सावंतवाडी, वार्ताहर : भारतीय बौद्ध महासभा, शाखा सावंतवाडी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही त्रैमासिक वर्षावास प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रवचनमालेचा शुभारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर सभागृहात बुधवार, दि. २९ जुलै रोजी सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते मोहन जाधव यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी त्रिशरण आणि पंचशील ग्रहण केले.
यानंतर मंगेश कदम यांनी प्रास्ताविक करून वर्षावास कार्यक्रमाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात राज्य शासनाच्या साहित्य व सांस्कृतिक महामंडळाचे सदस्य तथा जिल्ह्यातील नामवंत कवी विठ्ठल कदम आणि बौद्धाचार्य मिलिंद नेमळेकर यांनी “विश्वगुरू भगवान गौतम बुद्ध” या विषयावर मार्गदर्शनपर प्रवचन दिले. भारतीय बौद्ध महासभा, शाखा सावंतवाडी यांच्या वतीने पुढील तीन महिन्यांत सावंतवाडी तालुक्यातील विविध गावांमध्ये ही त्रैमासिक प्रवचनमाला आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे नियोजन शाखाध्यक्ष दिलीप जाधव, संस्कार विभागाचे उपाध्यक्ष मिलिंद नेमळेकर, सचिव चंद्रशेखर जाधव आणि महिला विभागाच्या अध्यक्षा मीनाक्षी तेंडोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
या प्रवचनमालेचा सांगता समारंभ २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सांगली बुद्ध विहार येथे होणार आहे. समारोपाच्या प्रवचनात “बौद्ध राजांचा १२०० वर्षांचा सुवर्णकाळ” या विषयावर ममता जाधव आणि बी. पी. कांबळी मार्गदर्शन करणार आहेत. शुभारंभ कार्यक्रमास मोहन जाधव, विठ्ठल कदम, मीनाक्षी तेंडोलकर, चंद्रशेखर जाधव, दिलीप जाधव, विठ्ठल जाधव, मंगेश कदम, सुनील जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
