पावसाळा सुरू झाला की फक्त छत्री किंवा रेनकोटचीच नव्हे, तर तुमच्या हातातील महागड्या गॅझेट्सचीही विशेष काळजी घ्यावी लागते. हो. हवेतील आर्द्रता आणि अनपेक्षित पावसामुळे स्मार्टफोन, इयरबड्स आणि स्मार्टवॉच यांसारखी डिव्हाइसेस ही खराब होण्याची भीती असते. योग्य वेळी योग्य काळजी घेतल्यास डिव्हाइसचे लाईफ वाढते आणि आर्थिक नुकसान देखील टळते. चला तर मग पावसाळ्यात कोणत्या डिव्हाईसेसची काळजी घ्यायला हवी, जाणून घेऊया.

1) स्मार्टफोन
पावसाळ्यात मोबाईल खिशात किंवा हातात असताना ओला होण्याची सर्वाधिक भीती असते. हे तुम्हाला माहितीच आहे. फोनला पाण्याच्या थेंबांपासून वाचवण्यासाठी बाजारात मिळणारे स्वस्त वॉटरप्रूफ पाउच किंवा झिपलॉक बॅग आवर्जून वापरा. जर फोन चुकून ओला झाला, तर तो तात्काळ स्विच ऑफ करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो ओला असताना कधीही चार्जिंगला लावू नका. ओल्या फोनमध्ये विद्युत प्रवाह सोडल्यास शॉर्ट सर्किट होऊन फोन कायमचा डेड होऊ शकतो. (REF.)
2) लॅपटॉप
आता तुमच्या कामाची वस्तू, ती म्हणजे लॅपटॉप. लॅपटॉप हे स्मार्टफोनपेक्षा जास्त संवेदनशील असतात. पावसाळ्यात प्रवास करताना लॅपटॉपसाठी वॉटरप्रूफ बॅग किंवा स्वतंत्र रेन कव्हर वापरावे. हवेतील ओलावा शोषून घेण्यासाठी लॅपटॉपच्या बॅगेत सिलिका जेलचे पॅकेट्स ठेवावेत. हे पांढरे लहान पाकिटे पिशवीतील दमटपणा शोषून घेतात आणि लॅपटॉपच्या अंतर्गत भागांना सुरक्षित ठेवतात. तसेच, पावसाच्या दिवसांत उघड्या खिडकीजवळ लॅपटॉप ठेवून कधीही काम करू नका.
3) इयरबड्स आणि हेडफोन
बाहेरून आल्यावर इयरबड्स टेबलवर फेकून देऊ नका. इयरबड्स कपाटात किंवा टेबलावर उघडे ठेवल्यास हवेतील आर्द्रतेमुळे त्यांचे चार्जिंग पोर्ट्स खराब होतात, यासाठी इयरबड्स सिलिकॉन केसमध्ये ठेवावेत आणि वापरत नसताना ते केस बंद करून ठेवावेत. मोठे हेडफोन्स असल्यास ते वॉटरप्रूफ पाऊचमध्ये साठवून ठेवावेत. (REF.)
4) स्मार्टवॉच
स्मार्टवॉच हातात घालतात पण त्याची काळजी देखील घेतली पाहिजे. अनेक स्मार्टवॉच वॉटर-रेझिस्टंट असतात, पण तरीही त्यांच्यावर सतत पाणी राहिल्यास डिस्प्ले आणि सेन्सर खराब होऊ शकतात. पावसात भिजल्यानंतर घड्याळाची स्क्रीन मायक्रोफायबर कपड्याने लगेच पुसून कोरडी करावी. तसेच, पावसाळ्यात घड्याळाला चामड्याचे पट्टे वापरण्याऐवजी वॉटरप्रूफ सिलिकॉन स्ट्रेप्स वापरावेत.
5) पॉवरबँक
प्रवासात सोबत नेणारे एक गॅझेट्स म्हणजे पॉवरबँक. पॉवरबँक ही बॅटरीचे स्त्रोत असल्याने ती दमट हवेच्या संपर्कात आल्यास फुगण्याची किंवा निकामी होण्याची शक्यता असते. पॉवरबँक नेहमी एका एअर-टाईट प्लास्टिक पिशवीत किंवा कोरड्या कप्प्यात ठेवावी. पावसाळ्यात प्रवासादरम्यान ती फोनसोबत एकाच ओल्या खिशात ठेवणे टाळावे.
6) कॅमेरा आणि लेन्स
फोटोग्राफीप्रेमींसाठी कॅमेरा आणि लेन्स म्हणजे जीव की प्राण, त्यांच्यासाठी पावसाळा कठीण असतो, कारण लेन्सवर बुरशी येण्याचा धोका असतो. कॅमेरा आणि त्याच्या लेन्स सुरक्षित ठेवण्यासाठी ते सिलिका जेलयुक्त हवाबंद बॉक्समध्ये साठवावेत. लेन्स उघड्या न ठेवता त्यांच्यावर नेहमी डस्ट कॅप्स लावून ठेवाव्यात.
7) टीव्ही आणि होम अप्लायन्सेस
वरील गॅझेट्सकडे लक्ष देताना होम अप्लायन्सेसकडे दुर्लक्ष करायला नकोत. घरातील टीव्ही किंवा म्युझिक सिस्टम भिंतीला एकदम चिटकवून ठेवू नका; कारण पावसाळ्यात भिंतींना येणाऱ्या दमटपणामुळे टीव्हीच्या मागच्या भागातील सर्किट बोर्ड खराब होऊ शकतात. डिव्हाइसना भिंतीपासून थोडे लांब ठेवा जेणेकरून हवेचा प्रवाह सुरू राहील. विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू असताना टीव्ही आणि राउटरचे प्लग सॉकेटमधून काढून ठेवणे सर्वात सुरक्षित मानले जाते.
(Disclaimer: प्रस्तुत वृत्त केवळ उपलब्ध माहिती, सर्वसामान्य संदर्भांच्या आणि इन्स्टाग्रामवरील विविध डिजिटल रील्स व व्हिडिओंवरून घेतलेल्या माहितीच्या आधारावर तयार करण्यात आले आहे. या वृत्तातील माहितीची अचूकता, पूर्णता किंवा विश्वासार्हतेबाबत ‘मटा’ (महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन) कोणताही दावा करत नाही किंवा त्याची पुष्टी करत नाही.)

