Headlines

गुंतवणुकीचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक:आरोपींना 4 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी; 25 ते 30 कुटुंबं संकटात




मोर्शी शहरातील दीप कॉलनी परिसरात एका दाम्पत्याने इतर दोन आरोपींसह नागरिकांची तब्बल ७ कोटी १९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. जादा परताव्याचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी मोर्शी पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनुसार, आरोपी दाम्पत्याने सुरुवातीला नातेवाईक आणि परिचितांकडून एक ते दीड कोटी रुपये घेतले. विश्वास संपादन करण्यासाठी काही जणांना ठरल्याप्रमाणे जादा रक्कम आणि व्याज परत केले. यामुळे नागरिकांचा त्यांच्यावर विश्वास बसला. त्यानंतर, एका कंपनीत गुंतवणूक केल्यास भरघोस व्याज मिळेल, असे सांगून अनेकांना पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले. या आमिषाला बळी पडून अनेकांनी ५ लाख, १० लाख, २० लाख, तर काहींनी तब्बल दीड कोटी रुपयांपर्यंतची रक्कम आरोपींकडे दिली. हा प्रकार गेल्या पाच ते सात वर्षांपासून सुरू असल्याचे बोलले जात आहे. काही काळानंतर गुंतवणूकदारांनी पैसे परत मागण्यास सुरुवात केली असता, संबंधित महिलेने पैसे परत न करता टाळाटाळ केली. पैसे मागण्यासाठी गेल्यावर ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे नाटक करत असल्याचाही आरोप नागरिकांनी केला आहे. अखेर, संकटात सापडलेल्या सुमारे ३० कुटुंबांतील महिला-पुरुषांनी अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्याकडे तक्रार केली. अनेक कुटुंबांनी आयुष्यभराची बचत गमावली आहे. काहींनी कर्ज काढून, निवृत्तीवेतन, शेती विक्री किंवा इतर स्रोतांतून जमा केलेली रक्कम गुंतवल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. या तक्रारीनंतर ३१ जुलै रोजी मोर्शी पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध विविध गुन्हे दाखल केले. अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना ४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून, फरार असलेल्या इतर दोन आरोपींचा मोर्शी पोलीस युद्धपातळीवर शोध घेत आहेत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत