भारतीय स्वयंपाकघरात प्रेशर कुकरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. डाळ, भाजी, मांसाहारी पदार्थ यांसोबतच भात शिजवण्यासाठीही प्रेशर कुकर अतिशय सोयीचा आहे. मात्र अनेक वेळा प्रेशर कुकरमध्ये भात शिजवल्यानंतर तो कडक, चिकट किंवा कोरडा होतो. योग्य प्रमाणात पाणी न घालणे, तांदूळ नीट न धुणे किंवा शिजवण्याची पद्धत चुकीची असणे यामुळे अशी समस्या निर्माण होते. जर तुम्हाला प्रेशर कुकरमध्ये नेहमी मऊ, फुललेला आणि चविष्ट भात हवा असेल तर काही सोप्या टिप्स लक्षात ठेवा. या लेखामध्ये आपण प्रेशर कुकरमध्ये भात शिजवण्याची योग्य पद्धत आणि भात मऊ होण्यासाठी उपयुक्त उपाय पाहणार आहोत.

भात मऊ आणि फुललेला होण्यासाठी सर्वप्रथम तांदूळ योग्य प्रकारे धुणे महत्त्वाचे आहे. तांदूळ २ ते ३ वेळा स्वच्छ पाण्याने धुतल्याने त्यातील अतिरिक्त स्टार्च निघून जातो आणि भात चिकट होण्याची शक्यता कमी होते. शक्य असल्यास तांदूळ १५ ते २० मिनिटे पाण्यात भिजवून ठेवावा. यामुळे तांदळाचे दाणे पाणी शोषून घेतात आणि शिजल्यानंतर ते अधिक मऊ व लांबट होतात. प्रेशर कुकरमध्ये भात शिजवताना पाण्याचे प्रमाण हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे १ कप तांदळासाठी १.५ ते २ कप पाणी पुरेसे असते. मात्र तांदळाच्या प्रकारानुसार हे प्रमाण थोडे बदलू शकते. नवीन तांदूळ आणि जुना तांदूळ यांना लागणारे पाण्याचे प्रमाण वेगळे असते. त्यामुळे आपल्या वापरातील तांदळानुसार प्रमाण ठरवणे चांगले. (फोटो सौजन्य :- @PriyaNarayana’s kitchen)
योग्य तांदळाची निवड करा
मऊ, चविष्ट आणि फुललेला भात बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य प्रकारचा तांदूळ निवडणे. बाजारात तांदळाचे अनेक प्रकार उपलब्ध असतात आणि प्रत्येक तांदळाची चव, सुगंध, शिजण्याची पद्धत आणि पोत वेगवेगळा असतो. योग्य तांदूळ निवडला तर प्रेशर कुकरमध्येही भात कडक न होता मऊ आणि स्वादिष्ट होतो.
रोजच्या जेवणासाठी साधा तांदूळ वापरू शकता.
दैनंदिन जेवणासाठी वापरला जाणारा साधा तांदूळ सहज शिजतो आणि त्यापासून मऊ भात तयार होतो. अशा तांदळासाठी साधारणपणे तांदूळ आणि पाण्याचे प्रमाण योग्य ठेवले तर भात छान फुलतो. घरातील रोजच्या वापरासाठी हा तांदूळ किफायतशीर आणि सोयीचा पर्याय आहे.
लिंबाचा छोटा उपयोग
भात शिजवताना काही थेंब लिंबाचा रस घातल्यास तांदळाचे दाणे मोकळे राहण्यास मदत होते आणि भाताचा रंगही अधिक पांढरा व आकर्षक दिसतो. लिंबाच्या रसातील नैसर्गिक आम्लामुळे तांदळातील अतिरिक्त चिकटपणा कमी होण्यास मदत होते, त्यामुळे शिजल्यानंतर भात गुठळ्या होण्याची शक्यता कमी होते.लिंबाचा रस विशेषतः बासमती किंवा लांब दाण्याच्या तांदळासाठी उपयुक्त ठरतो. यामुळे भाताचे दाणे एकमेकांना चिकटत नाहीत आणि प्रत्येक दाणा वेगळा दिसतो. मात्र लिंबाचा रस जास्त प्रमाणात घालू नये, कारण त्यामुळे भाताला आंबट चव येऊ शकते. साधारणपणे १ ते २ कप तांदळासाठी अर्धा चमचा ते एक चमचा लिंबाचा रस पुरेसा असतो.

