सावंतवाडी प्रतिनिधी : संपूर्ण देशात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता झाल्यानंतर आता ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यकाळात १९६२ मध्ये भारत-चीन, तर १९६५ मध्ये भारत-पाकिस्तान अशी दोन युद्धे झाली. या युद्धांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक सैनिक सहभागी झाले होते. त्यापैकी काही सैनिक शहीदही झाले. या दोन्ही युद्धांना आता ६४ वर्षे पूर्ण होत आली आहेत. या युद्धांमध्ये सहभागी झालेल्या शूरवीर विजयी योद्ध्यांची भेट घेऊन भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले. देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती असलेली आपली कृतज्ञता आणि प्रेमभावना त्यांनी या उपक्रमातून व्यक्त केली.
सह्याद्री पट्ट्यातील कलंबिस्त पंचक्रोशीतील दोन युद्धांमध्ये सहभागी झालेले शूरवीर योद्धे विठ्ठल बाबाजी सावंत यांच्या निवासस्थानी श्री. परब यांनी भेट देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. तसेच ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत आयोजित तिरंगा यात्रेच्या निमित्ताने त्यांचा गौरव केला.
कलंबिस्त हे गाव सैनिकांची गाथा सांगणारे गाव म्हणून ओळखले जाते. या गावातील जवळपास पाच ते सात माजी सैनिकांनी भारत-चीन आणि भारत-पाकिस्तान या दोन्ही युद्धांमध्ये सहभाग घेतला असून, ते विजयी होऊन परतले आहेत. अशा शूरवीर सैनिकांची भेट घेऊन त्यांचा सन्मान करण्याचा अनोखा उपक्रम श्री. परब यांनी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राबविला.
तिरंगा यात्रा यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर त्याचाच एक भाग म्हणून भाजप युवा नेते विशाल परब आणि ‘हर घर तिरंगा’ अभियानाचे जिल्हा संयोजक संदीप गावडे यांनी १० ते १३ ऑगस्टदरम्यान सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील देशसेवा करणाऱ्या सैनिकांचा सन्मान करून त्यांचे आशीर्वाद घेण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार सह्याद्री पट्ट्यातील या सैनिकी गावाला श्री. परब यांनी भेट दिली. यावेळी भारत-पाकिस्तान आणि भारत-चीन युद्धांमध्ये सहभागी झालेल्या विजयी शूर योद्ध्यांची भेट घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. माजी सैनिक विठ्ठल सावंत यांच्याशी श्री. परब यांनी संवाद साधला.
यावेळी सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर, पंचायत समिती सदस्य प्रथमेश सावंत, भाजप आंबोली मंडल युवा मोर्चाचे अध्यक्ष विनेश तावडे, प्रवीण सावंत, निखिल बिडये, रामचंद्र सावंत, सैनिक पतसंस्थेचे वसुली अधिकारी सिद्धी सावंत आदी उपस्थित होते.
