तोंडातील छाला, आवाज बसणे, गिळताना त्रास किंवा मानेला गाठ यांसारखी लक्षणे अनेकदा सामान्य समजून दुर्लक्षित केली जातात. मात्र, ही डोके आणि मानाच्या कर्करोगाची सुरुवातीची चिन्हे असू शकतात. तंबाखू, गुटखा, मद्यपान आणि HPV संसर्गामुळे या कर्करोगाचा धोका वाढतो. दोन ते तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ लक्षणे कायम राहिल्यास तातडीने ईएनटी तज्ज्ञ किंवा ऑन्कोलॉजिस्टचा सल्ला घ्यावा. वेळेवर निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावी ठरतात आणि बोलणे, गिळणे तसेच जीवनाची गुणवत्ता जपता येते. तंबाखू-मुक्त जीवनशैली, तोंडाची स्वच्छता आणि नियमित तपासणी हा बचावाचा सर्वोत्तम मार्ग आहे.

कर्करोगाचा धोका वाढवणाऱ्या दैनंदिन सवयी
आपल्या दैनंदिन जीवनशैलीतील काही सवयी या कर्करोगाला थेट आमंत्रण देतात:
- तंबाखूचे सेवन : सिगारेट, बिडी, सिगार, हुक्का किंवा गुटखा, खैनी आणि मावा यांसारख्या तंबाखूच्या सर्व प्रकारांमुळे तोंडातील नाजूक पेशींवर कर्करोगजन्य (Carcinogenic) घटकांचा परिणाम होतो, ज्यामुळे पेशींमध्ये अनियंत्रित वाढ सुरू होते.
- दारूचे अतिसेवन : जास्त प्रमाणात दारू प्यायल्याने तोंड आणि घशाच्या आतील मऊ त्वचेचे नुकसान होते. तंबाखू आणि दारू एकत्र सेवन केल्यास कर्करोगाचा धोका अनेक पटींनी वाढतो.
- एचपीव्ही (HPV) संसर्ग : आजकाल ‘ह्युमन पॅपिलोमाव्हायरस’ (HPV) मुळे तरुण वर्गात आणि तंबाखूचे सेवन न करणाऱ्यांमध्येही घशाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे.
- इतर कारणे : तोंडाची अस्वच्छता, नीट न बसणारे बनावट दात, निकृष्ट आहार आणि हवेचे प्रदूषण यांमुळेही कर्करोगाचा धोका संभवतो.
तुमचे तोंड, घसा आणि आवाज देतात हे ५ गंभीर संकेत
डोके आणि मानाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे सामान्य आजारांसारखीच दिसतात, त्यामुळे अनेक जण स्वतःच्या मनाने औषधे घेत राहतात किंवा त्रास आपोआप कमी होण्याची वाट पाहतात. खालील लक्षणे २ ते ३ आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहिल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे:
- बरा न होणारा छाला : तोंडात किंवा जिभेवर आलेला छाला जो २-३ आठवड्यांत बरा होत नाही.
- आवाजात बदल : अचानक आवाज घोगरा होणे किंवा आवाजात बदल होणे.
- गिळताना त्रास : अन्न किंवा पाणी गिळताना त्रास किंवा वेदना होणे.
- गाठ किंवा चट्टे : मान किंवा जबड्यात गाठ (Lump) येणे, किंवा तोंडात पांढरे (Leukoplakia) व लाल (Erythroplakia) चट्टे पडणे.
- इतर लक्षणे : तोंडून अस्वाभाविक रक्तस्त्राव होणे, सतत कान दुखणे किंवा जीभ व जबडा हलवण्यास त्रास होणे.
होमिओपॅथी, आयुर्वेद आणि उपचारांमधील दिरंगाई
भारतात कर्करोगाच्या उपचारांत होणारा विलंब हा रुग्णाच्या जीवावर बेतणारा सर्वात मोठा घटक आहे. अनेक रुग्ण लक्षणे दिसल्यानंतर वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध नसलेल्या उपचारांच्या मागे (उदा. काही होमियोपॅथी किंवा आयुर्वेदाच्या अनधिकृत दाव्यांवर) महिनोन महिने वेळ वाया घालवतात. तुम्ही वेळ वाया घालवत असता, पण कर्करोग थांबत नाही! पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात असलेला कर्करोग पाहता पाहता तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात पोहोचतो. कर्करोगात ‘उपचारांना होणारा विलंब हाच खरा मारेकरी’ आहे.
कर्करोगापासून बचावासाठी सुरक्षित आणि सोपे उपाय
कर्करोगाला रोखण्यासाठी खालील जीवनशैलीचा स्वीकार करणे आवश्यक आहे:
- व्यसनमुक्ती : तंबाखू, गुटखा आणि दारूचे सेवन पूर्णपणे थांबवणे हा कर्करोग टाळण्याचा सर्वात प्रभावी उपाय आहे.
- तोंडाची काळजी : रोज दात आणि तोंडाची व्यवस्थित स्वच्छता राखा. नियमित दंतवैद्यकांकडून तपासणी करून घ्या.
- संतुलित आहार : आहारात फळे, हिरव्या भाज्या आणि अँटीऑक्सिडंट्सचा समावेश करा.
- स्क्रीनिंग आणि तपासणी : जर तुम्ही तंबाखू किंवा दारूचे सेवन करत असाल, तर वर्षातून किमान एकदा कान-नाक-घसा तज्ज्ञ (ENT) किंवा ऑन्कोलॉजिस्टकडून तपासणी (Screening) करून घ्या.
शरीराची प्रत्येक चेतावणी गंभीरपणे घ्या
कर्करोग होण्यापूर्वी शरीर अनेकदा काही सूक्ष्म इशारे देत असते. तोंडातील छाला, आवाजातील बदल, गिळताना होणारा त्रास किंवा मानेवर आलेली सूज ही लक्षणे काही आठवड्यांनंतरही कायम राहिली, तर ती सामान्य समजून दुर्लक्ष करू नका. अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. डोके आणि मानाच्या कर्करोगाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची सुरुवातीची अनेक लक्षणे सहजपणे दिसून येतात. त्यामुळे योग्य वेळी तपासणी आणि उपचार सुरू केल्यास जीव वाचण्याबरोबरच उपचारांचा खर्च आणि शस्त्रक्रियेची गुंतागुंतही मोठ्या प्रमाणात कमी करता येते.
तुमच्या शरीराने दिलेल्या संकेतांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. तोंडात बरा न होणारा छाला, आवाजातील घोगरापणा किंवा मानातील गाठ या साध्या वाटणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करून अनधिकृत उपायांमध्ये वेळ वाया घालवू नका.
वेळेवर निदान (Early Detection) का महत्त्वाचे आहे?
सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास डोके आणि मानाचा कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो.
- अवयवांचे आणि कार्याचे रक्षण : वेळेवर उपचार केल्यास रुग्णाचा जीव तर वाचतोच, पण बोलणे, अन्न गिळणे आणि चेहऱ्याचा नैसर्गिक आकार कायम राखणे शक्य होते.
- उपचारांचा खर्च आणि गुंतागुंत : उशिरा निदान झाल्यास गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, रेडिएशन थेरपी आणि केमोथेरपीची गरज पडते, ज्यामुळे उपचारांचा खर्च प्रचंड वाढतो आणि रुग्णालाही शारीरिक त्रास जास्त होतो.

