Headlines

साखरेचे दर आठवडाभरात 20 रुपयांनी वाढले:राजू शेट्टींचा 20 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, चौकशीची मागणी




स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी साखरेच्या दरवाढीमागे २० हजार कोटी रुपयांचा मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. देशात पुरेसा साठा असतानाही कृत्रिम टंचाई निर्माण करून अवघ्या आठवडाभरात साखरेचे दर प्रतिकिलो २० रुपयांनी वाढवण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. शेट्टी यांच्या मते, साखर कारखानदार, व्यापारी आणि साठेबाज यांच्या संगनमतातून ग्राहकांची सर्रास लूट सुरू आहे. या संपूर्ण प्रकारामागे २० हजार कोटी रुपयांचा घोटाळा असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. शेट्टी यांनी सरकारी आकडेवारीचा आधार घेत साखरेच्या उपलब्ध साठ्याचा हिशोब मांडला. ऑक्टोबर २०२५ अखेर सरकारने जाहीर केलेला साखरेचा साठा ४७ लाख टन होता. त्यानंतर २०२५-२६ च्या हंगामात २९१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. यामुळे एकूण उपलब्ध साठा ३३८ लाख टन झाल्याचे त्यांनी नमूद केले. या कालावधीत आठ लाख टन साखर निर्यात झाली, तर केंद्र सरकारने १ नोव्हेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत २४७ लाख टन साखर विक्रीला परवानगी दिली. या आकडेवारीनुसार, ३० ऑगस्टपर्यंत देशात सुमारे ८३ लाख टन साखर शिल्लक असायला हवी होती. मात्र, अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाच्या दाव्यानुसार सप्टेंबरअखेर केवळ ३५ लाख टन साठा शिल्लक असल्याचे सांगण्यात आले. यामुळे तब्बल ४८ लाख टन साखर नेमकी कुठे गेली, असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. “संबंधित सर्व आकडे सरकारनेच वेळोवेळी जाहीर केले आहेत. त्यामुळे ४८ लाख टन साखरेचा हिशोबही सरकारनेच द्यावा,” अशी मागणी शेट्टी यांनी केली. ही साखर पाकिस्तान, नेपाळ किंवा बांगलादेशात बेकायदेशीररीत्या चोरट्या मार्गाने निर्यात झाली असावी किंवा व्यापारी व साठेबाजांनी ती दाबून ठेवली असावी, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. देशात पुरेसा साठा असताना केंद्र सरकारने १० लाख टन कच्ची साखर आयात करण्याचा निर्णय घेतल्याबद्दलही शेट्टी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या निर्णयामुळे सरकारी यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, आगामी २०२६-२७ च्या हंगामात साखरेचे दर घसरून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गेल्या सहा महिन्यांतील साखर कारखानदारांचे आर्थिक व्यवहार तपासावेत, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे. त्यांच्या पत्राच्या प्रती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. साखरेच्या दरवाढीमागील नेमके कारण आणि ४८ लाख टन साखरेचा हिशोब केंद्र सरकार कसा देते, याकडे आता लक्ष लागले आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत