Headlines

नर्सी नामदेव येथे भाविकांची मांदियाळी:दुपारी बारावाजेपर्यंत 2 लाख भविकांनी घेतले दर्शन, परतवारीसाठी लाखो भाविकांच्या रांगा




संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी नामदेव येथे रविवारी ता. 9 परतवारीचा भक्तीसोहळा अनुभवायला मिळाला आहे. हरिनामाच्या गजरात दुपारी बारा वाजेपर्यंत सुमारे 2 लाख भाविकांनी संत नामदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. भाविकांच्या गर्दीने नर्सी नामदेव परिसर फुलून गेला आहे. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेले भाविक आषाढी एकादशी नंतर पंधरा दिवसांनी येणाऱ्या कामिका एकादशीला परतवारीच्या दिवशी संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी नामदेव येथे संत नामदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येतात. नर्सी येथे दर्शन घेतल्या शिवाय पंढरपूरची वारी पूर्ण होत नाही अशी अख्यायिका आहे. त्यामुळे मराठवाडा, विदर्भासह परिसरातील जिल्हयातून भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे यावारीला परतवारी असे संबोधले जाते. दरम्यान, परतवारीच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन संस्थानकडून जय्यत तयारी करण्यात आली. यामध्ये सहा वॉटरप्रुफ मंडप उभारण्यात आले तर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली. शनिवारी ता. 8 रात्री बारा वाजता भिकाजी कदम, ओमप्रकाश हेडा, भिकुलाल बाहेती, किसन मुटकुळे यांच्या हस्ते महापूजा झाली. यावेळी संस्थानचे उपाध्यक्ष भिकाजी किर्तनकार, उपसरपंच ज्ञानेश्‍वर किर्तनकार यांच्यासह संस्थानच्या विश्‍वस्तांची उपस्थिती होती. दरम्यान, शनिवारी रात्री पासूनच भाविकांची गर्दी झाल्यामुळे मध्यरात्री बारा वाजता महापुजेनंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. रविवारी ता. 9 दुपारी बारा वाजेपर्यंत सुमारे 2 लाख भाविकांनी संत नामदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतरही भाविकांची गर्दी सुरुच होती. भाविकांच्या वाहतुकीच्या सोयीसाठी हिंगोली आगाराने जादा बसगाड्या सोडल्या आहेत. या शिवाय भाविक देखील मिळेल त्या वाहनाने नर्सी नामदेव येथे दाखल होऊ लागले आहेत. भाविकांसाठी ओमप्रकाश हेडा यांच्या वतीने 100 क्विंटल साबुदाना खिचडीचे वाटप केले जात आहे. जाणार आहे. या शिवाय नर्सी नामदेव येथे पायी येणाऱ्या भाविकांसाठी दानशूरांच्या मदतीने चहा, पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यावर्षी भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता पोलिस प्रशासनाकडून जादा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक घारगे यांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत