विश्वबॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेला शानदार प्रारंभ
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या 2026 मधील विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेला येथे सोमवारपासून मोठ्या थाटात प्रारंभ झाला. या स्पर्धेत यजमान भारताच्या पीव्ही सिंधूने महिला एकेरीत विजयी सलामी देत आपल्या मोहिमेला सुरुवात केली. दरम्यान त्रिशा जॉली व गायत्री गोपिचंद यांनी महिला दुहेरीत तर हरिहरन आणि एम. आर. अर्जुन यांनी पुरुष दुहेरीत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला.
सोमवारी येथे प्रारंभ झालेल्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत नवव्या मानांकीत आणि आतापर्यंत पाचवेळा या स्पर्धेत पदक मिळविणाऱ्या तसेच दोनवेळा ऑलिम्पिक स्पर्धेतील पदक विजेत्या पीव्ही सिंधूने महिला एकेरीच्या पहिल्या सामन्यात आयर्लंडच्या सोफीया नोबेलचा 21-7, 21-11 अशा सरळ गेम्समध्ये केवळ 29 मिनिटांत फडशा पाडत विजयी सलामी दिली. या स्पर्धेच्या इतिहासामध्ये सिंधूने आतापर्यंत 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य अशी एकूण पाच पदकांची कमाई केली आहे. 2019 साली सिंधूने या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. तसेच यावेळी या स्पर्धेत ती किमान कांस्यपदक मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहील. जर तिने या स्पर्धेत यावेळी पदक मिळविले तर या स्पर्धेच्या इतिहासात सहा पदके जिंकणारी जगातील ती पहिली महिला बॅडमिंटनपटू ठरेल. या स्पर्धेमध्ये चीनच्या लीन डॅनने पुरुष एकेरीमध्ये 5 सुवर्णपदके तसेच चीनच्या झा ओ युनलेईने मिश्र दुहेरीत तीन तर महिला दुहेरीत दोन पदके मिळविली आहेत.
सिंधू आणि नोबेल यांच्यातील झालेल्या पहिल्या फेरीच्या सामन्यात सुरुवातीला सिंधूने पहिल्या गेममध्ये नोबेलवर 11-2 अशी आघाडी मिळविली होती. त्यानंतर सिंधूची ही आघाडी नोबेलने थोडी कमी केली. पहिल्या गेममधील ब्रेकवेळी सिंधूने नोबेलवर 11-7 अशी आघाडी मिळविली होती. या ब्रेकनंतर सिंधूने नोबेलला एकही गुण मिळविण्याची संधी दिली नाही. सिंधूने पहिला गेम 21-7 असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये नोबेलने आपल्या वेगवान स्मॅश फटक्यांवर 11 गुण मिळविले. पण अनुभवाच्या जोरावर सिंधूने हा गेम 21-11 असा जिंकून नोबेलचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त केले. आता सिंधूचा दुसऱ्या फेरीतील सामना कॅनडाच्या वेन झेंगबरोबर होईल. कॅनडाच्या वेन झेंगने महिला एकेरीत विजयी सलामी देताना बल्गेरियाच्या स्टिफेनी स्टोएव्हाचा 21-7, 21-19 असा पराभव केला.
त्रीशा-गायत्रीची विजयी सलामी
महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात भारताची राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेती जोडी गायत्री गोपिचंद आणि त्रिशा जॉली यांनी विजयी सलामी देताना स्पेनच्या पाओला लोपेज व लुसीया रॉड्रिग्ज यांचा 21-9, 21-13 अशा सरळ गेम्समध्ये पराभव केला. पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात भारताच्या हरिहरन ए. आणि एम. आर. अर्जुन यांनी स्कॉट गिल्डेई आणि पॉल रेनॉल्ड्स यांचा 21-16, 6-4 असा पराभव करत विजयी सलामी दिली. दुसरा गेम चालू असताना गिल्डेई आणि रेनॉल्ड्स यांनी स्पर्धेतून माघार घेतली. आता हरिहरन आणि अर्जुन यांचा दुसऱ्या फेरीतील सामना कोरियाच्या केंग आणि की यांच्याबरोबर होणार आहे. या स्पर्धेत पुरुष दुहेरीतील भारताची अव्वल जोडी सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी यांना पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे. त्यामुळे त्यांचा दुसऱ्या फेरीतील सामना स्कॉटलंडच्या डन आणि प्रिंगल यांच्याबरोबर होईल.
