ्याशी संबंध ठेवणारे, आईला फोन, काही तासात मुलीचा गूढ मृत्यू, बारामतीत खळबळएएआयबी सध्या संबंधित सर्व तांत्रिक, संचालनविषयक, वैद्यकीय आणि मानवी घटकांशी संबंधित पुराव्यांचे पद्धतशीर संकलन, जतन आणि परीक्षण करत आहे. यामध्ये विमान आणि त्याच्या प्रणाली, नोंदवलेला उड्डाण डेटा, संबंधित कार्यान्वयन व देखभालविषयक नोंदी, वैद्यकीय माहिती आणि संबंधित व्यक्तींच्या मुलाखतींचे परीक्षण यांचा समावेश आहे.
संबंधित घटनेबाबत सुरू असलेल्या तपासादरम्यान ही घडामोड समोर आली आहे. ‘डिरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन’ने (डीजीसीए) या प्रकरणातील तपासाचा निकाल लागेपर्यंत संबंधित विमान कर्मचाऱ्यांना कर्तव्यावरून (रोस्टरमधून) बाजूला ठेवले होते.
तरीही, केवळ अंमली पदार्थांच्या प्राथमिक चाचणीत आलेला ‘नॉन-निगेटिव्ह’ (संशयास्पद) निष्कर्ष पाहून कोणताही अनुमान काढू नये, असा इशारा विमान वाहतूक क्षेत्रातील प्रतिनिधींनी दिला आहे.
वैमानिक संघटनांचं म्हणणं काय?
‘एअरलाइन पायलट्स असोसिएशन ऑफ इंडिया’चे अध्यक्ष कॅप्टन सॅम थॉमस यांनी सांगितले की, उड्डाणानंतर केल्या जाणाऱ्या अमली पदार्थ चाचणीच्या (ड्रग स्क्रीनिंग) निकालांवर सामान्यतः वापरली जाणारी औषधे आणि आहारातील पूरक घटकांचा (डायटरी सप्लिमेंट्स) परिणाम होऊ शकतो, याबद्दल या संघटनेने आपल्या सदस्यांना वारंवार जागरूक केले आहे.
‘फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्स’चे अध्यक्ष कॅप्टन सी. एस. रंधावा यांनी सांगितले की, विमान कंपनीने डोपिंग चाचणीचे निकाल अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेले नाहीत; त्यामुळे, संबंधित वैमानिकाची चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आल्याचा दावा करणाऱ्या वृत्तांवर अधिकृत दुजोरा मिळेपर्यंत ते कोणतीही प्रतिक्रिया देणार नाहीत.
“सध्या विमान कंपनीकडून डोपिंग चाचणीचे निकाल अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाहीत, त्यामुळे आम्ही अधिकृत दुजोऱ्याची वाट पाहू. ती चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आली आहे, यावर मी भाष्य करणार नाही,” असे ते म्हणाले.
पायलटवर कारवाईची शक्यता
रंधावा यांनी नमूद केले की, जर चाचणीचा निकाल ‘पॉझिटिव्ह’ आला, तर दंडात्मक कारवाई आणि वैमानिकाच्या भविष्यावर परिणाम करणाऱ्या इतर परिणामांव्यतिरिक्त, त्याचे परवाना रद्द होणे ही देखील एक संभाव्य कारवाई असू शकते.

