स्वदेशी गगन प्रणालीची चाचणी : भारताचा पहिलाच यशस्वी प्रयोग
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आता विमाने कमी दृश्यमानतेतही सुरक्षितपणे उतरू शकतील. भारतात प्रथमच, जमिनीवरून रेडिओ सिग्नल प्रसारित न करता, थेट सॅटेलाइट सिग्नलचा वापर करून एका मोठ्या व्यावसायिक जेटच्या सुरक्षित लँडिंगची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. विमान वाहतूक नियामक ‘डीजीसीए’च्या देखरेखीखाली इंडिगो एअरलाइन्सच्या एअरबस ए-320 विमानाने 27 जून रोजी स्वदेशी ‘गगन‘ नेव्हिगेशन प्रणालीचा वापर करून हे ऐतिहासिक लँडिंग केले. इंडिगोने 2022 मध्ये लहान एटीआर विमानांवर याची चाचणी केली असली तरी, देशात मोठ्या व्यावसायिक जेटसोबत झालेली ही पहिली यशस्वी चाचणी आहे.
सुरक्षितता वाढवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत डीजीसीएने गुरुवारी भारतात सॅटेलाइट-आधारित लँडिंग प्रणालीचा वापर करून जेट-इंजिन विमानाच्या पहिल्या लँडिंगला परवानगी दिली. नियामक संस्थेने उदयपूर येथील आपल्या हवाई तळावर इंडिगोचे ए320 विमान उतरवण्यासाठी इस्रोच्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या ‘गगन’ (जीपीएस-एडेड जिओ ऑगमेंटेड नॅव्हिगेशन) या उपग्रह-आधारित लँडिंग प्रणालीचा वापर केला. या प्रणालीमुळे नवीन उपग्रह नॅव्हिगेशन तंत्रज्ञानाचा वापर करून लँडिंग प्रक्रिया पार पाडता येते.
इस्रो आणि एएआय यांनी संयुक्तपणे विकसित केलेले भारताचे एसबीएएस, ‘गगन’, भारतीय हवाई क्षेत्रात एलपीव्ही प्रक्रियांसाठी आवश्यक संरक्षण प्रदान करते. या तंत्रज्ञानामुळे भारत स्वत:ची एसबीएएस क्षमता असलेल्या जगातील काही मोजक्या देशांपैकी एक बनला आहे. जसजसे अधिक विमानतळ एलपीव्ही प्रक्रियांचा अवलंब करतील आणि अधिक विमान कंपन्या आपली विमाने एसबीएएस क्षमतेने सुसज्ज करतील, तसतसे ‘गगन’ हवाई प्रवास अधिक सुरक्षित, कार्यक्षम आणि सुलभ बनवून भारतीय हवाई वाहतुकीच्या भविष्यात महत्त्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे
