Mohammed Siraj Telangana Police : मोहम्मद सिराज आता क्रिकेटच्या मैदानाऐवजी पोलिसांच्या वर्दीत दिसत आहे. पण टीम इंडियापासून दूर असताना त्याच्या गोलंदाजीची खरी किंमत कशी जाणवली आणि चाहत्यांना ‘मियां भाई’ची आठवण का आली?

क्रिकेटच्या मैदानावर आपल्या भन्नाट वेगाने फलंदाजांची दांडी उडवणारा ‘मियाँ भाई’ म्हणजेच मोहम्मद सिराज आता एका नव्या आणि अत्यंत आदराच्या भूमिकेत दिसत आहे. नुकताच त्याने तेलंगणा पोलिसांमध्ये पोलीस उपअधीक्षक (DSP) पदाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर सिराजने सोशल मीडियावर खाकी वर्दीतील एक फोटो शेअर करत ‘डीएसपी मोहम्मद सिराज रिपोर्टिंग फॉर ड्युटी’ असे कॅप्शन दिले. त्याच्या या पोस्टने क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. एरवी मैदानावर आक्रमक दिसणारा सिराज तसा शांत स्वभावाचा आहे. पण त्याच्या या खाकी वर्दीने त्याच्या संघर्षाची आणि यशाची गती स्पष्टपणे दाखवून दिली आहे.
IND vs PAK: भारत-पाकिस्तानचे दिग्गज पुन्हा आमनेसामने; एशियन लेजेंड्स लीगमध्ये कधी रंगणार महासंग्राम?
सिराजची उणीव टीमला जाणवली
सततचे सामने आणि खेळाडूंचे वर्कलोड मॅनेजमेंट लक्षात घेऊन टीम मॅनेजमेंटने सिराजला आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतून विश्रांती दिली होती. हा निर्णय भविष्यातील महत्त्वाच्या मालिकांचा विचार करून घेतलेला असला, तरी या दौऱ्यात भारतीय संघाला त्याची उणीव प्रकर्षाने जाणवली.
नव्या चेंडूने दोन्ही बाजूंना स्विंग मिळवणे आणि सुरुवातीच्याच षटकांमध्ये धक्का देणे, ही सिराजची सर्वात मोठी ताकद आहे. त्याच्या अनुपस्थितीत भारतीय गोलंदाजीतील ती धार गायब दिसली. आयर्लंडच्या छोट्या मैदानांवर विरोधी फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल केला. अशा वेळी सुरुवातीच्या षटकांत फलंदाजांवर मानसिक दबाव निर्माण करणाऱ्या सिराजसारख्या गोलंदाजाची कमी स्पष्ट जाणवली. इंग्लंडविरुद्धही भारतीय गोलंदाजांना अखेरच्या षटकांमध्ये धावा रोखण्यात मोठे अडथळे आले. सिराजचे अचूक यॉर्कर्स आणि प्रभावी टप्प्यावर गोलंदाजी करण्याची क्षमता संघाला आठवत राहिली. ‘सिराज संघात असता, तर सामन्याचा निकाल वेगळा असता,’ अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी सोशल मीडियावर दिल्या.
संघर्षातून मिळालेला सन्मान
सिराजला मिळालेली ही खाकी वर्दी केवळ एक सरकारी पद नसून त्याच्या अथक परिश्रमाचे फळ आहे. हैदराबादमधील एका अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेल्या सिराजचे वडील ऑटो रिक्षा चालवायचे. बिकट आर्थिक परिस्थितीशी दोन हात करत भारतीय संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज बनण्यापर्यंतचा त्याचा प्रवास थक्क करणारा आहे. टी-20 विश्वचषक विजयातील त्याच्या मोलाच्या योगदानाची दखल घेऊन तेलंगणा सरकारने त्याला या पदाने सन्मानित केले.

