Headlines

Amit Shah: मशिदीत अजान होणार नाही तर काय होणार? फुटीर खासदारांचा शहांना सवाल; भाजप सरकारविरोधात ठाम भूमिका


तीन फुटीर खासदारांनी दिल्लीत केंद्रीय गृह मंत्री अमित शहांची भेट घेतली. या खासदारांनी सलग दुसऱ्या दिवशी सत्ताधारी एनडीएच्या बैठकीला दांडी मारली. यानंतर ते शहांच्या भेटीला पोहोचले.

amit shah and wb
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नवी दिल्ली: संसदेच्या अधिवेशनामुळे दिल्लीत लक्षवेधी घडामोडी सुरू आहेत. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसची सत्ता गेल्यावर २० खासदारांनी ममता बॅनर्जी यांची साथ सोडली. ममता बॅनर्जी यांची साथ सोडत बंडखोरी करणाऱ्या ३ मुस्लिम खासदारांनी सलग दुसऱ्या दिवशी एनडीएच्या बैठकीत सहभाग घेतलेला नाही. या खासदारांनी बंगालमधील भाजप सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

पश्चिम बंगाल सरकारनं मशि‍दींवरील लाऊडस्पीकर उतरवण्याची सक्ती केली आहे. या निर्णयाचा तिन्ही खासदारांनी विरोध केला. गुरुवारी या खासदारांनी दिल्लीत केंद्रीय गृह मंत्री अमित शहांची भेट घेतली. सुवेंदू अधिकारी यांच्या सरकारनं मशि‍दींवरील लाऊड स्पीकरबद्दल घेतलेल्या निर्णयाला विरोध असल्याचं तिन्ही खासदारांनी शहांना सांगितलं. युसुफ पठाण , अबु ताहिर खान आणि खलिलुर रहमान यांनी शहांची भेट घेत त्यांची भूमिका मांडली.

Maharashtra TimesTMC Split: पक्षांतर केलंय, पण भाजपला पाठिंबा दिलेला नाही! 3 फुटीर खासदारांची गुगली; NDAच्या बैठकीला दांडी
मुस्लिम समुदायाबद्दल काही चुकीचं घडल्यास आम्हाला वाईट वाटेल. मशि‍दीत अजान होणार नाही तर मग काय होणार, असा सवाल मुर्शिदाबादचे खासदार अबु ताहिर खान यांनी अमित शहांना विचारला. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशांचं पालन व्हावं. पण मशि‍दीवरील लाऊड स्पीकर उतरवणं ठीक नसल्याचं मत त्यांनी मांडलं. या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती अबु ताहिर खान यांनी शहांकडे केली. खलीलुर रहमान, अबु ताहिर खान आणि युसूफ पठाण यांनी केंद्रीय गृह मंत्री अमित शहांना या संदर्भात संयुक्त पत्र दिलं आहे.

स्थानिक पोलीस प्रशासनाकडून मशि‍दींना लाऊड स्पीकर आणि मायक्रोफोन हटवण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. देशातील कायदा आणि सर्वोच्च न्यायालयानं ध्वनी प्रदूषणाच्या नियंत्रणासाठी दिलेल्या सूचनांचा आम्ही पूर्णपणे आदर करतो, असा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. नियम लागू करताना भेदभाव केला जाऊ नये. कायदे सगळ्यांसाठी समान असावेत. एखाद्या समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घेतली जावी, असं आवाहन तीन खासदारांनी शहांना केलं.

Maharashtra TimesPM Modi: PM मोदींचा VIDEO हटवल्याबद्दल मेटाकडून माफी, अल्टिमेटमनंतर शरणागती; ‘त्या’ बैठकीची इनसाईड स्टोरी
शहांची भेट घेतलेले तिन्ही खासदार मुर्शिदाबाद जिल्ह्यातील मतदारसंघांमधून निवडून आले आहेत. हा जिल्हा मुस्लिमबहुल आहे. तिन्ही खासदार एनसीपीआयचा भाग आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यावर पक्षाच्या २० खासदारांनी एनसीपीआयमध्ये प्रवेश केला. एनसीपीआयनं एनडीएला पाठिंबा दिलेला आहे. पण तीन मुस्लिम खासदारांनी आपण एनडीए सोबत नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.आणखी वाचा