Headlines

शाहू महाराजांचे विचार अंगिकारावे:लोककलावंत प्रमोद पोकळे यांचे आवाहन, नवपिढीला प्रेरणा घेण्याचे आवाहन




लोककलावंत प्रमोद पोकळे यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीदिनी नवपिढीला त्यांच्या प्रेरणादायी विचारांचा आदर्श अंगिकारण्याचे आवाहन केले आहे. धर्म, संस्कृती, राष्ट्रहित आणि सामाजिक एकतेसाठी लोककल्याणकारी योजना राबवून आपले जीवन रयतेसाठी समर्पित करणारे द्रष्टे समाजसुधारक आणि आरक्षणाचे प्रणेते म्हणून शाहू महाराज ओळखले जातात. कलावंत व साहित्यिक आधार संघ, अमरावती यांच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी संघाचे समन्वयक प्रमोद पोकळे बोलत होते. ज्येष्ठ कलावंत प्रदीप गवळीकर, अनिल गवारे आणि राजेंद्र इंगोले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पोकळे यांनी पुढे सांगितले की, शिक्षण ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे, असे राजर्षी शाहू महाराजांचे मत होते. त्यांनी बहुजन समाजाला आणि तळागाळातील सर्वांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहे सुरू केली. सर्व जातीतील स्त्री-पुरुषांना समान संधी व न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक उपाययोजना केल्या. सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे जीवन देणारे ते पुरोगामी आणि समतावादी विचारांचे पुरस्कर्ते होते. अस्पृश्यता व जातिभेद निवारण, महिला सक्षमीकरण तसेच सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे क्रांतिकारी निर्णय आणि प्रेरणादायी विचार हा समाजाला दिलेला अमर ठेवा आहे. यामुळेच नवपिढीने त्यांच्या मार्गावर चालत समाजात सत्कार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली. याप्रसंगी प्रकाश वानखडे, रवींद्र बन, सुभाष सुने, गणेश खंडार, पुंडलिक सपाटे, नरेंद्र सपाटे, दिनकर कांडलकर, सुरेश श्रीरामवार आणि विनायक ढोले यांच्यासह अन्य कलावंत उपस्थित होते.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत