कारवार सीबर्ड तळावर एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांच्या हस्ते ‘कमिशनिंग’; नौदलाच्या सागरी सामर्थ्याला नवे बळ
त. भा. प्रतिनिधी
कारवार : भारतीय नौदलाच्या सागरी सामर्थ्यात भर घालत ‘आयएनएस मालवण’ या स्वदेशी बनावटीच्या माहे वर्गातील दुसऱ्या अँटी-सबमरिन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट (Aऐं-ऐंण्) युद्धनौकेचे बुधवार, 22 जुलै रोजी कारवारमधील सीबर्ड नौदल तळावर भव्य समारंभात ‘कमिशनिंग’ करण्यात आले. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांनी भूषविले. यावेळी पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाईस अॅडमिरल संजय वात्सायन, कोचीन शिपयार्डचे प्रतिनिधी, नौदलाचे वरिष्ठ अधिकारी, माजी सैनिक आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘आयएनएस मालवण’ या युद्धनौकेला महाराष्ट्रातील ऐतिहासिक मालवण शहराचे नाव देण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समृद्ध सागरी परंपरेशी मालवणचे असलेले ऐतिहासिक नाते लक्षात घेऊन हे नाव देण्यात आले आहे. तसेच 2003 पर्यंत सेवेत असलेल्या भारतीय नौदलाच्या ‘आयएनएस मालवण’ या माईनस्वीपर युद्धनौकेचा वारसाही या नव्या जहाजाने पुढे चालविला आहे. युद्धनौकेचे आयएनएस मालवण असे नामकरण करून भारतीय नौसेनेने सिंधुदुर्ग किल्ल्याचे निर्माते ज्यांनी भारताच्या किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी आणि समुद्री व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले, अशा छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आहे. आयएनएस मालवणच्या भारतीय नौसेनेत समावेशामुळे भारताची किनारी टेहळणी (पाळत) पाणबुडीविरोधी क्षमता आणि सागरी सुरक्षा लक्षणीयरित्या मजबूत झाली आहे. त्याशिवाय देशातील स्वदेशी जहाज बांधणीतील कौशल्यही दिसून आले आहे.
‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला मोठे बळ
कोचीन शिपयार्ड लिमिटेड, कोची येथे बांधण्यात आलेली ही युद्धनौका आठ अँटी-सबमरिन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट युद्धनौकांपैकी दुसरी, तर भारतीय नौदलात दाखल होणाऱ्या 16 अँटी-सबमरिन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट युद्धनौकांपैकी सहावी आहे. या जहाजामध्ये 80 टक्क्यांहून अधिक स्वदेशी तंत्रज्ञान व उपकरणांचा वापर करण्यात आला असून, ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला मोठे बळ मिळाले आहे. ‘आयएनएस मालवण’ ही युद्धनौका पाण्याखालील देखरेख, पाणबुडीविरोधी कारवाया, कमी तीव्रतेच्या सागरी मोहिमा तसेच माईन वॉरफेअर अशा विविध जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडण्यास सक्षम आहे. किनारी सुरक्षा अधिक मजबूत करणे, सागरी हद्दीवर सतत लक्ष ठेवणे आणि भारताच्या सागरी हितसंबंधांचे संरक्षण करणे यामध्ये या युद्धनौकेची महत्त्वाची भूमिका राहणार आहे.
एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांनी जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताच्या सागरी व्यापार मार्गांचे संरक्षण महत्वाचे असल्याचे सांगितले. भारतीय नौदलाने आत्मनिर्भरतेच्या दिशेने केलेल्या उल्लेखनीय प्रगतीचे त्यांनी कौतुक केले. युद्धनौकेतील 80 टक्क्यांहून अधिक स्वदेशी घटकांचा विशेष उल्लेख करत त्यांनी संरक्षण क्षेत्रात सैन्यदलांमधील समन्वय आणि स्वदेशी उत्पादनाला अधिक चालना देण्याचे आवाहन केले. ‘आयएनएस मालवण’च्या समावेशामुळे भारतीय नौदलाच्या पाणबुडीविरोधी युद्धक्षमता, किनारी सुरक्षा आणि सागरी सज्जतेत मोठी वाढ झाली असून, ही युद्धनौका मोठ्या युद्धनौका, पाणबुड्या आणि नौदलाच्या हवाई ताफ्यासोबत समन्वयाने कार्य करण्यास सक्षम आहे. त्यामुळे भारतीय नौदल अधिक सज्ज, सक्षम, विश्वासार्ह आणि भविष्यकालीन आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार झाले असल्याचा विश्वास नौदलाने व्यक्त केला. यावेळी रीअर अॅडमिरल एफओके विक्रम मेनन, आयएनएस मालवणचे कमांडींग ऑफीसर कमांडर प्रवीणकुमार तिवारी, कोचीन शिपयार्ड लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक व्ही. जे. जोश आदी उपस्थित होते.
बोधचिन्हावर ‘वाघनखे’
या युद्धनौकेच्या बोधचिन्हावर ‘वाघनखे’ हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक असलेले चिन्ह आहे. हे चिन्ह धैर्य, वेग, युद्धकौशल्य आणि शत्रूवर शांतपणे पण अचूक प्रहार करण्याची क्षमता दर्शविते. वाघनखाभोवतीच्या समुद्राच्या लाटा भारतीय नौदलाच्या अखंड सज्जतेचे प्रतीक आहेत. युद्धनौकेचे ‘सायलेंट क्लॉज’ हे ब्रीदवाक्य तिची गुप्त, घातक व अचूक प्रहार करण्याची क्षमता अधोरेखित करते.
