Cricketer Akhilesh Reddy News : व्हॉट्सॲप मेसेज आणि कॉल डिटेल्स डिलीट करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अखिलेश रेड्डीचा कसा भांडाफोड झाला? क्रिकेटच्या प्रतिमेला डाग लावणाऱ्या या संपूर्ण फिक्सिंग कट कसा रचला आणि कोण आहे अखिलेश? जाणून घ्या

कोण आहे अखिलेश रेड्डी?
२६ वर्षांचा बोदुगुम अखिलेश रेड्डी मूळचा हैदराबादचा आहे. भारतात असताना त्याने स्थानिक क्रिकेटमध्ये ‘विजय हजारे ट्रॉफी’च्या संघात स्थान मिळवले होते. याशिवाय त्याने आयपीएलमधील ‘सनरायझर्स हैदराबाद’ (SRH) संघासाठी नेट बॉलर म्हणूनही कार्य केले. परंतु, क्रिकेटमधील संधींच्या शोधात तो अमेरिकेला गेला आणि तेथील राष्ट्रीय संघात त्याची निवड झाली. उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ-स्पिन गोलंदाजी करणाऱ्या रेड्डीने केमन आयलंड्सविरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने अमेरिकेसाठी ४ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले असून त्यात १ विकेट मिळवली आहे.
हॉटेलच्या खोलीत रचला फिक्सिंगचा कट
हे संपूर्ण प्रकरण २०२५ मध्ये संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे झालेल्या अबू धाबी T10 टूर्नामेंट मधील आहे. सामन्याच्या काही तास आधी अखिलेश रेड्डीने टीम हॉटेलमध्ये आपल्याच संघातील एका सहकाऱ्याला गाठले. गोलंदाजी करताना मुद्दाम जास्त धावा दे, असा फिक्सिंगचा प्रस्ताव त्याने सहकाऱ्यासमोर ठेवला. ज्या खेळाडूला रेड्डीने फिक्सिंगची ऑफर दिली होती, त्याने ती लगेच नाकारली. एवढेच नाही तर त्याने या संपूर्ण प्रकाराची माहिती तात्काळ आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाला दिली. तक्रार झाल्याचे समजताच अखिलेश रेड्डीने घाबरून आपल्या मोबाईलमधील व्हॉट्सॲप मेसेज आणि कॉल डिटेल्स डिलीट करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तपासादरम्यान त्याने हा उडवा उडवीची उत्तरे दिली, मात्र चौकशी समितीने त्याची उत्तर फेटाळून लावत मुद्दाम पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होता हे स्पष्ट केले.
३ आरोपांखाली दोषी
आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी न्यायाधिकरणाने रेड्डीला तीन मुख्य आरोपांखाली दोषी ठरवले आहे.
- सामना चुकीच्या पद्धतीने प्रभावित करणे किंवा फिक्स करण्याचा प्रयत्न करणे.
- इतर खेळाडूला मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी होण्यासाठी उकसवणे.
- तपासादरम्यान मेसेज आणि कॉल डिटेल्स डिलीट करून पुरावे नष्ट करणे.
दरम्यान, आयसीसीने रेड्डीला २१ नोव्हेंबर २०२५ रोजी तात्पुरते निलंबित केले होते, त्यामुळे याच तारखेपासून त्याची ८ वर्षांची बंदी लागू मानली जाईल.
अमेरिकन क्रिकेटच्या प्रतिमेला मोठा धक्का
अखिलेश रेड्डीचे हे प्रकरण अशा वेळी समोर आले आहे जेव्हा अमेरिकन क्रिकेट आधीच भ्रष्टाचारामुळे चर्चेत आहे. याच वर्षी अमेरिकेचा आणखी एक आंतरराष्ट्रीय खेळाडू आरोन जोन्स यालाही बार्बाडोसच्या ‘BIM10 लीग’मधील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे तात्पुरते निलंबित करण्यात आले होते. भ्रष्टाचाराची माहिती लपवणे आणि तपासात सहकार्य न करणे असे आरोप त्याच्यावर होते. एकापाठोपाठ एक समोर येणाऱ्या अशा प्रकरणांमुळे अमेरिकन क्रिकेटच्या प्रतिमेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

