IND vs ZIM 1st T20I Live Streaming: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील युवा टीम इंडिया झिम्बाब्वेविरुद्ध टी-20 मालिकेत उतरणार आहे. वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडेही चाहत्यांचे लक्ष असेल. पहिला सामना कधी, कुठे आणि लाइव्ह कुठे पाहता येणार?

या दौऱ्यात अनेक युवा खेळाडूंना आपली क्षमता दाखवण्याची संधी मिळणार आहे. त्यापैकी सर्वाधिक चर्चा वैभव सूर्यवंशीची आहे. इंग्लंडविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत त्याने इतिहास रचला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सर्वात तरुण खेळाडूंपैकी एक म्हणून त्याची नोंद झाली. मात्र, इंग्लंड दौऱ्यात त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे आता झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत वैभवच्या बॅटमधून मोठी खेळी पाहायला मिळते का, याकडे चाहत्यांचे लक्ष असेल.
भारतीय संघासाठीही ही मालिका महत्त्वाची आहे. इंग्लंड दौऱ्यातील निराशाजनक निकालानंतर विजयी पुनरागमन करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. मालिकेतील पहिला सामना नेमका कुठे आणि किती वाजता होणार, तसेच हा सामना टीव्ही आणि ओटीटीवर कुठे पाहता येणार, याची माहिती जाणून घेऊया.
भारत-झिम्बाब्वे पहिला टी-२० सामना कुठे होणार?
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी-२० मालिकेतील पहिला सामना हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या मैदानावर भारतीय संघाचा आतापर्यंतचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे. टीम इंडियाने येथे नऊ टी-२० सामने खेळले असून, त्यापैकी सहा सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर तीन सामन्यांत भारताला पराभवाचा सामना करावा लागला.
सामना किती वाजता सुरू होईल?
२३ जुलै रोजी होणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ४.३० वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी दुपारी ४ वाजता नाणेफेक होईल. त्यामुळे सामन्याच्या अर्धा तास आधी दोन्ही संघांचे कर्णधार टॉससाठी मैदानात उतरतील.
टीव्हीवर सामना कुठे पाहता येईल?
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिला टी-२० सामना टीव्हीवर पाहण्यासाठी चाहत्यांना डीडी स्पोर्ट्सचा पर्याय उपलब्ध आहे. या चॅनेलवर सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.
मोबाइल आणि लॅपटॉपवर लाइव्ह मॅच कुठे पाहायची?
टीव्हीऐवजी मोबाइल फोन, स्मार्ट टीव्ही किंवा लॅपटॉपवर सामना पाहण्याची इच्छा असलेल्या क्रिकेट चाहत्यांना फॅनकोड (FanCode) ॲपचा वापर करता येईल. या प्लॅटफॉर्मवर भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. मात्र, प्रत्येक सामन्यासाठी स्वतंत्र शुल्क आकारले जाण्याची शक्यता आहे.
भारताचा टी-२० संघ
श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा (उपकर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंग, हर्ष दुबे, प्रिन्स यादव, यश ठाकूर, अशोक शर्मा, मयंक यादव, प्रभसिमरन सिंग.
झिम्बाब्वेचा टी-२० संघ
सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, रायन बर्ल, बेन कुरेन, ब्रॅड इव्हान्स, क्लाइव्ह माडांडे (यष्टीरक्षक), टिनोटेंडा मापोसा, तादिवानाशे मारुमानी, वेलिंग्टन मसाकाद्झा, ताशिंगा मुसेकिवा, ब्लेसिंग मुजाराबानी, डायन मायर्स, न्यूमन न्यामुरी, मिल्टन शुंबा.

