विद्यार्थी आंदोलनांवर एकमेकांच्या विरोधात संघर्ष : विरोधकांच्या गोंधळ-घोषणांमुळे संसदेचे कामकाज अद्यापही ठप्प
वृत्तसंस्था
नवी दिल्ली
जंतरमंतर आणि झारखंड येथील विद्यार्थी आंदोलने आणि राम मंदिर दानपेटी अपहार या मुद्द्यांवरून संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार रणकंदन झाले आहे. दोन्ही बाजूंचे लोकप्रतिनिधी एकमेकांच्या विरोधात घोषणा देत एकमेकांच्या समोर उभे ठाकल्याचे दृश्य पहावयास मिळाले.
सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि विरोधक यांच्यामध्ये मंगळवारी संसदेत मोठी खडाजंगी झाल्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित झाल्याची घोषणा दोन्ही सभागृहांच्या अध्यक्षांकडून करण्यात आली. झारखंड येथील विद्यार्थी आंदोलकांवर सोमवारी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात लाठीहल्ला केला. जंतरमंतर आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कथित अत्याचारासंबंधी कांगावा करणाऱ्या राहुल गांधी यांनी झारखंड येथील पोलिसी दडपशाहीविरोधात तोंडात मिठाची गुळणी का धरली आहे, असा परखड प्रश्न भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्ष यांच्या लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला. त्यावर, झारखंडमधील घटनांवरही राहुल गांधी बोलले आहेत, असे प्रत्युत्तर विरोधी पक्षांनी, विशेषत: काँग्रेसकडून देण्यात आले आहे..
मकरद्वारावर घोषणाबाजी
विरोधी पक्षांच्या सदस्यांनी संसदेच्या ‘मकरद्वारा’नजीक एकत्र जमून घोषणा दिल्या. अमित शाह यांनी संसदेत आमच्या प्रश्नांना उत्तर दिले पाहिजे. 20 जुलैला संसदेवर नेण्यात आलेल्या मोर्चावर लाठीमार आणि पेलेट गन्स गोळीबार करण्याचा आदेश कोणी दिला, हे अमित शाह यांनी संसदेत येऊन स्पष्ट करावे, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. शाह यांच्यावर त्यांनी वेगवेगळे आरोपही केले.
विरोधकांचा दुतोंडी अपप्रचार
अमित शाह विरोधकांच्या कोणत्याही शंकांचे समाधान करण्यास सज्ज आहेत. विरोधकांनाच शाह यांचे म्हणणे ऐकण्याची इच्छा नाही. कारण शाह विरोधी पक्षांचेच पितळ उघडे पाडतील, अशी भीती विरोधकांना वाटते. त्यामुळे, अमित शाह यांनी उत्तर द्यावीत, अशी मागणी विरोधी पक्ष करतात. तथापि, संसदेत ते प्रचंड गोंधळ घालतात आणि कामकाज होऊ देत नाहीत. हा त्यांचा दुहेरी खेळ जनतेच्या लक्षात आलेला नाही. परिणामी, विरोधी पक्षांचे तंत्र फोल आणि अपयशी ठरणार आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असाही हल्लाबोल सत्ताधाऱ्यांनी केला आहे.
राम मंदिराचे अपहार प्रकरण
विरोधकांनी अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटी अपहार प्रकरणीही सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी सरकारने स्पष्टीकरण द्यावे. या प्रश्नावर संसदेत चर्चा केली जावी, अशी विरोधकांची मागणी आहे. राम मंदिरासंबंधीचा मुद्दा उत्तर प्रदेशातील असला, तरी तो राष्ट्रीय मुद्दा असल्याने त्यावर संसदेत चर्चा होणे आवश्यक आहे, असे विरोधकांचे म्हणणे असून सरकार त्यासाठीही सज्ज आहे.
केंद्राचा प्रस्ताव
संसदेतील कोंडी संपविण्यासाठी सरकारी पक्षांकडून विरोधी पक्षांना प्रस्ताव देण्यात आला आहे. संसदीय व्यवहार मंत्री किरण रिजीजू यांनी सोमवारी तो स्पष्ट केला आहे. या प्रस्तावानुसार अमित शाह विरोधी पक्षांच्या सर्व प्रश्नांना संसदेत उत्तरे देतील. मात्र, विरोधी पक्षांनी चर्चेत व्यत्यय आणता कामा नये, अशी अट आहे. विरोधी पक्षांनी ही अट फेटाळल्याने चर्चा होणे अशक्य असल्याचे दिसते.
दलाल-गांधी शब्दयुद्ध
संसद सभागृहांच्या बाहेर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर उभे असताना भारतीय जनता पक्षाचे खासदार मुकेश दलाल आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्यात जोरदार शब्दयुद्ध झाले. झारखंड येथील आंदोलक विद्यार्थ्यांवर तेथील पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीहल्ल्यावर काँग्रेसचे मत काय अशी पृच्छा दलार यांनी केली. त्यांनी झारखंड लाठीहल्ल्याच्या संदर्भात काँग्रेसविरोधात घोषणा दिल्या. राहुल गांधी यांनी झारखंडमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली आहे, असे उत्तर प्रियांका गांधी यांनी दिले. सत्ताधारी बाजूचे प्रतिनिधी निदर्शने करत आहेत, असे प्रथमच घडत आहे, अशी टिप्पणीही गांधी यांनी यावेळी केली.
संसद अद्यापही ठप्पच
ड संसदेच्याबाहेर दोन्ही बाजूंच्या खासदारांची एकमेकांच्या विरोधात निदर्शने
ड चर्चा हवी असणारे राहुल गांधी आता पळ काढत आहेत : भाजपचा आरोप
ड भाजप खासदार दलाल आणि प्रियांका गांधी यांच्यात जोरदार शब्दयुद्ध
