Headlines

महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होणार, कोकणात ४८ तासांत पाऊसधारा; १६ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’| Maharashtra Times


म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई/नागपूर: कोकण विभागामध्ये येत्या आठवड्यामध्ये मान्सून पुन्हा सक्रिय होत असून त्याची झलक मंगळवारपासून दिसेल, असा अंदाज आहे. सध्या महामुंबई परिसरात एखादी जोरदार सर अनुभवास येत आहे. मात्र यामुळे पाऊसमानात मोठी वाढ झालेली नाही. मात्र मंगळवार, २१ जुलैपासून कोकण विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे धरणक्षेत्राला किती दिलासा मिळणार आहे, याकडे लक्ष लागले आहे.

जुलैच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये, १८ जुलैपर्यंत राज्यात पावसाची एकूण १४ टक्के तूट नोंदली गेली आहे. कोकण आणि गोवा विभागात तसेच मध्य महाराष्ट्रात पाऊस सरासरीच्या श्रेणीत असला, तरी मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाची ३० टक्क्यांहून अधिक तूट आहे. कोकण विभागातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची स्थिती चांगली नाही. ठाणे जिल्ह्यामध्ये केवळ सात टक्के अतिरिक्त पाऊस आहे, तर सिंधुदुर्गात ३६ टक्के तूट आहे. राज्यात सर्वाधिक, ५८ टक्के तूट गडचिरोली जिल्ह्यात आहे. विदर्भामध्ये एकंदरच पाऊस कमी असताना ही मोठी तूट चिंतेचे कारण ठरली आहे. त्यामुळे येत्या आठवड्यातील पाऊस पुन्हा एकदा राज्यासाठी महत्त्वाचा आहे.

Maharashtra TimesKandivali Railway Terminus: मुंबईतील सर्वात मोठं रेल्वे टर्मिनस उभारण्याची तयारी, कांदिवलीमध्ये जमीन निश्चित; प्रकल्पासमोर एक अडथळा

प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पालघर जिल्ह्यात बुधवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकेल. तर रायगड जिल्ह्यात मंगळवारी आणि बुधवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरीतही बुधवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. कोकण विभागात सक्रिय झालेला पाऊस मंगळवार आणि बुधवारी घाट परिसरातही जोरदार पडू शकतो. पुणे आणि नाशिक घाट परिसरात या दोन्ही दिवशी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ वगळता उर्वरित राज्यात बुधवारपर्यंत मध्यम पावसाचा अंदाज आहे.

शेजारी ओलावा, विदर्भ तहानलेला

विदर्भात १९ ते २० जुलैदरम्यान बहुतांश जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांत काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. दरम्यान, काही भागांत ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचाही इशारा देण्यात आला आहे. अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलढाणा आणि काही भागांत तुलनेने कमी पावसाची शक्यता आहे.

देशभरात यंदा मान्सूनची कामगिरी अनेक ठिकाणी असमाधानकारक राहिली आहे. सर्वच ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. देशाच्या सर्व भागांपैकी केवळ मध्य भारतातच आतापर्यंत चार टक्के अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. मात्र, त्याच मध्य भारताचा भाग असलेल्या विदर्भात तब्बल २७ टक्क्यांची तूट नोंदविण्यात आली आहे. केंद्रीय व प्रादेशिक हवामान विभागाच्या आकडेवारीतून हे स्पष्ट झाले आहे.

देशभरात या कालावधीत पावसाची १५ टक्के तूट असून पूर्व व ईशान्य भारतात ती सर्वाधिक ३९ टक्के आहे. तर उत्तर-पश्चिम भारतात १५ टक्के आणि दक्षिण द्वीपकल्पात १४ टक्के तूट नोंदविण्यात आली आहे. याउलट मध्य भारतात सरासरीच्या चार टक्के अधिक पाऊस झाला आहे. विदर्भात मात्र गोंदिया जिल्हा हा अपवाद ठरला असून येथे सरासरीपेक्षा १६ टक्के अधिक पाऊस झाला आहे. उर्वरित सर्व जिल्ह्यांत तूट कायम आहे. गडचिरोलीत सर्वाधिक ५३ टक्के, भंडारा ४१ टक्के, वाशीम ३५ टक्के, चंद्रपूर ३४ टक्के, अमरावती २४ टक्के, नागपूर व अकोला प्रत्येकी २१ टक्के, यवतमाळ १९ टक्के, वर्धा १३ टक्के आणि बुलडाणा येथे ८ टक्के कमी पाऊस झाला आहे. बंगालच्या उपसागरात अपेक्षित कमी दाबाच्या क्षेत्रांची निर्मिती कमी झाल्यामुळे पूर्व, ईशान्य भारत तसेच विदर्भातील पावसावर परिणाम झाल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.

आज १६ जिल्ह्यांना यलो अलर्ट

प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील १६ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, अहिल्यानगर, परभणी, बीड, हिंगोली, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.

यंदा जुलै महिन्यात सरासरीहून कमी पाऊस नोंदला गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत