Headlines

‘जेन झी’ ची हाक सरकार ऐकणार का ?


कोणतेही सरकार कधीच आम्हा सर्वसामान्याचे शत्रू असत नाही. आम्ही त्यांना फक्त आणि फक्त ‘मायबाप’ म्हणतो. कारण ‘सरकार’ म्हणजे आमचे हक्काचे लोकप्रतिनिधी आहेत, हे आम्हाला ज्ञात आहे.

सगळीकडे सुन्नता पसरली आहे. तरुण मुलांसोबत जे घडत आहे ते पाहून अंगावर काटा उभा राहतो. त्यांची वेदना समजून घेतली पाहिजे, अशाच भावना आज भारतात सर्वतोमुखी आहेत. कारण देशभरात आंदोलन करणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी ही सगळी भारतातली तरुण मुलं आहेत. शांतपणे मागणी करणाऱ्या या आपल्याच मुलांना मारण्यास मारणाऱ्यांचे हात कसे धजावले असतील? ही मुलं मार घेत असताना घरोघरी त्यांच्या आईबापांचे असहाय अश्रू अनावर झाले आहेत. आईबाप कधी पोटच्या मुलावर रागावले तर पुन्हा लेकरांना जवळ केल्याशिवाय त्यांचं समाधान होत नाही. इथे तर मार देऊनसुद्धा या मुलांच्या बाबतीत तसं काहीच घडलेलं दिसत नाही. आज खरोखरच देशात सन्नाटा आहे. या घटनेनं संवेदनशील नागरिकांच्या हृदयास हात घातला आहे. संपूर्ण जगाचे डोळे या आंदोलनावर खिळलेत. मनं जोडली गेली आहेत. आणि मुलांची ही मागणी म्हणजे त्यांचा ‘हट्ट’ नक्कीच नाही!! म्हणूनच, आता मायबाप सरकारने ज्यांनी सत्ता दिली, त्या तरुण मतदारांची हाक ऐकावी…कारण, शिक्षणाचा पोखरत असणारा गड वाचविण्याचा प्रयत्न ही मुले करीत आहेत. गड वाचवू पाहणारे हे सिंह वाचलेच पाहिजेत. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला सत्याग्रहाची किनार आहे. त्यात कोणताही आक्रस्ताळेपणा, जाळपोळ, तोडफोड, धुमाकूळ नाही, हे उल्लेखनीय.

मनुष्यबळ विकास खिजगणतीतही नाही!

देशात रस्ते, महामार्ग इ. भौतिक स्वरूपाचा विकास करण्यातच सरकारे मश्गूल असतात. देशातील मनुष्यबळ विकासाचे काय? दुर्दैवाने, या विषयाकडे आजपर्यंत कधी गांभीर्याने पाहिलेच गेले नाही. देशातील आजचे तरुण हे उद्याचं उज्ज्वल भविष्य आहे. त्यांची बाजू ऐकणं, त्यांना योग्य ते देणं ही जबाबदारी सरकारची आहे. देशातील मनुष्यबळ विकास करणं हे फार महत्त्वाचं आहे. युवा लोकसंख्येचा देश म्हणून आपण मिरवत असू, तर मोठ्या संख्येनं असणाऱ्या या युवा वर्गास ‘ युवा’ म्हणून आपण काय देतो, त्यांना किती विचारात घेतो, याचं अवलोकन सत्तेवर असणाऱ्या प्रत्येक सरकारनं करायलाच हवं. आज हा वर्ग न्याय मागतो आहे, गंभीर घटनेची जबाबदारी स्वीकारा, असं म्हणतो आहे. तर त्यांच्याशी साधा संवादही असू नये? लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी एवढीही संवेदनशीलता दाखवू नये?

सत्याग्रह पूर्वीही झालेत, पुढेही होतील!

मुळात, लोकशाहीत सरकार म्हणजे लोकांनी निवडून दिलेलं लोकप्रतिनिधींचं मंडळ असतं. तरीही, धोरणं आखून ती राबवीत असताना जनता आणि सरकारमध्ये एकमत असतंच किंवा असावंच असं नाही. अशा वेळी जनता विविध मार्गांनी विरोध दर्शवत असते. हे आजचं नाही. सरकार कोणतंही असू दे. अशी उपोषणं पूर्वीही झाली आहेत. उपोषण हे शांततापूर्ण सत्याग्रहाचं एक साधन असून या भारतभूमीत पोसलेलं आहे. देशात ‘नीट’ पेपरफुटीची घडलेली घटना विद्यार्थ्यांच्या मनावर आघात करणारीच होती. त्याविरोधात विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आवाज उठविला तर गैर ते काय? ही परीक्षा देणारे विद्यार्थी साधारणतः पंचविशीच्या आतील आणि ‘मंत्रिमंडळा’ तील मंत्री वयाने मोठे आणि अनुभवसमृद्ध असताना ज्याच्या हाती अधिकार आहेत, त्या गटाने समंजसपणा दाखवायला नको का? या मुलांच्या समस्या ऐकून, त्यांच्याशी संवाद साधून उपाय योजण्यातच शहाणपणा नाही का? पण दुर्दैवानं तसं न घडता या एकत्र आलेल्या तरुणांच्या समुहाकडे ‘विरोधी गट’ म्हणून पाहिलं जातंय का? असा प्रश्न उपस्थित होतो. प्रत्येक गोष्टीकडे राजकारणाचा चष्मा लावून पाहणं हे कितपत योग्य आहे? सरकारची कारणं काहीही असतील, परंतु, एखादा प्रश्न जीवनमरणापर्यंत जाऊन पोहोचत असेल तर आधी प्राण वाचवले गेले पाहिजेत. सर्वसामान्य माणसे तर एखाद्याचा प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावत असतात.
दिल्लीत ज्या पद्धतीनं मुलांवर ‘लाठीचार्ज’ झाला तो पाहता, पोलीस अशी वेदनादायक मारहाण करतील, हेच भारतीयाच्या मनाला पटत नाही. आदेशाचे अधीन असणारे पोलीस आदेशाचा अंमल करताना द्वेषभाव बाळगत नाहीत, हे भारतीयाला ठावूक आहे. म्हणूनच मने व्यथित झाली. जे घडत आहे ते फार वेदनादायक आहे. प्रेमाने जग जिंकण्यास शिकविणाऱ्या भारतीय संस्कृतीत हा द्वेषाचा आसूड कुठून आला? आणि डॉक्टर होऊ पाहणाऱ्या शांत, होतकरू विद्यार्थ्यांच्या बाबतीत?

” परीक्षा पद्धतीतील गैरप्रकारांमुळे कार्यक्षम नसणारी अपात्र माणसे महत्वाच्या पदांवर बसतील. पात्र विद्यार्थी तिथपर्यंत पोहोचूच शकणार नाहीत. अपात्र व्यक्ती डॉक्टर होऊन माणसांना औषधोपचार कसा देईल, याचा विचार आपण केला पाहिजे. या देशातील जबाबदारीच्या पदांवर पात्र, कार्यक्षम व्यक्ती बसविण्याची जबाबदारी आपलीच आहे..” असं निक्षून सांगणारे लडाख येथील एक शिक्षणसुधारक, पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक.
ते भारतातील हुशार, गोरगरीब, होतकरू मुलांसाठी उपोषणास बसले. पोटात अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. ज्यांना क्षणभरही विश्रांतीची सवय नाही, ते शरीरातील अवयवसुद्धा आक्रंदून आक्रंदून थकले, पण त्यांचे उपोषण आजही सुरू आहे. या भारतात ‘प्राणा’पेक्षाही ‘पद’ श्रेष्ठ वाटू लागले का, हा प्रश्न नागरिकांना अस्वस्थ करू लागला आहे.

उपोषण का?

भारतात वैद्यकीय प्रवेश परीक्षा अर्थात ‘नीट’ ३ मे, २०२६ रोजी झाली. वैद्यकीय शिक्षणासाठी (डॉक्टर होणे) ही प्रवेश परीक्षा दिली जाते. प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या दुर्दैवाने, या परीक्षेचा पेपर ‘फुटला’! हजारो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले. काही ध्येयवेड्या मुलांनी हा धक्का सहन न झाल्याने आत्महत्या केल्या. अनेक विद्यार्थी रस्त्यावर उतरले. परंतु, या भयानक सत्याची जबाबदारी स्वीकारण्यास कोणीच पुढे आले नाही. या घटनेच्या निषेधार्थ ‘कॉक्रोच जनता पार्टी’ ने २० जूनपासून दिल्लीत जंतर मंतर’ वर आंदोलन सुरू केलं. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कराव्या लागणाऱ्या मेहनतीची जाण असणाऱ्या सोनम वांगचूक यांनी त्यांना सक्षम पाठिंबा देत स्वतः उपोषणास बसले. (कारण ते स्वतः सुशिक्षित आहेत.) शिक्षणमंत्री धर्मेंद प्रधान यांनी राजीनामा द्यावा, ही मागणी ही मंडळी करीत आहेत.

कोण आहेत सोनम वांगचूक?

सोनम वांगचूक हे या उपोषणामुळे पुढे आलेलं नाव नाही. हे उपोषण त्यांच्या कारकिर्दीचा एक भाग आहे. या नावाचं वलय फार मोठं असून ते मागच्या काही दशकांपासूनचं आहे. हे लडाखमध्ये राहणारे भारतीय नागरिक आहेत. ते प्रसिद्ध अभियंते, पर्यावरणतज्ज्ञ आणि शिक्षणसुधारक आहेत. त्यांनी स्वतःचं शिक्षण आणि अनुभवाला सर्जनशीलतेची, संशोधनाची जोड दिली. लडाख हा हिमालयीन प्रदेश. येथील समस्या लक्षात घेत त्यांनी स्वतःच्या कल्पनेतून विविध यशस्वी प्रयोग केले. शेती करताना येणाऱ्या पाणीटंचाईवर उपाय म्हणून त्यांनी कृत्रिम हिमनद्या केल्या; ज्यांना ‘आईस स्तूप’ म्हणून ओळखलं जातं. या बर्फाळ प्रदेशात देशातील विविध हवामानाच्या प्रदेशातून आलेले तडफदार तरुण सैनिक असतात. कडाक्याच्या थंडीत त्यांना उबदारपणा मिळावा म्हणून त्यांनी सौरऊर्जेवरील तंबू तयार केले. शिक्षणपद्धती, जलसंवर्धन, हवामान बदल यातही त्यांचं मोलाचं कार्य असून यासाठी ‘आशियाचा नोबेल’ असणाऱ्या रॅमन मॅगसेसे पुरस्कारानं त्यांना गौरविण्यात आलं.

तंत्रज्ञान युगातील तरुण पिढी चिकित्सक आहे. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा त्यांचा स्वतःचा दृष्टीकोन आहे. ५० वर्षांपूर्वीचे विचार आणि आत्ताचे विचार यामध्ये बरेच परिवर्तन झाले आहे. ‘जेन झी’ मधील तरुणांच्या विचारांना गृहीत न धरता त्यांचे ऐकणे, त्यांना समजून घेणे अत्यावश्यक आहे. कारण, भारताचे भविष्य याच पिढीच्या हाती येणार आहे.

–  मंगल नाईक-जोशी



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत