![]()
अकोला जिल्ह्यातील बाळापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या निंबी मालोकार गावात एका धक्कादायक घटनेने मोठी खळबळ उडवून दिली आहे. शेतीच्या आणि कौटुंबिक संपत्तीच्या वादातून दोन सख्ख्या चुलत भावांमध्ये झालेल्या भांडणाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाले. या घटनेत अमोल गजानन मालोकार या तरुणाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली असून, त्याचा चुलत भाऊ अजय मालोकार यानेच ही हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अकोला शहरापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या निंबी मालोकार गावच्या शेतशिवारात सायंकाळच्या सुमारास हा थरार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, शेतीच्या वादातून संतापलेल्या अजयने अमोलवर एक-दोन नव्हे, तर तब्बल 3 ते 4 गोळ्या झाडल्या. अमोलच्या कानात आणि शरीराच्या इतर भागांवर गोळ्या लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. एका शेतकरी कुटुंबातील संपत्तीचा वाद थेट अशा प्रकारे जीवावर बेतल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने निंबी मालोकार गावात धाव घेतली. या घटनेनंतर मुख्य संशयित आरोपी अजय मालोकार फरार झाला असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांची चार विशेष पथके गठीत करण्यात आली आहेत. अकोल्याचे पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी मृताच्या नातेवाईकांची भेट घेऊन आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन दिले आहे. सद्यस्थितीत बाळापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, या गोळीबारातील मुख्य संशयित आरोपी अजय मालोकार हा दिवंगत मनसे कार्यकर्ता जय मालोकार यांचा मोठा भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. दोन वर्षांपूर्वी आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने जय मालोकार यांचा मृत्यू झाला होता. आता याच कुटुंबात सख्ख्या चुलत भावानेच दुसऱ्या भावाला कायमचे संपवल्याने संपूर्ण अकोला जिल्ह्यात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.
Source link
संपत्तीच्या वादातून सख्ख्या चुलत भावाची गोळ्या झाडून हत्या:अकोला जिल्ह्यात खळबळ; निंबी मालोकार गावातील थरार
