![]()
हवेली तालुक्यातील शिरसवाडी येथे गोळीबार करून ११ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील तीन सराईत आरोपींना पुणे गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. मध्य प्रदेशातील उज्जैन येथून या आरोपींना जेरबंद करण्यात आले. गुन्हे शाखेच्या युनिट-७ आणि दरोडा व वाहनचोरी पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास शिरसवाडी येथील गावडेवाडी परिसरात ही घटना घडली. फिर्यादींचा भाऊ कारमधून जात असताना तिघा अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर जीवघेणा गोळीबार केला. यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर आरोपींनी त्याच्या गळ्यातील सुमारे ११ लाख रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या साखळ्या जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनास्थळावरील तांत्रिक पुरावे, मोटारसायकलचा मागोवा आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली. त्यानंतर विशेष पथकाने मध्य प्रदेशात सापळा रचून तिघांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अविनाश कृष्णचंद्र त्रिपाठी (वय ४३), सुरेंद्रपाल रामचंद्र पाल (वय ३२) आणि मोहम्मद शोएब वसीम खान (वय ३७) यांचा समावेश आहे. मुख्य आरोपी अविनाश त्रिपाठी हा उत्तर प्रदेश आणि नेपाळमध्ये अनेक दरोड्यांच्या गुन्ह्यांत वॉन्टेड होता. त्याच्या अटकेसाठी ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. त्याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न आणि दरोड्यासह सुमारे २० गंभीर गुन्हे दाखल आहेत. २०१८ मध्ये उत्तर प्रदेश एसटीएफने त्याला चकमकीनंतर अटक केली होती. दुसरा आरोपी सुरेंद्रपाल पाल याच्याविरुद्ध १२ ते १३, तर मोहम्मद शोएब खान याच्याविरुद्ध पाच गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आरोपींकडून लुटीतील मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेल्या अग्निशस्त्राचा शोध सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
Source link
11 लाखांचे दागिने लुटणारी आंतरराज्यीय टोळी 24 तासांत जेरबंद:पुण्यात गोळीबार करून दरोडा; मुख्य आरोपी उत्तर प्रदेशात वॉन्टेड
