Headlines

Kawad Yatra 2026 Plastic Containers Sold for 100 rs in Haridwar Video Goes Viral | कावड यात्रेत श्रद्धेचा बाजार? ‘पैसे असतील तर घ्या, नाहीतर पुढे जा’, भगव्या रंगाचे रिकामे डबे १०० रुपयांना, हरिद्वारमधील व्हिडीओ व्हायरल


Haridwar Kawad Yatra: कावड यात्रेमुळे हरिद्वारमध्ये गंगाजल भरण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. या गर्दीचा फायदा घेत काही विक्रेते प्लास्टिकच्या बाटल्या आणि डबे तब्बल १०० रुपयांना विकत आहेत. हा व्हिडीओ पाहून नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.

Kawad Yatra 2026
(फोटो सौजन्य – skpradhan.in/Instagram)
श्रावण महिना सुरू झाला असून भाविकांची कावड यात्रा सुरू झाली आहे. या यात्रेदरम्यान शिवभक्त गंगा नदीचं पाणी कावडीतून आणून ते शिवलिंगावर अभिषेक करतात. त्यामुळे शिवशंकराचा आशीर्वाद मिळतो आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात, असा भाविकांचा विश्वास आहे. असो, पण या कावड यात्रेच्या निमित्तानं गंगाजल घेण्यासाठी हरिद्वारमध्ये प्रचंड गर्दी झाली आहे. पण लक्षवेधी बाब म्हणजे काही विक्रेत्यांनी भाविकांच्या श्रद्धेचं रूपांतर बिझनेसमध्ये केलंय. होय, ही मंडळी १० रुपयांचा प्लास्टिकचा डबा चक्क १०० रुपयांना विकत आहेत. अन् भाविकसुद्धा गंगाजल भरण्यासाठी मिळेल त्या किंमतीला प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या आणि डबे विकत घेताना दिसत आहेत.

नेमकं काय घडतेय?

​ ​

हरिद्वारमधील हा व्हिडीओ skpradhan.in या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, गंगा नदीच्या किनाऱ्यावर भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. आणि या गर्दीचा फायदा विक्रेते घेत आहेत. पाणी भरण्यासाठी लागणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या ८० ते १०० रुपयांना विकल्या जात आहेत. लक्षवेधी बाब म्हणजे ज्या बाटल्या प्लास्टिकच्या दुकानात १०-१५ रुपयांना मिळतात, त्याच बाटल्यांसाठी १० पट किंमत भाविक मोजत आहेत. अन् आश्चर्य म्हणजे देवाच्या नावाखाली ते दुप्पट-तिप्पट पैसे खर्च करत आहेत, याची जाणीवदेखील बहुतांशी लोकांना नाही, असं देखील या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.

कावड यात्रेसाठी भाविकांची गर्दी

हा व्हिडीओ १९ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसंच, या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. कोणी म्हणतंय, ‘लोकांच्या श्रद्धेचा बाजार केलाय,’ तर कोणी २० रुपयांची साधी पाण्याची बाटली खरेदी करून त्यामध्ये गंगाजल भरण्याची युक्ती सुचवत आहे. असो, या व्हिडीओवर तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया द्या. तुमचं काय मत आहे?

(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा