Headlines

Employee Waits a Year for 10000 Salary Claims Company Blocked Him | नोकरी सोडून वर्ष उलटलं पण पगार दिला नाही, बॉसचा १० हजार देण्यास नकार, तक्रार करताच केलं ब्लॉक, पाहा व्हायरल चॅट


Salary Dispute: एका कर्मचाऱ्याला नोकरी सोडून वर्ष उलटलं, तरीही त्याचा १० हजार रुपयांचा थकीत पगार मिळालेला नाही. त्यामुळे त्याने कंपनीबाबतची आपली नाराजी व्यक्त करत देशभरातील तरुणांना जागरूक करण्यासाठी एक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Toxic Work Culture
(फोटो सौजन्य – Rounik Tarafder/linkedin)
भारतातील टॉक्सिक वर्क कल्चरची चर्चा आता जगभरात होताना दिसत आहे. अगदी युरोप-अमेरिकेत नोकरी करणारी मंडळीही भारतात नोकरी करतानाचे अनुभव सोशल मीडियावर शेअर करत आहेत. याच पार्श्वभूमीवर अशाच एका तरुणाची पोस्ट समोर आली आहे. नोकरी सोडून एक वर्ष झाले, तरी कंपनीने त्याला १० हजार रुपयांचा थकीत पगार दिलेला नाही. इतकेच नव्हे, तर या प्रकरणी त्याने वारंवार विचारणा केल्यानंतर त्याचा नंबरही ब्लॉक करण्यात आला. दरम्यान, त्याने कंपनीला पाठवलेल्या व्हॉट्सअॅप मेसेजचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे चॅट पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

पोस्टमध्ये काय म्हटले आहे?

पोस्टमध्ये काय म्हटले आहे?

ही पोस्ट Rounik Tarafder यांनी लिंक्डइनवर शेअर केली आहे. पोस्टनुसार, ते एका कंपनीच्या डिजिटल टीममध्ये काम करत होते. काही कारणांमुळे त्यांनी नोकरी सोडली. मात्र, नोकरी सोडून वर्ष उलटूनही कंपनीने त्यांचा १० हजार रुपयांचा थकीत पगार दिलेला नाही. १५ ऑक्टोबर २०२५ हा त्यांचा कंपनीतील शेवटचा कामाचा दिवस होता. त्यामुळे ऑक्टोबरमधील उर्वरित १५ दिवसांचा पगार कदाचित मिळणार नाही, असे त्यांनी गृहित धरले होते. मात्र, त्या १५ दिवसांचे सुमारे १० हजार रुपये अद्याप मिळालेले नाहीत.

हे पैसे मिळवण्यासाठी त्यांनी शक्य तितक्या सौजन्याने वारंवार पाठपुरावा केला. मात्र, कंपनीच्या मालकाकडून आठवडाभरात पैसे मिळतील, लवकरच रक्कम पाठवतो अशी केवळ आश्वासनेच मिळत राहिली. त्यांच्या मते, १० हजार रुपयांची रक्कम कदाचित मोठी वाटणार नाही, पण हा प्रश्न केवळ पैशांचा नसून आत्मसन्मानाचा आहे. एखाद्या कंपनीसाठी केलेले परिश्रम, समर्पण आणि दिलेला वेळ इतक्या सहजपणे विसरला जाऊ शकतो, ही बाब अत्यंत वेदनादायी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
(फोटो सौजन्य – Rounik Tarafder/linkedin)

ही पोस्ट करण्यामागचं कारण काय?

ही पोस्ट करण्यामागचं कारण काय?

पोस्टच्या शेवटी त्यांनी स्पष्ट केले आहे की, ही पोस्ट कोणत्याही वैयक्तिक रागातून लिहिलेली नाही. इतर कोणालाही अशी वेळ येऊ नये, म्हणून त्यांनी स्वतःचा अनुभव मांडला आहे. कोणत्याही संस्थेत नोकरी स्वीकारताना पगारासंदर्भातील सर्व अटी लेखी स्वरूपात निश्चित करून घ्या आणि स्वतःच्या हक्कांचे संरक्षण करा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. कारण भविष्यात पगाराबाबत वाद निर्माण झाल्यास लेखी पुरावे असल्यास कायदेशीर कारवाई करणे अधिक सोपे ठरते. सध्या ही पोस्ट आणि व्हॉट्सअॅप चॅट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
(फोटो सौजन्य – Rounik Tarafder/linkedin)

(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा