![]()
पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील यांच्या निधनानंतर अंतिम दर्शनासाठी त्यांचे पार्थिव कसबा बावडा येथील ‘यशवंत निवास’ येथे ठेवण्यात आले होते. दिवसभर हजारो नागरिक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रांगा लावत आपल्या लाडक्या ‘दादा’ना अखेरचा निरोप दिला.
सायंकाळी कुटुंबाकडून धार्मिक विधी पार पडल्यानंतर दुपारी 4 वाजता सुरू झालेली अंत्ययात्रा मेडिकल कॉलेज, लाईन बाजार, भगवा चौक आणि कसबा बावड्यातील प्रमुख मार्गांवरून पॅव्हेलियन मैदानामध्ये पोहोचली. या संपूर्ण मार्गावर नागरिकांनी पुष्पवृष्टी करत “डी. वाय. दादा अमर रहे” अशा घोषणांनी वातावरण भारावून टाकले.
डॉक्टर डी वाय पाटील यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह विविध पक्षांचे वरिष्ठ नेते, मंत्री, खासदार, आमदार तसेच शैक्षणिक कला, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
डॉ. डी. वाय पाटील यांची अंत्ययात्रा अंत्यविधीस्थळी पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण केले. तसेच सुशीलकुमार शिंदे, हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर, शाहू छत्रपती, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अंबादास दानवे, राजू शेट्टी, संभाजीराजे छत्रपती, विश्वजित कदम, अमित देशमुख, यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली.
अंत्यसंस्कारावेळी डी. वाय. पी. समूहाचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला. त्या क्षणी उपस्थित हजारो नागरिकांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले. पाटील कुटुंबीयांसह आमदार सतेज पाटील, विजय पाटील, अजिंक्य पाटील आणि ऋतुराज पाटील आणि सर्व कुटुंबीय उपस्थित होते.
एका सामान्य शेतकरी कुटुंबातून प्रवास सुरू करत डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षणाच्या बळावर देशभरात शेकडो शैक्षणिक संस्था आणि अनेक विद्यापीठांचे जाळे उभे केले. बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. शिक्षणाबरोबरच आरोग्य, क्रीडा आणि समाजसेवा क्षेत्रातील त्यांच्या कार्यामुळे ते देशभर आदराचे स्थान मिळवू शकले.
दरम्यान, कसबा बावडा परिसरातील अनेक व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली. पॅव्हेलियन मैदानावर जनसागर उसळला होता. एका युगपुरुषाचा प्रवास संपला असला, तरी त्यांनी उभारलेला शिक्षणाचा विशाल वारसा आणि लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात पेटवलेला ज्ञानाचा दीप पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहणार आहे.
