Headlines

सावंतवाडीच्या सौंदर्याने चिपळूणचे नगरसेवक भारावले


सावंतवाडी/प्रतिनिधी : सावंतवाडी हे संस्थानकालीन शहर सुंदर आहे. या शहरातील पर्यटनस्थळे आम्हाला भावली. खरंच, या शहराच्या प्रेमात पडावे असेच हे शहर आहे. सावंतवाडी नगरपालिकेने शहर स्वच्छ व सुंदर ठेवले आहे, अशा शब्दांत चिपळूण नगरपालिकेच्या नगरसेवकांनी सावंतवाडी शहराचे कौतुक केले.

चिपळूण नगरपालिकेच्या जवळपास ३२ नगरसेवकांनी सावंतवाडी शहराला भेट दिली. यावेळी त्यांनी सावंतवाडी शहरातील संस्थानकालीन विविध पर्यटनस्थळे, स्वच्छ व सुंदर शहर तसेच मोती तलावाचा संपूर्ण परिसर न्याहाळला. यावेळी सावंतवाडी नगरपालिकेच्या पर्यटन सभापती मोहिनी मडगावकर यांनी चिपळूणच्या नगरसेवकांचे स्वागत करून शहरातील विविध पर्यटनस्थळांची माहिती दिली. मोती तलावाचा परिसर, नरेंद्र डोंगर, संस्थानकालीन राजवाडा, सावंतवाडी नगरपालिकेची इमारत तसेच बाजारपेठ या ठिकाणांना त्यांनी भेट दिली.

शहरातील गार्डन आणि स्वच्छता पाहून चिपळूणच्या नगरसेवकांनी समाधान व्यक्त केले. ‘असे सुंदर शहर आम्ही पहिल्यांदाच पाहिले,’ असे सांगत त्यांनी सावंतवाडी शहराच्या सौंदर्याचे कौतुक केले. यावेळी सभापती आनंद वगी, सभापती मोहिनी मडगावकर, सभापती दीपाली भालेकर आणि सभापती प्रतीक बांदेकर यांनी सावंतवाडीत प्रस्तावित असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती चिपळूणच्या नगरसेवकांना दिली. यावेळी चिपळूणच्या नगरसेविका रसिका हेळेकर यांनी आभार व्यक्त केले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत