Headlines

14 वर्षांचा संसार तुटला, सानिया थरथर कापू लागली; फराह खान शूट सोडून मदतीला धावली, त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?


Sania mirza panic attack : शोएब मलिकसोबत घटस्फोटानंतरच्या कठीण काळात सानिया मिर्झाची मानसिक अवस्था किती बिकट झाली होती, याचा खुलासा तिने फराह खानसोबतच्या संवादात केला. लाईव्ह शोआधी आलेल्या त्या पॅनिक अटॅकची आठवण सांगताना सानिया भावुक झाली होती.

Sania Mirza Shoaib Malik divorce Farah Khan
घटस्फोटानंतर सानिया मिर्झाला आला होता पॅनिक अटॅक; फराह खान धावत पोहोचली
मैदानावर खंबीर दिसणाऱ्या सानिया मिर्झाला त्या काळात नेमकं काय झालं होतं? फराह खानसोबतच्या संवादात तिने त्या वाईट काळातील दिवसांचा अनुभव सांगितला होता.

आक्रमक सानिया आतून खचली होती

आक्रमक सानिया आतून खचली होती

टेनिस कोर्टवर आपल्या आक्रमक खेळाने भल्याभल्या प्रतिस्पर्ध्यांना घाम फोडणारी भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) हिने व्यावसायिक आयुष्यात यशाची अनेक शिखरं पादाक्रांत केली. आपल्या टेनिस रॅकेटच्या जोरावर तिने जगभरात भारताची मान उंचावली. मात्र, कोर्टवर अत्यंत खंबीर दिसणाऱ्या सानियाला वैयक्तिक आयुष्यात एका मोठ्या वादळाचा सामना करावा लागला. पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत (Shoaib Malik) १४ वर्षांचा संसार मोडल्यानंतर सानिया आतून पूर्णपणे कोलमडली होती. या कठीण काळाबद्दल आणि तिला आलेल्या ‘पॅनिक अटॅक’बद्दल सानियाने तिच्या शोमध्ये मनमोकळ्या गप्पा मारल्या होत्या.

‘सर्व्हिंग इट अप विथ सानिया’ शोमधून किस्सा समोर

'सर्व्हिंग इट अप विथ सानिया' शोमधून किस्सा समोर

सानियाने तिचा यूट्यूब शो ‘सर्व्हिंग इट अप विथ सानिया’ (Serving It Up With Sania) सुरू केलेला आहे. काही महिन्यांपूर्वी या शोमध्ये तिची खास मैत्रीण आणि प्रसिद्ध बॉलिवूड कोरिओग्राफर फराह खान (Farah Khan) हिने हजेरी लावली होती. या दोघींच्या संवादादरम्यान पडद्यामागचा एक अत्यंत भावनिक आणि हादरवून सोडणारा किस्सा समोर आला होता.

‘तो माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट क्षण…’

'तो माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट क्षण...'

घटस्फोटानंतरचा काळ आणि व्यावसायिक काम यांच्यात समतोल राखताना सानियाची काय अवस्था झाली होती, हे सांगताना तिला अश्रू अनावर झालेले या शोमध्ये पाहायला मिळाले. एका लाईव्ह शोच्या आधी आलेल्या पॅनिक अटॅकची आठवण सांगताना सानिया म्हणाली, “खरंतर मला कॅमेऱ्यासमोर या गोष्टीचा उल्लेख करायचा नव्हता. पण तो माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट आणि अंधकारमय क्षणांपैकी एक होता. मला एका लाईव्ह शोसाठी जायचं होतं, पण मी आतून इतकी तुटले होते की मी अक्षरशः थरथर कापत होते.” फराहचे आभार मानताना सानिया पुढे म्हणाली, “त्यावेळी फराह, तू माझ्या सेटवर आलीस. जर तू त्या दिवशी तिथे नसतीस, तर मी तो शो करूच शकले नसते. तू मला धीर दिलास आणि म्हणालीस की, काहीही झालं तरी तू हा शो करणार आहेस.”

फराह खान मदतीला धावली

फराह खान मदतीला धावली

सानियाची ती अवस्था पाहून फराह खानलाही मोठा धक्का बसला होता. त्या दिवसाची आठवण सांगताना फराह म्हणाली, “मी खूप घाबरले होते. मी तुला याआधी कधीही अशा अवस्थेत, पॅनिक अटॅक येताना पाहिलं नव्हतं. त्या दिवशी माझं स्वतःचं शूटिंग सुरू होतं, पण तुझी अवस्था समजताच मी माझं शूटिंग तिथेच सोडून दिलं आणि पायातल्या चप्पल अन् अंगावरच्या पायजम्यावरच थेट तुझ्या सेटवर धावत आले होते.”

‘सिंगल मदर’ असण्याचा संघर्ष सांगितला

'सिंगल मदर' असण्याचा संघर्ष सांगितला

या मनमोकळ्या संवादादरम्यान फराह खानने सानियाच्या खंबीरपणाला दाद दिली. फराहने नमूद केले की, “आज तू एक सिंगल मदर आहेस आणि या जगात एका सिंगल मदरपेक्षा कठीण दुसरं काहीही नाही. हे खूप आव्हानात्मक आहे, पण तू तुझा मुलगा इझानला अत्यंत उत्तम प्रकारे वाढवत आहेस. आपल्या सर्वांचा एक प्रवास असतो आणि जो मार्ग आपल्यासाठी सर्वात योग्य असतो, तोच आपल्याला निवडावा लागतो.”

१४ वर्षांचा संसार अन् घटस्फोट

१४ वर्षांचा संसार अन् घटस्फोट

दरम्यान, सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक २०१० मध्ये विवाहबंधनात अडकले होते. या दोघांना इझान नावाचा एक मुलगा आहे. मात्र, १४ वर्षांच्या संसारानंतर त्यांनी कायदेशीररित्या वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी तिसरा विवाह केला. या सर्व घडामोडींनंतर सानियाने स्वतःला अत्यंत खंबीरपणे सावरले असून, ती आता आपल्या मुलाच्या संगोपनावर आणि स्वतःच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे. सानियाच्या या खडतर प्रवासात फराह खानसोबतच्या घट्ट मैत्रीने तिला नैराश्यातून बाहेर काढण्यात मोठी भूमिका बजावली आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा