![]()
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील अन्वा रोडवर असलेल्या राजकुवर महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचा स्लॅब कोसळून एक मोठी दुर्घटना घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी बांधकाम सुरू असताना अचानक स्लॅबचा काही भाग खाली कोसळला. या भीषण दुर्घटनेत मलब्याखाली दबून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य चार मजूर जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, या अचानक घडलेल्या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. महाविद्यालयाचे बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळल्याने अनेक मजूर मलब्याखाली अडकले आणि घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, इतर कामगार आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने धाव घेतली. नागरिकांनी जीवाची पर्वा न करता जेसीबीच्या साहाय्याने शर्थीचे प्रयत्न करत मजुरांना बाहेर काढले. या दुर्घटनेत मोतीलाल रामजी मिरगे (वय 50, रा. मुठाड, ता. भोकरदन) यांचा मृत्यू झाला. तर कृष्णा नामदेव हिरे (वय 30, रा. दगडवाडी), कृष्णा विठ्ठल शिंदे (वय 40, रा. वाकडी), फारुख खा शारूख खा (वय 38, रा. दानापूर) आणि लक्ष्मण गणेश ठोंबरे (वय 30, रा. सुरंगळी) हे चार जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू मलब्यातून बाहेर काढल्यानंतर सर्व जखमींना तातडीने भोकरदन येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासोबतच पुढील आणि आवश्यक त्या वैद्यकीय उपचारांसाठी जखमींवर भोकरदन तसेच जालना येथे उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पोटापाण्यासाठी मजुरी करणाऱ्या एका निष्पाप कामगाराचा या दुर्घटनेत नाहक बळी गेल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. बांधकाम सुरक्षेवर प्रश्नचिन्ह हा स्लॅब नेमका कशामुळे कोसळला, याचे निश्चित कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र, या दुर्घटनेनंतर काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेमुळे बांधकामाची गुणवत्ता आणि मजुरांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. सध्या संबंधित यंत्रणांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्याचे काम सुरू असून, दुर्घटनेच्या कारणांचा सखोल तपास केला जात आहे. या घटनेच्या निमित्ताने बांधकाम क्षेत्रात सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याची आवश्यकता पुन्हा एकदा प्रकर्षाने अधोरेखित झाली आहे.
Source link
भोकरदनमध्ये महाविद्यालयाच्या इमारतीचा स्लॅब कोसळला:एका मजुराचा मृत्यू, चार जखमी; बांधकाम सुरू असताना दुर्घटना
