प्रथा बंद पाडण्याचा निर्धार : हुंडा घेतल्यास 11 लाखांचा दंड घालण्याचा निर्णय , स्त्राrभ्रूण हत्याही रोखणार
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव : हुंड्यासारखी अनिष्ट प्रथा बंद पाडण्यासाठी अनेक कायदे झाले आहेत. तरीही आजही हुंड्याशिवाय लग्ने होत नाहीत, अशी परिस्थिती आहे. मुलीच्या लग्नासाठी काढलेल्या कर्जापायी अनेक जणांवर आत्महत्येची वेळ येते. काही मुलींच्या वाट्याला लग्नानंतरही हुंड्याच्या जाचामुळे हालअपेष्टाच येतात. या अनिष्ट प्रथेपासून बाहेर पडण्याचा निर्णय लमाणी समाजाने घेतला आहे.
समाजातील प्रमुखांनी वेगवेगळ्या तांड्यांमध्ये व्यापक जनजागृती करून ‘हुंडा हटाव, तांडा बचाव’चा नारा दिला आहे. यासाठी समाजातील नेतृत्वानेच पुढाकार घेतला आहे. या जागृती मोहिमेला समाजाकडूनही प्रतिसाद मिळाला असून आठवडाभरापूर्वी यरगट्टी येथे 35 हून अधिक तांड्यांच्या प्रमुखांची बैठक घेऊन हुंडामुक्त समाजाचा संकल्प सोडून शपथ घेण्यात आली आहे.
यापुढे समाजातील कोणीही हुंडा घेतल्यास तब्बल 11 लाख रुपये दंड घालण्याचा निर्णय झाला आहे. समाज व भावी पिढीच्या हितासाठी व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे या प्रक्रियेतील प्रमुख मानाप्पा राठोड यांनी सांगितले. हुंडा नको, समानता हवी, असा नारा देत सौंदत्ती, रामदुर्ग, बेळगाव, धारवाड, मुधोळसह वेगवेगळ्या ठिकाणच्या 35 हून अधिक तांड्यांच्या प्रमुखांनी या निर्णय प्रक्रियेत सहभाग घेतला आहे.
लमाणी समाजाच्या प्रमुखांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. एखाद्या लग्नानंतर हुंड्यामुळे येणारा कर्जबाजारीपणा, त्यामुळे होणारे आत्महत्येचे प्रकार, स्त्राrभ्रूण हत्या रोखण्यासाठी व लग्नाच्या निमित्ताने होणाऱ्या कर्जबाजारीपणातून समाजाला मुक्त करण्यासाठी आपल्या समाजातील प्रमुखांनी हा निर्णय घेतल्याचेही मानाप्पा राठोड यांनी सांगितले. एखाद्या लग्नाच्यावेळी किती खर्च करावा? वधू-वराकडील मंडळींनी कोणती भूमिका निभावावी? याचे नियोजनही करण्यात आले आहे. समाजप्रमुखांनी घेतलेल्या या निर्णयाचे उल्लंघन करून हुंड्याची प्रथा जिवंत ठेवणाऱ्यांना 11 लाख रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.
आजवर कायद्याने जे शक्य झाले नाही ते समाजाने पुढाकार घेऊन हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथेवर व स्त्राrभ्रूण हत्येवर आघात करण्यासाठी लमाणी समाज एकवटला आहे. हा निर्णय घेण्यासाठी समाजातील प्रमुखांना मोठ्या प्रमाणात जागृती करावी लागली. तब्बल तीन-चार महिने 35 तांड्यांना भेटी देऊन त्या तांड्यातील प्रमुखांना विश्वासात घेऊन हुंड्याच्या प्रथेमुळे कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो, कर्जबाजारीपणा कसा येतो? याविषयी जागृती करण्यात आली आहे.
हुंड्याबरोबरच स्त्राrभ्रूण हत्या रोखण्यासाठीही समाजाने निर्णय घेतला आहे. मुलींना महालक्ष्मीचे स्थान देऊन त्यांचा गौरव केला पाहिजे. बालविवाह थोपवले पाहिजेत. त्यांना शिक्षण देण्याकडे लक्ष पुरविले पाहिजे. हुंडा मागणे आणि देणे दोन्ही थांबवले पाहिजे, अशी शपथ यरगट्टी येथील समाजाच्या व्यापक बैठकीत समाजबांधवांना देण्यात आली आहे. नानूसाद महाराज, संत सेवालाल महाराज, निलासाद महाराज, आदिशक्ती जगदंबा, आदिशक्ती रेणुकादेवी यांच्या नावे शपथ घेऊन हुंडा व स्त्राrभ्रूण हत्येविरुद्ध ठराव मांडून या निर्णयाप्रमाणे वागण्याचे ठरविण्यात आले आहे.
लग्न ठरविण्यासाठी मोठी गर्दी करायची नाही, डीजे लावायचा नाही, वधू-वरांचे नातेवाईक आणि काही प्रमुख यांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने कार्यक्रम करावा. दोन्ही कुटुंबीयांवर आर्थिक भार पडू नये, याची दक्षता घ्यावी, असे ठरविण्यात आले आहे. या निर्णयासंबंधी बोलताना पांडुरंग नायक म्हणाले, 35 तांड्यांना जाऊन आम्ही जागृती केली आहे. त्या त्या तांड्यातील नेते, कारभारींवर आम्ही जबाबदारी सोपविली होती. समाजात मुलींचे शोषण होऊ नये, लग्नासाठी कर्ज काढून त्याची परतफेड करण्यासाठी आटापिटा करू नये यासाठी घेतलेल्या ‘हुंडा हटाव, तांडा बचाव’ या निर्णयाला प्रत्येक तांड्यातून प्रतिसाद मिळाला आहे. या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्यांवर 11 लाखांचा दंड लावण्यात येणार आहे. दंडाची रक्कम समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी वापरण्यात येणार असल्याचेही या नेत्यांनी सांगितले.
