![]()
स्वातंत्र्यदिनाच्या (15 ऑगस्ट) पार्श्वभूमीवर मुंबईत एक अतिशय खळबळजनक आणि गंभीर घटना समोर आली आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना त्यांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची थेट धमकी देण्यात आली आहे. या धमकीच्या ई-मेलमध्ये केवळ महापौर कार्यालयालाच नव्हे, तर मुंबईची जीवनवाहिनी बनलेली मुंबई मेट्रो, शहरातील शाळा आणि शेअर बाजाराला लक्ष्य करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. 15 ऑगस्टपूर्वी हे स्फोट घडवले जातील, असा थेट इशारा या मेलमधून देण्यात आल्याने सुरक्षा यंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या आहेत. धमकीच्या ई-मेलमध्ये नेमके काय? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या ई-मेलमध्ये अत्यंत धक्कादायक आणि प्रक्षोभक मजकूर आहे. धमकी देणाऱ्याने मेलमध्ये ‘खलिस्तान’ समर्थनाच्या घोषणा दिल्या असून, काही विशिष्ट व्यक्तींची नावेही त्यात नमूद केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत आणि भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी, “तुमच्या मुलांना शाळेत पाठवू नका आणि मुंबई मेट्रोने प्रवास करणे टाळा,” असा गंभीर इशाराही या ई-मेलद्वारे देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, महापौर रितू तावडे यांना अशा प्रकारचा धमकीचा ई-मेल येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांना दोन वेळा अशाच प्रकारच्या धमक्या आल्या होत्या. पोलिसांची तातडीची कारवाई या घटनेचे गांभीर्य ओळखून मुंबई पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली आहेत. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून या ई-मेलचा आयपी (IP) ॲड्रेस, मेल पाठवण्याचा स्रोत आणि तो पाठवणारा प्रेषक कोण आहे, याचा कसून शोध घेतला जात आहे. शहरात आधीच कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. महापौर बंगल्याच्या टेंडरचा वाद आणि फेक नॅरेटिव्ह दरम्यान, या धमकीच्या ई-मेल प्रकरणापूर्वी महापौर रितू तावडे एका वेगळ्याच राजकीय वादामुळे चर्चेत होत्या. नुकतेच महापौर बंगल्याच्या सुशोभीकरण आणि कामासाठी तब्बल 2 कोटी 89 लाख रुपयांचे टेंडर काढण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका सुरू केली होती. मात्र, या वाढत्या वादानंतर रितू तावडे यांनी स्वतः पुढे येत स्पष्टीकरण दिले आणि ते वादग्रस्त टेंडर मागे घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले. याबाबत भूमिका स्पष्ट करताना रितू तावडे म्हणाल्या की, “2 कोटी 89 लाखांचे हे टेंडर प्रत्यक्षात राणीच्या बागेच्या (वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान) कामासाठी उद्यान विभागाकडून काढण्यात आले होते. महापौर बंगला हा ‘हेरिटेज’ (वारसा वास्तू) मध्ये येतो आणि ही टेंडर प्रक्रिया हेरिटेज विभागाकडून काढण्यात आलेली नव्हती. केवळ टेंडरच्या कागदपत्रांमध्ये ‘महापौर बंगला’ असा चुकून उल्लेख झाल्यामुळे हा सगळा गैरसमज निर्माण झाला.” उबाठा गटावर पलटवार या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटावर पलटवार करताना तावडे यांनी गंभीर आरोप केले. “विरोधकांकडून जाणीवपूर्वक खोटा नॅरेटिव्ह पसरवला जात आहे. महापौर बंगल्यासाठी जनतेच्या पैशांची उधळपट्टी केली जात असल्याचा भास निर्माण करून, केवळ राजकीय मायलेज मिळवण्यासाठी आणि स्वतःची राजकीय दुकाने चालवण्यासाठी उबाठा पक्षाने हा खटाटोप केला,” असा घणाघात त्यांनी केला. कोण आहेत रितू तावडे? रितू तावडे या घाटकोपर परिसरातील प्रभाग क्रमांक 132 मधून सलग दुसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. महापालिकेत एक आक्रमक चेहरा आणि अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची राजकीय वर्तुळात ओळख आहे. सध्या टेंडरचा वाद शमत असतानाच, आता या धमकीच्या ई-मेल प्रकरणामुळे त्या पुन्हा एकदा केंद्रस्थानी आल्या असून, सायबर पोलीस या धमकीच्या मुळाशी कधी पोहोचतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. हेही वाचा… डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण: रमेश म्हात्रेंना जामीन मंजूर, पण आरोपपत्र दाखल होईपर्यंत महाराष्ट्राबाहेर राहण्याचे आदेश डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयाच्या डॉक्टरांना आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेले नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या इतर चार साथीदारांना मुंबई उच्च न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला आहे. मात्र, हा जामीन मंजूर करताना न्यायालयाने म्हात्रे यांच्यावर अटी आणि शर्ती लादल्या असून, त्यांना थेट महाराष्ट्राबाहेर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Source link
15 ऑगस्टपूर्वी मुंबई हादरवण्याचा कट?:महापौर रितू तावडे यांना बॉम्बस्फोटाची धमकी; खलिस्तानचा उल्लेख, पोलिसांचा तपास सुरू
