‘काय सांगू तुला अन्या, आज माझा फुल-टू मुरारबाजी झालेला आहे. नंतर सावकाश फोन करतो.’
गेली चाळीस-पंचेचाळीस वर्षे माझा खास मित्र असलेल्या नितीनचा ‘मुरारबाजी होणे’ हा आवडता वाक्प्रचार आहे. नितीन आणि मी एमबीबीएसच्या पहिल्या वर्षापासून एकत्र शिकलो. पुढे एमडी आणि डीएम या पदव्या मिळवतानाही तो माझा सहाध्यायी होता. वैद्यकीय शिक्षणादरम्यान वाट्याला येणारी खडतर वर्षे, जवळजवळ एक तप आम्ही बरोबर होतो. चोवीस, अठ्ठेचाळीस किंवा बहात्तर तास सलग काम करतानाचे बरे-वाईट अनुभव आम्ही घेतले. पुढे आम्ही दोघेही काही वर्षे केईएम रुग्णालयात रुग्णांची देखभाल करण्याबरोबर विद्यार्थ्यांना शिकवतही होतो. पुढे जरी वैद्यकीय व्यवसाय दोन वेगळ्या शहरांत करीत असलो, तरी आठवड्यातून दोन-तीन वेळा आम्ही एकमेकांशी फोनवर बोलतो. हा फोन साधारण दुपारी दोनच्या सुमारास असतो. तोवर दिवसभरातल्या कामाचा उपसा काही प्रमाणात झालेला असतो आणि शिळोप्याच्या गप्पा मारून पुन्हा ताजेतवाने व्हावे असे आम्हाला वाटत असते.
एखाद्या डॉक्टरच्या दैनंदिन कामादरम्यान अनेक अनपेक्षित गोष्टींमुळे कामाचे वेळापत्रक बिघडत असते. एखादा रुग्ण शस्त्रक्रियेसाठी किंवा तपासणीसाठी वेळेवर न येणे, अथवा रुग्णाला तपासण्यासाठी किंवा त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी आधी ठरवलेली ओपीडी स्थगित करावी लागणे. रुग्णालयात शिरता शिरता आयसीयूमधून तातडीचा फोन येणे. मग इतर सर्व कामे सोडून आधी आयसीयूकडे धाव घेणे. दिवसभर कसरत सुरू असते. एखादी एंडोस्कोपी वीस मिनिटांत होईल अशी अपेक्षा असताना काही कारणांमुळे तिला तासाभरापेक्षाही जास्त वेळ लागू शकतो. कधी रात्री घरी पोचल्या-पोचल्या इस्पितळातून पुन्हा फोन येतो. कुणा लहानग्याने काही वस्तू गिळलेली असते. कुणाला रक्ताच्या उलट्या होत असतात. कुणी असह्य पोटदुखी घेऊन इस्पितळात दाखल झालेला असतो. कितीही थकवा वाटत असला तरी पुन्हा कपडे बदलून इस्पितळात जावेच लागते. बरे, परत यायला कधी रात्रीचे बारा वाजून गेले तरी दुसऱ्या दिवशीची रुग्णांची अपॉइंटमेंट लिस्ट सकाळपासून असतेच.
इतके व्यग्र दिनक्रम इतरही क्षेत्रांत असतात. सैन्यातील प्रशिक्षणादरम्यान अशीच खडतर तपस्या असते. एखादा प्रथितयश कलाकार दिवसातून चौदा-सोळा तास काम करीत असतो. कितीतरी राजकीय पुढारीही तासनतास लोकांच्या भेटीगाठी, मतदारसंघातील दौरे यात व्यग्र असतात. अग्निशमन दलासारख्या अतिमहत्त्वाच्या सेवांमध्येही थकवा, तहान, भूक, झोप सर्व विसरून अनोळखी व्यक्तीच्या मदतीला धावून जावे लागते. प्रशिक्षणादरम्यान सलग दोन-तीन दिवस विश्रांती न घेता कामाला जुंपून घ्यायची सवय लागली की त्याचा फायदा आयुष्यभर होतो. पहाटे तीन वाजता कोणी फोन केला तरी मेंदू चटकन परिस्थितीचा नेमका अंदाज बांधून योग्य तो निर्णय घेतो.
प्रतिकूल परिस्थितीत, शारीरिक आणि मानसिक शीण विसरून किंवा त्यावर कुरघोडी करून काम करीत असताना मला नेहमी मॅरेथॉन धावपटूंना सांगितला जाणारा कानमंत्र आठवतो. ‘जेव्हा तुमचे शरीर तुम्हाला थकल्याचे सांगते, तेव्हा तुम्ही तुमच्या एकूण क्षमतेचा केवळ ४० टक्के वापर केलेला असतो. अजून ६० टक्के बाकी असते.’
शारीरिक आणि मानसिक तणावादरम्यान रक्तातील ॲड्रेनालिन, कॉर्टिसॉल यांसारख्या अनेक अंतःस्रावांची पातळी वाढते. त्यामुळे शरीर आणि मन काम करीत राहते. मुरारबाजी लढताना इतका बेभान झाला होता की त्याची मान कापल्यानंतरही त्याचे हात तलवार फिरवीत राहिले.
शरीर आणि मनाच्या थकव्याच्या सर्व सीमा पार करून जेव्हा कुणी कर्तव्य करीत राहतो, तेव्हा मला आठवण होते तेलविहिरीमधून तेल उपसून काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘ Fracking ’ या तंत्राची. एकेका तेलविहिरीतून एकूण तेलसाठ्यातील साधारणपणे ७० टक्के तेल उपसून झाले की ती विहीर सोडून दिली जाते. आणखी तेल तिथे असले तरी ते उपसण्याचा खर्च वाढत जातो आणि उत्पादनाची प्रक्रिया तोट्याची ठरते. यावर मात करण्याचा एक आधुनिक उपाय म्हणजे ‘Fracking’ या तंत्रज्ञानामध्ये तेलविहिरीच्या बाजूला दुसरा कूपनलिकेसारखा खड्डा खणून त्यातून काही विशिष्ट रसायनांचे मिश्रण प्रचंड दाबाने इंजेक्शनसारखे सोडले जाते. या रसायनांच्या रेट्यामुळे तेलविहिरीत खोलवर असणारे तेल वर येते. इसापनीतीतील कावळा हंड्यात दगड टाकून पाणी वर आल्यावर पितो तसेच!
प्रतिकूल परिस्थितीत मानवी शरीराच्या क्षमतांची मर्यादा किती याचा अभ्यास सुरू झाला एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात. सुरुवातीला संशोधकांना रस होता पर्वतारोहण करताना विरळ होत जाणाऱ्या प्राणवायूमुळे शरीरावर होणाऱ्या परिणामांमध्ये. त्यानंतर उंचावरून जाणाऱ्या विमानाच्या वैमानिकावर होणारा परिणाम, तसेच समुद्रात खोलवर बुडी घेणाऱ्या पाणबुड्यांमधून प्रवास करणाऱ्यांवर होणारा परिणाम यांचा अभ्यास झाला.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नाझी छळछावण्यांतील डॉक्टरांनी कैद्यांवर अमानुष प्रयोग केले. उपासमार झाल्यास शरीरावर काय परिणाम होतात हे तपासण्यासाठी काहींना मरेपर्यंत अन्न व पाण्यावाचून ठेवण्यात आले. थंडी किंवा प्रमाणाबाहेरचा उकाडा मानवी शरीर किती काळ सोसू शकते हे तपासण्यात आले. वेगवेगळ्या विषारी वायूंनी भरलेल्या खोलीत किती वेळात प्राण जातो ते पाहण्यात आले. शस्त्रक्रिया केल्यानंतर प्रतिजैविकांची खरोखर गरज आहे का हे पाहण्यासाठी एका गटाला प्रतिजैविकांपासून वंचित ठेवण्यात आले. कैद्यांची संमती न घेता हे प्रकार वर्षानुवर्षे सुरू होते.
आजच्या काळात अनेक क्षेत्रांतील व्यावसायिक तासनतास कामाला जुंपलेले असतात. कामगारांचे हित लक्षात घेऊन अनेक देशांमध्ये दर आठवड्यातील कामाच्या तासांवर कायद्याने निर्बंध घालण्यात आले आहेत. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी पहिला कायदा आला एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला. त्यात दिवसातील कामाची कमाल मर्यादा बारा तास होती. पुढे तो वेळ दहा आणि नंतर आठ तासांवर आणण्यात आला.
भारतातील पहिला कायदा १९४८ साली आला. २०२० साली त्यात दुरुस्ती करण्यात आली. एकूण कामाचा वेळ दिवसाला आठ तास आणि आठवड्याला ४८ तास असा निश्चित करण्यात आलेला आहे. ओव्हरटाइम किती करावा आणि त्याबदल्यात किती मोबदला द्यावा याबद्दलही नियम आहेत. कारखान्यात, स्थापत्य विभागात, सरकारी किंवा निमसरकारी संस्थेत किंवा इस्पितळातील कर्मचाऱ्यांना या कायद्यामुळे दिलासा मिळालेला आहे.
निरनिराळ्या कंपन्यांतील उच्चपदस्थांना, बुद्धिजीवी व्यावसायिकांना मात्र हा कायदा आहे असे कळले तर हसूच येते. त्या सर्वांचा कामाचा कालावधी म्हणजे त्या दिवशी ठरवलेले काम संपेपर्यंत! डॉक्टर, अभियंते, संगणकतज्ज्ञ, वकील, जाहिरात क्षेत्रातील व्यावसायिक, कलाक्षेत्रातील व्यक्ती, पत्रकारिता व माध्यम क्षेत्रातील अनेक जण आज साठ ते सत्तर तास आठवड्याला काम करीत असावेत. त्यातील अनेक जण आवडीने कामाला वाहून घेतात. कुणाला वरिष्ठांमुळे कामाला वाहून घ्यावे लागते. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी ‘तरुणांनी सत्तर तास तरी काम करायलाच हवे,’ असे एका मुलाखतीत सांगितल्यानंतर एकच गदारोळ उठला होता.घाण्याला जुंपलेल्या बैलासारखे काम करणाऱ्यांना अतीव समाधान लाभत असले तरी अतिपरिश्रमाचा तब्येतीवर प्रतिकूल परिणाम होतच असतो. आंतरराष्ट्रीय स्वास्थ्य संघटना ( WHO ) आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ( ILO ) या दोन्ही संघटनांनी आठवड्याला ५५ किंवा त्याहून अधिक तास काम करण्यातील धोके स्पष्ट केलेले आहेत. अशा प्रकारे काम करणाऱ्यांमध्ये हृदयरोग जडण्याचा धोका वीस टक्क्यांनी वाढतो, तसेच लकवा किंवा मेंदूत रक्तस्राव होण्याचा धोका ३५ टक्के वाढतो.
भारतातील डॉक्टरांमध्ये उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक धोक्यांबद्दलही संशोधन झालेले आहे. केरळ आणि तेलंगणा राज्यांत झालेल्या या संशोधनाचे निष्कर्ष धक्कादायक आहेत. आजच्या घडीला भारतीय नागरिकांचे सरासरी आयुर्मान ७० ते ७५ वर्षे इतके असले तरी भारतीय डॉक्टरांचे सरासरी आयुर्मान सुमारे १५ वर्षे कमी म्हणजे ५५ ते ६० इतकेच आहे. डॉक्टरांमधील अकाली मृत्यूंपैकी हृदयरोग आणि कर्करोगाने होणारे मृत्यू प्रत्येकी २५ टक्क्यांच्या आसपास आहेत.
यंदा १ जुलै रोजी साजऱ्या झालेल्या Doctor’s Day ची मध्यवर्ती संकल्पना होती डॉक्टरांचे शारीरिक व मानसिक आरोग्य —“Behind the Mask: Who Heals the Healers?”
आज डॉक्टर आणि समाज यांच्यातले संबंध इतके गढूळ झालेले आहेत की वर उल्लेख केलेले सरकारी बोधवाक्य पाहून डॉक्टर खिन्नपणे हसत म्हणतात —
‘पण लक्षात कोण घेतो?’

