![]()
स्मार्ट मीटर सक्तीच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकप) आणि त्यांच्या विविध जनसंघटनांनी सोमवारी तीव्र आंदोलन केले. बडनेरा येथे महावितरण कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली, तर अमरावतीत महावितरणचे अधीक्षक अभियंता दीपक देवहाते यांना निवेदन सादर करण्यात आले. वीज ग्राहकांना मोबाईलवर संदेश पाठवून स्मार्ट मीटर बसवण्याच्या कृतीचा माकप कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला. दुपारी २ ते ४ या वेळेत विद्युत भवन (गर्ल्स हायस्कूलजवळ) येथे धरणे आंदोलन करत शासन-प्रशासनाविरुद्ध निदर्शने करण्यात आली. आंदोलनकर्त्यांच्या मते, मीटर बदलण्याची ही प्रक्रिया पूर्णतः एकतर्फी, नियमबाह्य आणि दिशाभूल करणारी आहे. यामुळे वीज ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन होत आहे. स्मार्ट मीटर लावून महावितरण वीज उद्योगाचे खाजगीकरण करत असून, केवळ पंतप्रधानांचे मित्र अदानी यांच्या विद्युत कंपनीला फायदा पोहोचवत असल्याचा माकपचा आरोप आहे. यात राज्य सरकारही भागीदार असल्याचा दावा त्यांनी केला. अमरावती येथे माकपच्या राज्य कौन्सिलचे सदस्य कॉम्रेड सुभाष पांडे, जिल्हा सचिव रमेश सोनुले, शहर सचिव राजेंद्र भांबोरे आणि जिल्हा कौन्सिल सदस्य पद्माताई गजभिये यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. बडनेरा येथे माकपच्या जिल्हा कौन्सिल सदस्य आशाताई मेश्राम यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. त्यांच्यासोबत शाखा सचिव संध्या वानखडे, नीलू मेश्राम, ललिता वासनिक, विजयाताई घोडेस्वार, चंदा वानखेडे आणि इतर सदस्य सहभागी झाले होते. या आंदोलनात महादेव गारपवार, दिलीप शापामोहन, पंजाबराव शिंदे, ज्ञानेश्वर हरमकर, यादवराव उम्बरकर, प्रभाकर आकोटकर, प्रेम हरमकर, रेहाना खान, वंदना बुरांडे, वंदना लोनपांडे, किरण रंगारी, अश्विनी लोखंडे, वर्षा कापसे, सनोबर शेख, कल्पना भालेराव, बाली इंगळे, रागिनी मोहोड, छबूताई सोनुले, पवित्रा भांबोरे आणि इतर अनेक सदस्य सहभागी झाले होते.
Source link
स्मार्ट मीटर सक्तीविरोधात माकपचे आंदोलन:बडनेऱ्यात निदर्शने, अमरावतीत अधीक्षकांना निवेदन
