Headlines

महाराष्ट्रावर काळे ढग दाटणार, पुढील २४ तास महत्त्वाचे; मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट| Maharashtra Times


Weather Alert: २१ जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. जुलै महिना संपेपर्यंत असाच पाऊस सर्वत्र कायम राहण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि ठाण्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होता. मंगळवारी अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

21 जुलै हवामान
मुंबई: महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाल्यानंतर काही काळ खंड पडला होता. आता राज्यात पावसाची नवी सर आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २१ जुलै रोजी महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे, रायगड आणि पुण्याती घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान शास्त्रज्ञांच्या मते, राजस्थानपासून वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचं क्षेत्र पसरलेलं आहे. त्याशिवाय मध्य भारत आणि पूर्व किनारपट्टीवरील अनेक चक्रीवादळी प्रणालींमुळे मान्सूनचे नवे पर्जन्यमान आले आहे. या हवामान प्रणालींमुळे मोसमी वाऱ्यांचा वेग वाढला आहे आणि राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचं प्रमाण वाढलं आहे. सोमवारी हवामान विभागाने मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसासाठी यलो अलर्ट जारी केला होता. पण दुपारपर्यंत पावसाचा जोर वाढल्यामुळे नंतर पुन्हा ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. शनिवारपासून मुंबईमध्ये अधूनमधून मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. पण मंगळवारपासून पावसाचा जोर सर्वत्र वाढण्याची शक्यता आहे. २२ जुलैपर्यंत मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी ऑरेंज अलर्ट जारी असेल.

कोकणात यलो अलर्ट

या आठवड्यात पावसाचा जोर वाढला तरी हवामान निरिक्षकांच्या मते, आगामी पावसाची तीव्रता जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी इतकी नसणार आहे. त्यामुळे जुलै महिन्यात पावसाची तूट कायम राहण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर या आठवड्यात मान्सूनची तीव्रता वाढली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये मंगळवारी मुसळधार ते अतिमुसळदार पावसाची शक्यता आहे. ताशी ५०-६० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह कोकणात मुसळधार पाऊस होईल. पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांसाठी २१ जुलै रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या सरींची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस होणार?

पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने डोंगराळ भागात व घाटमाथ्याच्या भागात पावसाचं रौद्र रूप दिसणार. पुणे जिल्ह्यात घाट क्षेत्रात हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यातही घाटमाथ्याच्या परिसरात पावसाचा जोर वाढणार असून यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. सांगली, सोलापूर जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पावसाचा जोर कमी राहील व हलक्या सरींची शक्यता आहे.

मराठवाड्यात स्थिती कशी असेल?

मराठवाड्यात मंगळावारी मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम सरी बरसतील. या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये हलक्यी सरींची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्र व खान्देशात किती पाऊस होईल?

नाशिकच्या घाट माथ्याच्या परिसरात हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. इतर ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या सरींची शक्यता आहे. दरम्यान, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांसाठीही हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या तीनही जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात कोणताही अलर्ट दिलेला नाही.

Maharashtra TimesMaharashtra Weather: महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, संपूर्ण आठवडा विजांचा कडकडाट होणार; मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार?

विदर्भात हवामान कोरडंचं

राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढला असला तरी विदर्भात मोसमी पावसाची सर गायब आहे. अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींतची शक्यता आहे.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा