रस्त्यावरच्या नकाशांप्रमाणेच समुद्राचेही नकाशे असतात, या सागरवाटांचा सामरिक वेधही गरजेचा असतो.

कुठे यायचंय? लोकेशन पाठवा ना…’ हा संवाद सर्वांच्या चांगलाच अंगवळणी पडला आहे. गुगलमॅपची सर्वांना सवय झाली आहे. समुद्रात पूर्वापार होकायंत्रे आणि पारंपरिक दिशाज्ञानावर किनारा शोधण्याची कला दर्यावर्दींकडे होती. आता समुद्रातही वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली असून समुद्राच्या अंतरंगात दडलेल्या नैसर्गिंक किंवा मानवी धोक्यांमधून वाट काढणे हे आव्हानात्मक ठरू लागले आहे. अगदी शांततेच्या काळातही सागरवाटांवरून निर्धोक प्रवासासाठी योग्य नकाशे हाताशी हवेतच. त्यातच काही सामरिक गुपितेही दडलेली असतात. भारतीय नौदलामध्ये अलीकडेच या अशा सागरवाटांचा शोध घेणाऱ्या एका नव्या सर्वेक्षण नौकेचा समावेश झाला.
कोलकात्याच्या गार्डनरीच शीपयार्डने बांधलेल्या आयएनएस संशोधक या सर्वेक्षण नौकेचे जूनअखेरीस भारतीय नौदलात कमिशनिंग झाले. पूर्व किनारपट्टीवरील बंदरांना भेटी देत ही नौका कोची या तिच्या होमपोर्टवर गेल्या आठवड्यात आली. या मालिकेत आयएनएस संधायक, आयएनएस निर्देशक, आयएनएस इक्षक या नौका गेल्या दोन वर्षांत गार्डनरीच गोदीने बांधल्या आहेत. आयएनएस मकर, सागरध्वनी अशा इतरही काही सर्वेक्षण नौका भारतीय नौदलात आहेत.
आपल्या किनारपट्टीलगतच्या २०० सागरी मैल अंतरापर्यंतचा परिसर हा विशेष आर्थिक क्षेत्र म्हणून गणला जातो. हिंदी महासागर-अरबी समुद्र येथून भारतीय व विदेशांचीही व्यापारी जहाजे मार्गक्रमणा करत असतात. किनाऱ्यालगत प्रवासी वाहतूक सुरू असते. काही ठिकाणी नैसर्गिक बेटे, खडक असतात, बुडालेल्या जहाजांचे अवशेष असतात. जहाजांना नांगर टाकायचा झाला, तरी तेथे वाळू, खडक, चिखल, वनस्पती यापैकी कोणत्या प्रकारचा समुद्रतळ आहे, याची माहिती असावी लागते.
तेल व वायू उत्खननासाठी कोणत्या जागा योग्य आहेत, हे शोधावे लागते. या सर्व गोष्टींची शास्त्रीय माहिती जमा करण्याचे, त्यावर संशोधन आणि विश्लेषण करण्याचे कार्य नौदलाच्या अखत्यारीतील जलवैज्ञानिक म्हणजेच हायड्रोग्राफर करत असतात. भारतामध्ये १९५४ साली देहरादून येथे नौदल जलवैज्ञानिक कार्यालय सुरू झाले. आजही येथे भारतीय नौदलाच्या सर्वेक्षणनौकांनी आणलेल्या माहितीतून कागदी व इलेक्ट्रॉनिक नकाशे तयार करण्याचे काम चालते. भारतीय जलवैज्ञानिकांनी २०१९ ते २०२४ दरम्यान ८९ हजार चौरसकिलोमीटर क्षेत्राचे ९६ नकाशे तयार करून शेजारील राष्ट्रांना मदत केली आहे. अशा हायड्रोग्राफी सर्वेक्षणांतून भारताला गेल्या वर्षी ८२ कोटींचा महसूलही मिळाला. ‘समुद्ररत्नाकर’सारख्या नौका भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण संस्थेच्या अखत्यारीत कार्यरत असून त्या खोल समुद्रातील खनिजे व सागरसंपत्तीचा वेध घेतात.
हिंदी महासागर ावर वारंवार हक्क सांगणारा चीन इथल्या समुद्री हालचालींकडे कायमच डोळे व कान लावून असतो. चीनच्या सामरिकनीतीचा अभ्यास करणारे नवी दिल्लीच्या नॅशनल मॅरिटाइम फाऊन्डेशनचे वरिष्ठ स्नातक कॅप्टन कमलेश अग्निहोत्री यांनी एक कळीचा मुद्दा मांडला होता. समुद्रतळातील घनता, क्षारप्रमाण आणि तापमान यांचा थेट परिणाम पाणबुड्यांच्या संचाराशी निगडित असतो. घनता, क्षार जेवढे अधिक तेवढे सोनार यंत्रणेद्वारे पाणबुडीचा मागोवा घेणे कठीण बनते. हिंदी महासागर क्षेत्रात वातावरणीय बदल मोठ्या प्रमाणात होत असल्याने पाणबुड्यांना लपून राहण्यासाठी इथे बराच वाव असतो. या जागा शोधण्याचे काम चीनच्या सर्वेक्षणनौकांकडून कायम सुरू असते. अर्थात भारतीय नौदलही त्यावर पाळत ठेवून असते. कॅ. अग्निहोत्री यांचे हे सूचन अत्यंत महत्त्वाचे ठरते.
समुद्री संशोधनात भूराजकीय संबंधांचाही निकष महत्त्वाचा ठरतो. भारताच्या आयएनएस सतलजने मॉरिशसला गेल्यावर्षी ३५ हजार मैल क्षेत्राचे सर्वेक्षण करून दिले. श्रीलंका व मालदीव यांना भारताने अनेक वर्षे संशोधन, नकाशे यांची मदत केली. आता त्यांनी चीनला जवळ केल्याचे दिसत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सागरातील अंतरंगाच्या वाटांचा धांडोळा घेण्याचे संशोधनकार्य भारताला अथकपणे सुरू ठेवावे लागणार आहे.

