Headlines

‘सिंघम’ स्टाईलने काढली आरोपाची धिंड पण आता प्रकरण अंगलट ; आयुक्तांसह १२ जणांना मानवाधिकार आयोगाची नोटीस


Pune Police: लक्ष्मी नगर पोलिस ठाण्याच्या परिसरामध्ये रेहमान शेख नावाच्या व्यक्तिला पोलिसांनी पकडून त्याला शिवीगाळ करत मारहाण करत भर रस्त्यातून त्याची धिंड काढली. मात्र हे प्रकरण आता पोलिसांच्या अंगाशी आलय

_ pune police
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
पुणे : गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याच्या हेतूने एका आरोपीची भररस्त्यात परेड काढणे पुणे पोलिसांच्या चांगलेच अंगलट आले आहे. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने या प्रकाराची अतिशय गंभीर दखल घेतली असून, पुणे शहराच्या पोलीस आयुक्तांसह एकूण १२ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना थेट नोटीस बजावली आहे. मानवी हक्क संरक्षण कायद्यातील कलम १६ च्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

भररस्त्यातून काढली धिंड

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी नगर पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये सुलतान रेहमान शेख नावाच्या एका व्यक्तीला पोलिसांनी पकडले होते. त्यानंतर त्याला मारहाण करत आणि शिवीगाळ करत त्याची भररस्त्यातून धिंड काढण्यात आली. एवढेच नाही तर, भरचौकात लोकांसमोर त्याला कान पकडून उठाबशा काढायला लावत जाहीर माफी मागायला लावली होती.

मानवी अधिकारांचे थेट उल्लंघन झाल्याचे नमूद

या बेकायदेशीर कृत्याविरोधात तानाजी प्रभाकर करचे आणि स्वप्नील जाधव यांनी आयोगाकडे रीतसर दाद मागितली होती. तक्रारदारांनी सादर केलेले फोटो आणि इतर पुराव्यांवरून पोलिसांनी कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता स्वतःच आरोपीला रस्त्यावर शिक्षा दिल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. हा प्रकार संबंधित व्यक्तीच्या मूलभूत मानवी अधिकारांचे थेट उल्लंघन असल्याचे आयोगाने आपल्या आदेशात ठळकपणे नमूद केले आहे.

Maharashtra TimesNagpur Pregnancy Case: बनावट ‘आधार कार्ड’वापरून अल्पवयीन मुलीची प्रसूती;पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड

खालील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना बजावली नोटीस

मानवाधिकार आयोगाने या प्रकरणी राज्याचे मुख्य सचिव आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना प्रतिवादी बनवले आहे. यामध्ये पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनीकांत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम, रविकांत नंदनवार, शिवाजी विभुते, महेश नलावडे. पोलीस कर्मचारी अमोल गायकवाड, भीमराव कांबळे, अमोल वायाळ, दत्तात्रय शिंदे, सूरज अंबासे आणि कादिर शेख. यांचा समावेश आहे.

Maharashtra Timesमृत्यूछायेत निवारा! मुंबई महानगर प्रदेशात 8014 इमारती धोकादायक; कोणत्या परिसरात धोका अधिक?

काय कारवाई होणार, याकडे संपूर्ण पोलीस दलाचे लक्ष

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनीनेहमीच कायद्याच्या चौकटीत राहून काम करणे अपेक्षित असते. मात्र, अलीकडच्या काळात ‘सिंघम’ चित्रपटासारखी स्टाईल मारून थेट रस्त्यावरच न्याय देण्याची एक नवीन पद्धत पोलिसांकडून वापरली जात होती. कायद्याला बाजूला ठेवून अशा प्रकारचा ‘शॉर्टकट’ वापरणाऱ्या पोलिसांना आयोगाच्या या कठोर पावलामुळे मोठा धक्का बसला आहे. आता या सर्व अधिकाऱ्यांवर नेमकी काय कारवाई होणार, याकडे संपूर्ण पोलीस दलाचे लक्ष लागून राहिले आहे.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा