China J-20 Fighter Jets: भारताला लागून असलेल्या सीमावर्ती भागांमध्ये चीनच्या हालचाली वाढल्या आहेत. या परिसरातील हवाई तळांवर लक्षवेधी घडामोडी सुरू आहेत. सॅटेलाईट फोटोंमधून त्यांचा उलगडा झाला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
बीजिंग: चीन भारताविरोधात लष्करी पातळीवर मोठ्या हालचाली करत असल्याची माहिती फोटोंसह समोर आली आहे. चीननं भारतीय सीमेच्या जवळ असलेल्या दोन हवाई तळांवर किमान १२ अत्याधुनिक जे-२० स्टील्थ लढाऊ विमानं तैनात केली आहेत. गेल्या काही वर्षांचा विचार केल्यास चीननं पहिल्यांदाच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (LAC) जवळ पाचव्या पिढीतील लढाऊ विमानं इतक्या मोठ्या संख्येनं तैनात केली आहेत. विशेष म्हणजे सगळी विमानं भारताच्या दिशेनं तैनात करण्यात आलेली आहेत.
कमर्शियल सॅटेलाईट कंपनी वेंटोरनं चिनी लढाऊ विमानांचे फोटो टिपले आहेत. पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्सनं शिनजियांगच्या होटन आणि तिबेटमधील डॅम्सुंग हवाई तळावर मोठ्या संख्येनं लढाऊ विमानं तैनात केल्याचं सॅटेलाईट फोटोतून स्पष्ट दिसत आहे. चीनच्या ताफ्यात असलेल्या J-20 ‘मायटी ड्रॅगन’चा समावेश पाचव्या पिढीतील अत्याधुनिक स्टील्थ लढाऊ विमानांमध्ये होतो. या विमानांची निर्मिती चेंगडु एअरक्राफ्ट कॉर्पोरेशननं केली आहे. ही विमानं रडारला सहज चकवा देतात. या विमानांमध्ये दूरवर मारा करणारी क्षेपणास्त्रं आणि अत्याधुनिक सेन्सर्स आहेत. शत्रूच्या लढाऊ विमानांना आणि महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्याच्या हेतूनं J-20 विमानांची निर्मिती करण्यात आलेली आहे. Iran Attacks Chinese Firm: इराणचं चाललंय काय? मित्रदेश चीनलाच धक्का, कंपनीवर क्षेपणास्त्रं डागली; जग आश्चर्यचकित वेंटोरनं प्रसिद्ध केलेल्या फोटोंमध्ये होटन हवाई तळावर आठ J-20 ‘मायटी ड्रॅगन’ स्टील्थ लढाऊ विमानं उभी असलेली दिसत आहेत. चीनच्या शिनजियांग उयगुर ऑटोनॉमस प्रांतात होटन हवाई तळ आहे. याचा वापर नागरी-लष्करी कारणांसाठी केला जातो. उत्तर लडाखमध्ये भारतीय हवाई तळाचा दौलत बेग ओल्डी फॉरवर्ड एअरबेस आहे. या एअरबेसपासून होटन एअरबेस २४५ किलोमीटरवर आणि लेहपासून ३८९ किलोमीटरवर आहे.
२५ जूनला काढण्यात आलेल्या सॅटेलाईट फोटोंमध्ये तिबेटच्या ल्हासा परिसरातील डॅक्सुंग हवाई तळावर आणखी ४ J-20 विमानं तैनात करण्यात आल्याचं दिसत आहे. सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या कव्हरखाली विमानं उभी करण्यात आलेली आहेत. डॅक्सुंग हवाई तळ अरुणाचल प्रदेशातील तवांगपासून जवळपास ३४४ किलोमीटर अंतरावर आहे. दोन्ही हवाई तळांवर कमीत कमी १२ J-20 स्टील्थ लढाऊ विमानं दिसून आली आहे. गेल्या काही वर्षांमधील स्थिती पाहिल्यास भारताच्या सीमेपासून जवळ असलेल्या हवाई तळांवर चीननं पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येनं लढाऊ विमानं तैनात केली आहेत. त्यामुळे भारतासाठी धोक्याची घंटा आहे. Crime News: थायलंडमध्ये 3 भारतीय पर्यटकांचं अपहरण; 5 भारतीयांना अटक, पाकिस्तानी सूत्रधार फरार; स्वस्त पॅकेज महागात विमानांची तैनाती का महत्त्वाची? J-20 चीनकडे असलेलं मुख्य स्टील्थ लढाऊ विमान आहे. स्टील्थ विमानांची निर्मिती आणि डिझाईन शत्रूच्या रडारला चकवा देण्यासाठी केलेली असते. इन्फ्रारेड सेन्सर आणि अन्य टेहळणी यंत्रणांना स्टील्थ विमानांचा शोध घेता येत नाही. विशिष्ट रचना, रडार शोषून घेण्याची सामग्री आणि भात्यात असलेली अत्याधुनिक हत्यारं यांच्यामुळे जे-२० विमानं अतिशय घातक ठरतात. शत्रू देशात घुसून अतिशय गुप्तपणे हल्ला करण्याची आणि सुरक्षित परतण्याची क्षमता जे-२० विमानांमध्ये आहे. जे-२० चीनकडे असलेलं सर्वात आधुनिक लढाऊ विमानांपैकी एक आहे.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.
पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.
मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.
‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.
टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.
लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.
लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.
२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.
शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा